विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर सुरु आहे आंदोलन
वार्ताहर / पणजी
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना वारंवार निवेदन देऊन सुद्धा स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना आजपर्यंत सरकारी नोकरीत घेता आले नाही. यासाठी गेले कित्येक दिवस येथील आझाद मैदानावर धरणे धरुन बसलेल्या काही स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या मुलांनी शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी शुक्रवार दि. 22 जानेवारीपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना प्रश्न सोडविण्यासाठीचे प्रयत्न दिवंगत माजी मुख्य़मंत्री मनोहर पर्रीकर यांनी सुरु केले होते मात्र त्यांच्या निधनानंतर या प्रश्नाकडे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दुर्लक्ष केले आहे. कित्येक दिवस आझाद मैदानावर धरणे धरुनही ते लक्ष देत नसल्याने आता आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे कुंभारजुवे येथील 80 वर्षीय स्वातंत्र्यसैनिक सुरेश पारोडकर यांनी सांगितले.
स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांचे नेतृत्व करणारे डॉ. शिवाजी शेट यांनी सांगितले की, सरकार 10 हजार नोकर भरती करत आहे. त्यात स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना सामावून घेऊन हा प्रश्न सोडवता येईल. सध्या स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांमध्ये 16 जण उच्च शिक्षित, 9 जण उच्च माध्यमिक, 21 जण दहावी पास, 25 जण नववी नापास किंवा त्याखालील शिक्षण तर 26 जणांची गृहखात्याकडे नोंदणीच नाही. प्रथम श्रेणी किंवा चतुर्थ श्रेणीत नोकरीला घेऊन तसेच 50 वर्षावरील जास्त वय असलेल्यांना एकरकमी तडजोड करुन त्यांचा प्रश्न कायमस्वरपी सोडवता येतो मात्र सरकार चालढकल करीत आहे.
त्या निषेधार्थ 22 जानेवारी रोजी कुंभारजुवे येथील सुरेश पारोडकर, केरी – फोंडा येथील 85 वर्षीय स्वातंत्र्यसैनिक नागेश चारी, कुंकळ्ळी येथील श्रीमती सुरेखा बांदोडकर, पिसुर्ले – सत्तरी येथील रावसाहेब देसाई, दाभाळ येथील दुर्गाप्रसाद तिळवे, म्हापसा येथील रवी नागवेकर व सांखळी येथील विरेंद्र नार्वेकर उपोषणाला येथील आझाद मैदानावर बसणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
यावेळी गोवा फॉरवर्डचे कार्याध्यक्ष तथा माजी आमदार किरण कांदोळकर व पक्षाचे निमंत्रक जॉन नाझारेथ यांनी आझाद मैदानावर आंदोलन करणाऱया स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या मुलांची भेट घेऊन पक्षातर्फे पाठिंबा देणार असल्याचे सांगितले.









