वार्ताहर /उचगाव
बेळगाव-बाची मार्गावरील उचगाव फाटय़ावर स्वागत कमान उभारण्यात आलेली आहे. मळेकरणी देवस्थान कमिटी व ग्राम पंचायतच्यावतीने ‘सहर्ष स्वागत’ अशाप्रकारची ही स्वागत कमान उभारण्यात आलेली आहे. सदर कमानीवर मराठी व कन्नडमध्येही मजकूर आहे. मात्र काही कन्नड संघटनांनी या कमानीवरील मजकुरात बदल करण्याचा घाट घातला आहे.
सध्या अस्तित्वात आलेल्या ग्राम पंचायतच्या अध्यक्ष, उपाध्यक्षा व सर्व सदस्यांनी याबाबत चर्चा करून हा गावपातळीवरील विषय असल्याने गावपातळीवर हा प्रश्न सोडवला जाईल, असे मत ग्राम पंचायतचे अध्यक्ष जावेद जमादार यांनी व्यक्त केले आहे. सदर कमानीवरील मजकूर बदलण्यासाठी उभा करण्यात आलेला सार उचगाव परिसरातील युवकांनी मंगळवारी रात्री नऊ साडेनऊच्या दरम्यान हटविला. रात्री उशिरा बेळगाव ग्रामीणचे सीपीआय आपल्या फौजफाटय़ासह घटनास्थळी हजर झाले. यावेळी त्यांनी सदर ठिकाणी पोलीस पहारा ठेवला. सध्या निवडणुकीची आचारसंहिता असतानासुद्धा सदर नामफलकावरती शब्द बदलण्याचा घाट घातल्याने याबद्दल उलटसुलट चर्चा या भागात सुरू होती.









