शेतकरी संघटनेचा इशारा, करवीर, हातकणंगले, शिरोळ येथील पूरग्रस्तांचे तातडीने पुनर्वसन करा
प्रतिनिधी/कोल्हापूर
शिये तालुका करवीर येथील पुनर्वसनासाठी आरक्षित असलेल्या जागेवरील मुरूम उत्खनन आणि अतिक्रमणे तात्काळ काढावी. त्याचबरोबर करवीर, शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील पूरग्रस्तांचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे याची कार्यवाही 15 ऑगस्ट पूर्वी सुरू करण्यात यावी अन्यथा पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना शासकीय ध्वजारोहण करू देणार नाही असा इशारा रघुनाथदादा प्रणित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माणिक शिंदे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला.
ते म्हणाले, करवीर तालुक्यातील शिये महापुराने बाधित होत आहे. 2019 ला आलेल्या महापुरात शेतजमीन वाहून गेल्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. यावेळी सर्वे नंबर 259 व 283 मधील गायरान मध्ये पूरग्रस्तांचे पुनर्वसन करावे असा निर्णय झाला होता. जागेची मोजणी ही करण्यात आली मात्र, अद्याप काहीच हालचाली झालेल्या नाहीत.
दरम्यान या गट नंबर मध्ये मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे. ग्रामसेवक, तलाठी, मंडल अधिकारी यांचा वरदहस्तामुळे शासकीय मालमत्तेची लूट सुरू आहे. काही ठिकाणी अतिक्रमणे ही झालेली आहेत. या गट नंबर मधील काही जागा बेकायदेशीरपणे विक्री सुरू आहेत. या गंभीर प्रकाराची प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही आज पर्यंत दिलेली सर्व निवेदने कचऱ्याच्या पेटीत टाकून अतिक्रमणधारकांना बळ देण्याचेच काम जिल्हाधिकारी कार्यालयातून सुरू आहे. हेच अधिकारी कायदे पायदळी तुडवत असतील कायदा पाळत नसतील तर त्यांना देशाची अस्मिता असलेला पवित्र राष्ट्रीय ध्वज फडकवण्याचा अजिबात अधिकार नाही. येत्या स्वतंत्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजारोहण कोणत्याही शासकीय अधिकारी यांचे हस्ते करू देणार नाही. एखाद्या सामान्य नागरिक किंवा स्वातंत्र्यसैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावे याकडे लक्ष वेधण्यासाठी 15 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते निदर्शने करतील असे माणिक शिंदे यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला उत्तम पाटील, धनाजी चौगुले, बाबासो गोसावी, के. बी. खुंटाळे, देवदास लाडगावकर, परशराम शिंदे उपस्थित होते.