बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात भाजप नेतृत्व बदलाच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. याविषयी अनेक भाजप नेत्यांनी भाष्य करत राज्यात कोणत्याही परिस्थितीत नेतृत्व बदल होणार नसल्याचं म्हंटले आहे. तसेच अशी कोणतीही चर्चा वरिष्ठ पातळीवर झाली नसल्याचे त्यांनी म्हंटले आहे. दरम्यान मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी सोमवारी आपल्या पक्षाच्या नेत्यांना ‘स्वाक्षरी मोहिमेत भाग घेऊ नये किंवा राजकीय विधानं करू नका’, तर त्यांच्या मतदारसंघातील कोरोना व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करा, असे आवाहन केले.
मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी जर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांना राजीनामा देण्यास सांगितले तर आपण राजीनामा देणार असल्याचे म्हंटले होते. या विधानानंतर त्यांनी आपल्या ट्विटरवर, “कोरोनामुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे, अशा वेळी भाजपाच्या प्रत्येक आमदारांनी कोरोना नियंत्रित करण्याला प्राधान्य दिले पाहिजे. त्यांच्या मतदार संघात कोरोना नियंत्रित ठेवला पाहिजे. मी आवाहन करतो की कोणीही कोणत्याही प्रकारच्या स्वाक्षरी मोहिमेमध्ये भाग घेऊ नये किंवा राजकीय विधानं करु नये. प्रत्येकाने संकटात सापडलेल्या लोकांना मदत करावी. ” असे म्हंटले आहे.
मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांनी नेतृत्व बदलाविषयी केलेल्या विधानावर हे वक्तव्य केलं आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव, आमदार, खासदार यांच्यासह ६५ हून अधिक आमदारांनी त्यांच्या समर्थनार्थ पत्र लिहिले असल्याचा दावा केला आहे.