मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन : 67 व्या सहकार सप्ताहाला प्रारंभ
प्रतिनिधी/ फोंडा
सहकार चळवळ तळागाळात रुजून ग्रामीण भागात विकसित झाली पाहिजे. त्यासाठी ‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोय’ या योजनेला सहकारी संस्थानी सहकार्याचा हात द्यावा, असे सांगून सहकाराच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती व कुटुंबाचे जीवन प्रकाशमान करण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
67 व्या सहकार सप्ताहाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याहस्ते शनिवारी सकाळी कुर्टी फोंडा येथील सहकार भवनमध्ये झाले. यावेळी ते बोलत होते. गोवा राज्य सहकार खाते, राष्ट्रीय सहकारी संघ, नवी दिल्ली व गोवा राज्य सहकारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याहस्ते दीपप्रज्वलीत करुन सहकार सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सहकारमंत्री गोविंद गावडे, फोंडय़ाचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री रवी नाईक, फोंडय़ाचे नगराध्यक्ष विश्वनाथ दळवी, सहकार निबंधक अरविंद खुटकर, गोवा राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई, गोवा राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष उदय प्रभू व प्रमुख वक्ते तथा गोवा राज्य सहकारी बँकेचे संचालक दत्तात्रय नाईक हे व्यासपीठावर उपस्थित होते.
पदवीधरांसाठी कौशल्यविकास प्रशिक्षणावर भर द्या
सहकार क्षेत्रात युवा व तरुणांनी येण्याची गरज व्यक्त करीत, पदवीधर युवकांसाठी सहकाराच्या माध्यमातून कौशल्यविकास प्रशिक्षण आयोजित करण्याची सूचना मुख्यमंत्री सावंत यांनी केली. केंद्र व राज्य सरकारच्या विविध कौशल्यविकास योजनांचे प्रशिक्षण देण्यासाठी सहकारी संस्थानी पुढाकार घ्यावा. त्यासाठी जागा व इतर साधनसुविधा राज्य सरकारकडून उपलब्ध करुन दिल्या जातील. मानवी विकास हा आत्मनिर्भर योजनेचा मूळ उद्देश असून तो पूर्ण होण्यासाठी सहकारी संस्था महत्वाचा वाटा उचलू शकतात असेही त्यांनी नमूद केले. राज्यातील साडेचार हजार शेतकरी व दूध उत्पादकांना किसान क्रेडिट कार्ड मिळाले आहे. मत्स्य उत्पादनापासून कृषी संबंधीत विविध व्यावसायिकांना त्याचा थेट त्याचा लाभ मिळणार आहे. स्थानिक उत्पादनात वाढ झाल्यास राज्याची आर्थिक स्थिती बळकट होण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.
वित्त संस्थामध्ये गुंतवणूक करताना पूर्ण खात्री करुनच पैसे गुंतवण्याचा सल्ला देताना, गुंतवणूक सुरक्षीत राहावी यासाठी सहकार कायद्यामध्ये महत्त्वाचे बदल घडवून आणण्याचे संकेतही त्यांनी दिले. कोरोना महामारीचा संसर्ग सध्या नियंत्रणात असला तरी जनतेने स्वत:ची काळजी व खबरदारी घेण्याचे आवाहन करुन दिवाळीनंतर कोरोनातून मुक्त होऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सहकार कायद्यात बदल करणार : गोविंद गावडे
सहकार चळवळ अधिक व्यापक होण्यासाठी शेतकरी व कष्टकरी लोकांना त्यात स्थान मिळायला हवे असे गोविंद गावडे म्हणाले. स्वाहाकाराचा उद्देश डोक्यात ठेवून या क्षेत्रात आलेल्या काही लोकांमुळे सहकार क्षेत्र अपेक्षित पल्ला गाठू शकले नाही. या क्षेत्रातील अनिष्ट प्रकारांना आळ बसावा व लोकांची गुंतवणूक बुडविणाऱया संस्थावर अंकुश ठेवण्यासाठी सहकार कायद्यात बदल आवश्यक असून येणाऱया विधानसभा अधिवेशनात सहकार कायदा दुरुस्ती विधेयक मांडणार असल्याचे गोविंद गावडे यांनी जाहीर केले. हाऊसिंग सोसायटय़ा व अन्य काही संस्थामधील जाचक अटी व नियमामध्ये बदल व सुसूत्रता आवश्यक आहे, असल्याचे सांगून प्रशिक्षणावर भर देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
गोव्यात सहकार चळवळीचा व्यापक व अपेक्षित विस्तार होऊ शकला नाही अशी खंत रवी नाईक यांनी व्यक्त केली. सालसेत, मुरगावसारख्या तालुक्यात सहकारी संस्था खूपच कमी आहेत. विश्वासार्हाता व पारदर्शकता हा सहकाराचा पाया असून सहकारी संस्थांकडून जनतेला त्याची हमी मिळायला हवी. जनतेची देणी बुडविणाऱया व अल्प मुदतीत दुप्पट लाभ देण्याचे आमिष दाखविणाऱया वित्तसंस्थावर सरकारचा अंकुश हवा, अशी सूचना त्यांनी केली. अरविंद खुटकर यांनी आपल्या स्वागतपर भाषणात सहकारी संस्थानी वार्षिक सर्वसाधारण सभा वेळोवेळी घेतानाच हिशेब चोख ठेवण्याची गरज व्यक्त करुन सहकाराची तत्वे व मुल्ये प्रत्येक संस्थेने पाळण्याचे आवाहन केले. प्रमुख वक्ते दत्तात्रय नाईक यांनी कोरोना महामारी, आत्मनिर्भर भारत व सहकार या विषयावर विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भिसो गावस यांनी केले.









