अध्याय चोविसावा
कोणताही विशिष्ट ग्रह किंवा तारा दिसेनासा झाला की, त्याला ग्रहण लागले असे म्हणतात. प्रत्यक्षात हे ग्रह आणि तारे एकमेकांपासून हजारो, लाखो मैल दूर असल्याने त्यांनी एकमेकांना झाकून टाकण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे अशी कोणतीही घटना घडत नाही हे भगवंतांनी उद्धवाला समजाऊन सांगितले. नाथमहाराजांनी ते आणखीन सुस्पष्ट केले आहे. नाथमहाराज म्हणतात जेथे दिवस असतो तेथे चंद्रग्रहण दिसत नाही व जेथे रात्र असते तेथे सूर्यग्रहण दिसत नाही म्हणजेच ह्या सर्व काल्पनिक घटना आहेत. प्रत्यक्षात सूर्य व इतर ग्रह ज्याला आपल्याला ग्रहण लागले आहे, असे वाटते ते केवळ त्यांच्या गतीनुसार फिरताना एककेंद्री झाल्याने ते एकमेकांना काही काळ झाकून टाकतात एव्हढेच! एका बिंबाआड दुसरे बिंब येते, हेच त्या ग्रहणातील सर्व ग्रासांचे सर्वमान्य तत्त्व आहे. वस्तुतः सूर्य हा सूर्यमंडळांत आपले राज्य करीत असतो, परंतु सूर्यग्रहणाच्या वेळी त्याच्या सर्वग्रासाचे माहात्म्य ज्योतिषी घरोघर सांगतो आणि ते ग्रहण पाहून सामान्य जनही कोलाहल करतात. सूर्याचे खग्रास ग्रहण म्हटले की, जगात एकच हाहाकार उठतो. परंतु वास्तविक सूर्य व राहु यांची भेटही होत नाही आणि अखेरपर्यंत त्यांचा एकमेकांना स्पर्शही होत नाही. पुढे भगवंत उद्धवाला म्हणाले, ग्रहमंडळ वेगाने पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसले, तरी सूर्यचंद्रादिकांना काही वास्तविक तशी गती नसते. ते आपापल्या अधिकारांच्या मर्यादेतच निश्चितपणे असतात. म्हणजे नक्षत्रमंडळांतील अनुक्रमाप्रमाणेच पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असतात. तरीही ते पूर्वेकडून पश्चिमेकडे चालत असतात, असे वाटते पण ते खरे नव्हे. सूर्यलोकापासून लक्षावधि योजनेवर चंद्रलोक आहे अशी तैत्तिरीय संहिता, तैत्तिरीय ब्राह्मण आणि श्रीमद्भागवतात कल्पना आहे. चंद्रलोकापासून वर लक्षावधि योजने अंतरावर तारालोक आहे. तारालोकाहून वर दोन लक्ष योजने अंतरावर बुधलोक आहे. बुधलोकापासून वर दोन लक्ष योजने अंतरावर शुक्रलोक आहे. सर्व दैत्य एकत्र जमून ज्याच्या चरणी शरण येतात व नित्य लोटांगणे घालतात, त्याच दैत्यांचे गुरु शुक्राचार्य यांचा हा लोक होय. शुक्रलोकापासून वर दोन लक्ष योजने अंतरावर मंगळलोक आकाशात आहे.मंगळलोकापासून वर दोन लक्ष योजने अंतरावर देवगुरु वसती करतात. इंद्र, चंद्र, वरुण, सूर्य, इ. देव आदरपूर्वक नित्य येऊन ज्याचे चरण वंदन करतात, त्याच देवांच्या गुरुचा हा बृहस्पतिलोक होय.त्याच्याही वर दोन लक्ष योजने अंतरावर सूर्यपुत्र शनी वसती करतो. त्याच्यावर एक लक्ष योजने अंतरावर सप्तऋषींचे निवासस्थान आहे.
सप्तऋषींचा समुदाय जेथे राहतो, तेथेच अरुंधती राहते. आणि त्याच्याही वर इंद्राच्या वैभवाने सुशोभित अशी अमरावती वसलेली आहे. जेथे इंद्र स्वतः राहतो. तो ऐरावतावर आरोहण करतो, मरुद्रण हे ज्याचे सभासद आहेत, देवसमुदाय हेच त्याचे सैन्य आहे, उच्चैःश्रवा हा घोडा आहे, कल्पतरूंचीच मनोहर बाग आहे, कामधेनूंचे खिल्लार आहे आणि क्रीडेसाठी नंदनवन आहे. जेथील पायऱया चिंतामणीच्या आहेत, जेथें रंभा-उर्वशीसारख्या विलासिनी स्त्रिया आहेत, अष्टनायिका नृत्यांगना होऊन ज्याच्या रंगसभेत नृत्य करीत असतात अशा त्या इंद्राच्या वैभवाने अमरावती सजलेली असून इंद्र हा तेथील अधिपती आहे. येथे स्वर्गाची सीमा संपली. स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ यांना त्रैलोक्मय म्हणतात. काही अपेक्षा ठेऊन कर्म करणारे लोक त्यांच्या कर्मानुसार त्या कर्माचे पुण्यप्रद किंवा पापयुक्त फळ मिळवतात व त्याचा लाभ घेण्यासाठी पुनर्जन्माला आमंत्रण देतात. त्यांच्या पुण्याच्या हिशोबानुसार ते आधी स्वर्गोपभोग घेतात आणि मग पापाचरणाबद्दल नरकवास भोगून झाल्यावर त्यांचा पृथ्वीवर किंवा पाताळात पुनर्जन्म होतो पण कोणत्याही परिस्थितीत स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या त्रैलोक्मयाच्या पलीकडे त्यांची मजल जात नाही.
क्रमशः








