वार्ताहर/ कराड
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतुन काढण्यात आलेल्या स्वराज्य धवज यात्रेचे कराडला मोठया उत्साहात स्वागत करण्यात आले. कराड येथे श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ तसंच स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या समाधी स्थळी ’स्वराज्य ध्वज’ नेण्यात आला.
यावेळी, लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव निखिल शिंदे, आमदार रोहित पवार विचार मंचचे समिर कुडची, नंदकुमार बटाने, गंगाधर जाधव, सादिक इनामदार, रणजीत पाटील, नवाज शेख व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
स्वराज्य ध्वज यात्रेच्या निमित्ताने पुन्हा एकदा राज्यातील युवावर्गाला प्रेरणास्थान मिळालं असून, स्वराज्य ध्वजगीताच्या तालावर अवघा महाराष्ट्र डोलत आहे. महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा देशभर पोहोचवण्यासाठी गेले पंधरा दिवस सातत्याने स्वराज्य ध्वज मोहिमचे वाहन राज्यातील सर्व जिल्हयात तसेच देशातील इतर राज्यांत फिरत आहे. आज ध्वज यात्रेच्या सांगली-सातारा-कराड मुक्कामात कराडवासीयांनी मोठय़ा उत्साहात स्वराज्य ध्वजाचे स्वागत केले.
आजपर्यंत स्वराज्य ध्वज रथ अडचणींची पर्वा न करता प्रवास करत आहे. राज्यातील प्रवासाचा हा अखेरचा व तिसरा टप्पा सुरू आहे. गेले दोन आठवडे कोविड साथरोगाच्या काळातही कोविडसंबंधीचे सर्व आवश्यक नियम पाळून अत्यंत नियोजनबद्ध रितीने स्वराज्य ध्वज मोहिम राज्यातील सर्व जिह्यांमधून महत्त्वाकांक्षी प्रवास करत आहे. सर्व जिह्यांमधून स्वराज्य ध्वजाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.









