बेळगाव सिटीझन कौन्सिलची आग्रही मागणी : रेल्वेच्या मुख्य वाहतूक अधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना महामारीच्या काळात बंद करण्यात आलेल्या रेल्वे सेवांनी प्रवाशांची पुरती हेळसांड झाली आहे. याकडे आता नैर्त्रुत्य रेल्वेने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. स्वर्णजयंती आणि हजरत निजामुद्दीन या एक्स्प्रेस लवकरात लवकर सुरू व्हाव्यात तसेच मिरज ते लोंढादरम्यान पाच पॅसेंजर रेल्वेसेवा पूर्ववत सुरू करून या मार्गावरील खोळंबलेल्या व्यापार-धंद्यांना चालना द्यावी, अशी आग्रही मागणी बेळगाव सिटीझन कौन्सिलने केली आहे.
गुरुवारी नैर्त्रुत्य रेल्वेचे मुख्य वाहतूक अधिकारी डॉ. अनिलकुमार यांना निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली. सरव्यवस्थापक गजानन मल्ल्या यांना ही मागणी कळविण्यात आली आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्ताने 1997 साली साप्ताहिक स्वर्णजयंती एक्स्प्रेस सुरू करण्यात आल्या होत्या. वेगवेगळय़ा ठिकाणांहून राजधानी दिल्लीत जाण्याची सोय देशवासियांना मिळाली होती. याच निमित्ताने म्हैसूर-हजरत निजामुद्दीन (12781/82) स्वर्णजयंती एक्स्प्रेस तर वास्को-हजरत निजामुद्दीन (07379/80) हमसफर एक्स्प्रेस बेळगाव रेल्वे स्थानकाला जोडल्या गेल्या होत्या. या दोन्ही एक्स्प्रेस बेळगावसह परिसरासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मात्र कोविड महामारीत त्या बंद झाल्याने गैरसोय होत आहे. यामुळे त्या पुन्हा पूर्ववत करण्यात याव्यात, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
पाच पॅसेंजरची तातडीची गरज
बेळगाव-मिरज (51462), कॅसलरॉक-मिरज (51406), लोंढा-मिरज (51432), बेळगाव-मिरज (51464) आणि हुबळी-मिरज (51420) या पाच पॅसेंजर रेल्वे सध्या तातडीने सुरू करण्याची गरज सिटीझन कौन्सिलने व्यक्त केली आहे. या सर्व पॅसेंजर सेंट्रल रेल्वेच्या पुणे विभागाकडून चालविल्या जात होत्या. कोरोना काळात त्या बंद झाल्याने गोकाक, रायबाग, चिकोडी, घटप्रभा, अळणावर, लोंढा आणि खानापूर परिसरातील रेल्वेवर अवलंबून असणाऱया प्रवाशांचे अक्षरशः हाल होत आहेत. रस्ते वाहतूक महागडी व त्रासदायक असल्याने या भागातील सर्वसामान्य प्रवासी रेल्वे सेवांवरच अवलंबून आहेत. दरम्यान, नैर्त्रुत्य रेल्वेने कोरोना नियमांचा विचार करून घटप्रभा ते लोंढा या दरम्यानच्या टप्प्याचा प्रश्न सोडवावा. या पॅसेंजर रेल्वे सेंट्रल रेल्वेमार्फत सुरू करण्यास अडचणी येत असल्यास नैर्त्रुत्य रेल्वेने पुढाकार घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अध्यक्ष सतीश तेंडोलकर, सेवंतीभाई शहा, रेल्वे अभ्यासक अरुण कुलकर्णी, कामगार संघटनांचे अध्यक्ष ऍड. एन. आर. लातूर, ऍड. जी. एस. हिरेमठ आदींचा निवेदनकर्त्यांमध्ये समावेश होता.








