अध्याय तेरावा
भगवंत म्हणाले, स्वतःच्या सावलीचा माणसाला कधी गर्व होत नाही त्याप्रमाणे ज्ञात्याला देहाचा कधी गर्व होत नाही. तसेच देहभोगांचे सुखदुःख असत नाही कारण ज्ञाता तर ब्रह्मरस सेवन करून परमानंदाने तृप्त झालेला असतो. त्या धुंदीत त्याला देह जगला की मेला ह्याची फिकीर नसते. तात्पर्य, देहाचे पालन पोषण, जन्म मरण, हे सर्व दैवयोगानेच होते हे त्याला पूर्ण मान्य असते. पूर्वीच्या संचित कर्मामुळे देह उत्पन्न होतो. तो सर्व इंद्रियांसह व प्राणांसह दैव ठरवेल त्याप्रमाणेच वागत असतो. त्याला देहाचे भोग व सुखदुःख यामुळे देहाची अहंता जडलेली नसते कारण सर्व अहंभाव सोडून ते चिदानंदामध्येच समाधिस्थ झालेले असतात. सदोदित निरभिमानाने राहणे याचेच नांव अखंड समाधी होय. जो मनुष्य प्रपंच, प्रारब्ध आणि उपाधी यातून मुक्त झालेला असतो तो खरा समाधीत असतो कारण त्याच्या सर्व संकल्पविकल्पांचा शेवट झालेला असतो. मनाच्या या अवस्थेचे नाव निर्विकल्प समाधी होय. समाधी म्हणजे काही काळची तटस्थता असा बऱयाच जणांचा समज असतो पण तो चुकीचा आहे.
उदाहरणार्थ शेळीजवळ साप आला म्हणजे ती देखील सर्व वृत्तींनी शून्य होऊन तटस्थ होते. किंवा चटकन एकाएकी एखादे दिव्य स्वरूप पाहिले, तर त्या आश्चर्यानेही तटस्थता प्राप्त होते. पण ती कांही खरी समाधी नव्हे. कारण अशा प्रसंगी वृत्ती जागृत असतेच.
त्याप्रमाणे प्रथमतःच आत्मस्वरूप डोळय़ांना दिसू लागले असता इतके आश्चर्य उत्पन्न होते की, साधकाला सावरता येत नाही. पण ते आश्चर्यही पोटातल्या पोटात दाबून टाकून जी दशा उत्पन्न होते, तीच समाधी होय. कल्पना जेथे समूळ नाहीशी होते, तेथे विस्मय वाटत नाही. ज्याला खरोखर ब्रह्मप्राप्ती झालेली असते, त्याला देहाच्या हालचालीचे भान रहात नाही. त्यावेळी तो तटस्थ उभा आहे की चालत आहे हे देखील दुसऱयांनी पाहावे लागते.
ज्याला खरोखर परब्रह्माचीच प्राप्ती होते, तोही देहाच्या स्थितीला चिकटून रहात नाही. त्याचा देह उरलेल्या प्रारब्धाच्या गतीने क्रिया करतो. ज्याप्रमाणे पाळणा हालवताना तो हालवणारा मनुष्य थांबला, तरी पूर्वीच्या धक्क्याने तो पाळणा हालतच असतो. त्याप्रमाणे अविद्येचा नाश झाला तरी प्रारब्ध हे बाकी उरतेच, त्याच शेषप्रारब्धाने मुक्तांचा देह चालत असतो. मग त्या प्रारब्धानुसार त्याच्या देहाच्या हालचाली होत असतात. कधी तो जगाबरोबर बोलत असतो तर कधी मौन असतो, कधी लोकांच्यात असतो तर कधी एकांतात असतो, तो प्रारब्धाप्रमाणे जी जी स्थिति प्राप्त होईल त्या त्या क्रमाने वागत असतो.
तो पालखीत असो की हत्तीच्या गंडस्थळावर बसो, किंवा वि÷ामूत्रात पडो, ती ती स्थिती प्रारब्धाचीच होय अशी ज्ञात्याची खात्री असते. त्या सर्व अवस्थांशी त्याला काहीच देणेघेणे नसल्याने त्याला त्यातील काहीच बाधत नाही ‘अहं’ काराची सर्व अविद्या नाहीशी होते, त्याच्या त्या स्थितीला स्वभावसिद्ध समाधी असे म्हणतात. अशी नैसर्गिक समाधी अवस्था ज्याला प्राप्त होते, तोच सर्व भोग भोगून अभोक्ता असतो, आणि सर्व कर्मे करूनही तोच एक खरोखर अकर्ता असतो. तो क्रिया आणि कारण ह्यांच्या संयोगाने विषयोपभोगात डुलत असलेला दिसतो, तरी त्याच्या समाधीच्या अवस्थेचा भंग होत नाही. भोग भोगूनही तो अलिप्तच असतो. त्याची स्त्री त्याला ‘माझा पति’ असे म्हणते, पुत्र ‘माझा बाप’ असे म्हणतो, परंतु तो या सर्व संबंधांपासून अगदी वेगळा होऊन त्यांच्यामध्ये वागत असतो. ज्याप्रमाणे लाकडापासूनच अग्नि उत्पन्न होतो, लाकडामध्येच तो राहतो, पण त्यालाच पुष्कळ लाकडांनी धरून ठेवू म्हटले तर मात्र तो त्यांना खरोखर आवरावयाचा नाही त्याप्रमाणे कर्मापासूनच उत्पत्ति होते, कर्मापासूनच परब्रह्मप्राप्ती होते, पण महान योगी असतात ते त्या कर्मामध्येच निष्कर्म स्थितीने वागत असतात. थोडक्मयात ते देही उदासीन राहून अंतर्यामी सदैव सावध असतात. संसारात साक्षी असून सदैव आत्मरूपी एकनि÷ असतात.
क्रमशः