प्रतिनिधी/बेळगाव
स्वरमल्हार आयोजित रविवारी झालेल्या दिवाळी पहाटमधील गायन व वादनाने श्रोत्यांना आनंद दिला. रविंद्र माने यांच्या संवादिनी वादनाने बैठकीला प्रारंभ झाला. त्यांनी राग अहिरभैरव विलंबित झपतालातील व दुत एकतालातील गीते सादर केली आणि त्यानंतर ‘मोहे भूल गये सावरीया’ हे सिने गीत सादर केले.
बैठकीचे दुसरे कलाकार मुकुंद गोरे यांनी राग मियाँ की तोडी मध्ये ‘दरबार सजावत’ ही विलंबित एकतालमधील बंदिश, त्रिवट आणि द्रुत एकतालातील तराणा पेश केला. त्यानंतर गोरे यांनी हिंडोल बहार हा जोड राग अतिशय कुशलतेने सादर केला. त्यानंतर ‘मत जैय्यो जमुना तट’ ही भैरवीतील बंदिश व सर्वात्मका सर्वेश्वरा हे नाटय़गीत गाऊन बैठकीचे समापन केले.
कलाकारांना अभिमन्यू हेर्लेकर, संतोष पुरी यांनी तबला संगत केली. संवादिनी संगत योगेश रामदास यांची तर तानपुरा साथ कु. रंजिता पर्वतीकर हिने दिली.
प्रारंभी रोहिणी कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. मुकुंद गोरे, रविंद्र माने, श्रीधर कुलकर्णी, डॉ. सुधांशु, अभिमन्यू हेर्लेकर, तन्मयी सराफ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सामाजिक अंतर राखत श्रोत्यांनीही प्रत्यक्ष बैठकीचा आनंद घेतला. रोहिणी कुलकर्णी यांनी आभार मानले.









