प्रतिनिधी / शिरोळ
जवळचे नातेवाईक नाही सांगलीच्या शासकीय रुग्णालयात जयसिंगपूर येथील स्वातंत्र सैनिक किसन विनायक उगले यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. ही माहिती तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांना समजताच त्यांनी तातडीने संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार संजय काटकर यांना माहीती दिली व शासकीय कर्तव्य समजून त्यांनी विलंब न लावता मृतदेह ताब्यात घेऊन श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे हे अंत्यसंस्कार करण्यात आले.
याबाबतची माहिती अशी की जयसिंगपूर येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक किसन विनायक उगले यांना अस्वस्थ वाटू लागल्याने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांना जवळचे नातेवाईक नसल्याने त्यांनी मानलेली बहीण शिरोळे यांना ही माहिती समजली त्यांनी स्वातंत्र्यसैनिक किसन विनायक उगले त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणे गरजेचे आहे. याकरिता त्यांनी तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला व माहिती दिली.
संजय गांधी नायब तहसीलदार संजय काटकर, मंडलाधिकारी अविनाश सूर्यवंशी तलाठी अमोल जाधव बाळू चव्हाण अजय कांबळे यांना घेऊन सांगलीच्या शासकीय रुग्णालयातील उगला यांचा मृतदेह ताब्यात घेतला व श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे त्यांच्या अंत्यसंस्कार करण्यात आले. शासकीय कर्तव्य समजून त्यांनी या निराधार असलेल्या ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांना अखेरची मानवंदनाही दिली. यावेळी निवासी नायब तहसीलदार पी. जी. पाटील बबन पाटील सचिन गतारे तसेच नृसिंवाडी ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.









