प्रतिनिधी/ कुंकळ्ळी
कुंकळळीतील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक गोपाळ नारायण चिंतारी यांचा यंदाच्या ‘भारत छोडो आंदोलन दिना’निमित्त आज रविवार 9 रोजी त्यांच्या देमानी-कुंकळळी येथील निवासस्थानी भेट देऊन दक्षिण गोवा जिल्हाधिकारी सत्कार करणार आहेत.
केंद्र सरकारकडून 9 ऑगस्ट हा भारत छोडो आंदोलनदिन वेगवेगळय़ा कार्यक्रमांनिशी दिल्लीत साजरा करण्यात येत असतो. या दिवशी उर्वरित देशाबरोबर गोव्यातील स्वातंत्र्यसैनिकांना दिल्लीत सन्मानाने नेऊन त्यांचा सत्कार करण्यात येत असे. यंदा कोरोना महामारीमुळे विशेष कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. त्याऐवजी राज्यातील निवडक स्वातंत्र्यसैनिकांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे. या निवडक सत्कारमूर्तींत देमानी-कुंकळळीतील स्वातंत्र्यसैनिक गोपाळ चितारी यांचा समावेश आहे.
चितारी यांचा दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय कार्यक्रमात तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिक पुरस्कार देऊन गौरव झालेला आहे, तर तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार लाभलेला आहे. तसेच लखनौ येथे परिवार या संघटनेने त्यांचा सत्कार केलला आहे. कुंकळळी हुतात्मा स्मारक समिती तसेच कुंकळळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व इतर बऱयाच संस्थांतर्फे त्यांना गौरविण्यात आले आहे.
चितारी यांचे मुक्तीपूर्व काळात मराठी शिक्षणाच्या बाबतीत मोठे योगदान लाभले. सावंतवाडी येथे त्यांचे शिक्षण झाले. त्याचदरम्यान त्यांनी सावंतवाडी येथे तेथील संस्थानच्या विलिनीकरणासाठीच्या चळवळीत भाग घेतला तसेच सेवादलाच्या सूर्यकांत वाडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढय़ात कार्य केले. गोव्यात जन्मगावी देमानी-कुंकळळीत आल्यानंतर ते 1953 साली स्वातंत्र्यसैनिक स्व. प्रभाकर वैद्य यांच्या नेतृत्वाखाली आझाद गोमंतक दलात कार्यरत झाले. मुक्तीनंतर मागास मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी मोहीम उभारली. त्यानंतर ते सरकारी प्राथमिक शिक्षक म्हणून रूजू झाले व वेगवेगळय़ा ठिकाणी त्यांनी विद्यादानाचे कार्य केले. 1992 मध्ये त्यांना पहिला आदर्श शिक्षक पुरस्कार लाभला.









