नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांचे 17 डिसेंबर 2019 रोजी निधन झाले. ‘करिअर’ विषयक त्यांचे विचार आजही मार्गदर्शक आणि मोलाचे ठरतात.
स्वभावधर्म, आवड, बुद्धीमत्ता या आपल्या वैशिष्टय़ांपेक्षा वेगळा तो ‘परधर्म’! आणि आपल्याला भावणारे, प्रबळ बुद्धिमत्तांचा आविष्कार होणारे, मनापासून आवडणारे आपल्या स्वभाववैशिष्टय़ांना अनुसरून असलेले क्षेत्र म्हणजे स्वधर्म.
कधी एखाद्या क्षेत्राची आवड असते; पण क्षमता नसते, तर कधी एखाद्या क्षेत्रातील क्षमता असते; पण आवड नसते. असे क्षेत्र शोधा, ज्या बाबतीत क्षमताही तुमच्यात आहे आणि त्या क्षेत्राची आवडही आहे. मग प्रगती – यश – सुख हे आपोआप मागुती येईलच! ‘परधर्मो भयावह’ हे गीतेतील वचन नेहमीच लक्षात ठेवा.
नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांचे अभिनय क्षेत्रातील करिअर देदीप्यमानच म्हणावे लागेल. ‘वेडय़ाचं घर उन्हात’, उद्ध्वस्त धर्मशाळा’, ‘नटसम्राट’, हिमालयाची सावली’ इत्यादी नाटकातील आणि सामना, सिंहासन या चित्रपटातील त्यांनी भूमिका केल्या. ‘लमाण’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत महत्वपूर्ण सहभाग, अनेक महत्वाच्या पुरस्कारांनी सन्मानित. वडिलांच्या इच्छेसाठी ते डॉक्टर झाले. पण मूळ पिंड हा कलावंताचा. एम. बी. बी. एस. होऊनही ते वैद्यकीय क्षेत्रात रमले नाहीतच; कारण तो त्यांचा ‘स्वधर्म’ नव्हता. व्यावहारिक विचार करून पालक आपल्या मुलांसाठी एखादं क्षेत्र निवडतात. त्या अभ्यासक्रमात पास होणं वेगळं आणि कर्तृत्वाची उंची गाठणं वेगळं.
स्वत:ची क्षमता आणि आवड याचं भान आल्यानंतर मात्र स्वधर्माला अनुसरून क्षेत्र निवडण्याचं – करिअरची वेगळी वाट धरण्याचं धाडस जे दाखवितात, ते यशस्वी होतातच.
डॉ. श्रीराम लागू स्वत:च्या करिअर-निवडीविषयी काय लिहितात, पहा…
‘मी 1944 साली मॅट्रिक झालो आणि फर्ग्युसन कॉलेजात गेलो.’ त्याचं असं झालं, मॅट्रिक झाल्यानंतर वडिलांनी रीतीप्रमाणे विचारलं, ‘आता पुढे काय करायचा विचार आहे?’ म्हणून…
मी म्हटलं, ‘मला आर्ट स्कूलमध्ये चित्रकला शिकायला जायचंय,’ (मी चित्रं बरी काढायचो – आणि एकूणच मला कला विषयांमध्ये स्वारस्य होतं. शास्त्रीय विषयांची काही गोडी नव्हती)
वडील क्षणभर अवाप् झाले. एका प्रति÷ित डॉक्टरच्या आणि काँग्रेसच्या गांधीवादी पुढाऱयाच्या मुलाकडून त्यांची ही अपेक्षा सुतराम नव्हती. काहीतर शिष्टसंमत प्रति÷ित व्यवसायाचं मी नाव घेईन, अशी त्यांची खात्री असावी. थोडय़ा वेळानं ते बोलते झाले, ‘हे पहा पेंटर-बिंटर होणं म्हणजे भिकेची लक्षणं आहेत. तुम्ही यावर काहींच विचार केलेला दिसत नाहीये. तर मी सांगतो मॅट्रिक झाल्यावर पुढे कॉलेजात दोन शाखा असतात. आर्ट्स आणि सायन्स. आर्ट्स घेतलंत तर एक तर वकील व्हाल किंवा प्रोफेसर. आज काल वकील सगळीकडे बेकार हिंडताहेत आणि प्रोफेसर म्हणजे दीडदोनशे रूपये पगारावर आयुष्य काढावं लागेल. तेव्हा आर्टस्चा विचार डोक्मयातून काढून टाका. आता सायन्स त्यात दोन शाखा इंजिनिअरिंग आणि मेडिकल. इंजिनिअरिंगला जायचं म्हणजे गणित फार पक्कं हवं. – तुमचा गणितात काय उजेड आहे, तो दिसतोच आहे. तेव्हा इंजिनिअरिंग रद्द… आता म्हणजे मेडिकलशिवाय पर्याय नाही. तेव्हा मेडिकलला जायचं!’’
त्यांच्या वक्तृत्वानं आणि तर्कशुद्ध विश्लेषणानं मी फार प्रभावीत झालो आणि फर्ग्युसनला सायन्समध्ये नाव दाखल केलं. वडील स्वत: डॉक्टर असून राजकारणात रस घेत असल्यामुळे, आपला व्यवसाय शक्मय तितक्मया लवकर आपल्या थोरल्या मुलानं चालवायला घेऊन आपल्याला मुक्त करावं असं त्यांना वाटणं अगदी साहाजिक होतं. त्यामुळे इंटर सायन्सनंतर मेडिकल कॉलेजला प्रवेश घेतला.
मेडिकल कॉलेजमध्येही डॉ. श्रीराम लागू नाटकांची आवड आणि हौस भागवून घेतच होते. नाटकापासून दूर ते राहूच शकले नाहीत. ते ‘ड्रामा सेपेटरी’ होते.
डॉ. लागू लिहितात, ‘मी आयुष्यात प्रथमच स्वेच्छेने (‘अक्कल हुशारीने’ म्हणता येईल- पण ‘नशापाणी न करता’ असं म्हणता येणार नाही; कारण नाटकांची चांगलीच नशा तोपर्यंत चढली होती.) केलेला पहिला नाटय़प्रयोग पुण्यात लिमये मांडववाल्यांच्या ‘लिमये नाटय़-चित्र मंदिरात’ (आजचे विजय टॉकीज) डिसेंबर, 1946 मध्ये झाला’.
नाटक होतं अत्र्यांचं. ‘वंदे मातरम्’ आणि डॉ. लागूंनी त्यात ‘त्रिभुवन’ची भूमिका केली. स्वत:लाही आश्चर्य वाटेल, अशा सराईतपणे त्यांनी ती भूमिका गाजवली. हे सगळं करताना त्यांनी ‘धुंदी’ अनुभवली जी जीवनभर साथ करत राहिली.
डॉ. लागू पुढे लिहितात, ग्रॅहम ग्रीननं म्हटलं आहे की, ‘प्रत्येकाच्या बालपणात किंवा पौगंडावस्थेत एक क्षण असा येतो की, एक खिडकी अचानक उघडते आणि सारा भविष्यकाळ आता येतो!’ मला वाटतं ती खिडकी त्या क्षणी उघडली होती.
‘एम. बी. बी. एस.’ च्या शेवटच्या वर्षात असताना गॅदरिंगला ‘पुण्यप्रभाव’ नाटक केलं. फायनल परीक्षा तीन महिन्यांवर आली असताना आणि नापास होण्याची खात्री समोर दिसत असतानाही ‘वृंदावन’ करण्याची संधी हातातून टाकून देणं शक्मयच नव्हतं. कदाचित ते आयुष्यातलं शेवटचं काम असणार आहे. नानासाहेब फाटकांचा ‘वृंदावन’ पाहिला होता आणि त्यानं मला चांगलंच पछाडलं होतं. तेक्हा खूप मन लावून मी ‘वृंदावन’ केला आणि ठरल्याप्रमाणे एप्रिलमध्ये नापास झालो! ऑक्टोबरच्या परीक्षेत मात्र पास व्हायचंच, या निश्चयानं मग जोरात अभ्यासाला लागलो. पण पहिली चिंता हीच की आता कॉलेज सुटणार तर आता नाटकं कुठे करायची?
पहा, स्वधर्मानुसार (आंतरिक स्वभावानुसार) ओढ लागली ती नाटकाची अभिनयाची ! लक्षात घ्या, वडिलांच्या इच्छेनुसार
डॉ. लागूंनी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. एम. बी. बी. एस. पासही झाले पण चिंता होती, ती आता वैद्यकीय व्यवसाय कुठे, कसा करायचा? याची नाही तर नाटकाची ! आणि शेवटी डॉ. लागू ‘नटसम्राट’चे झाले.
संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांच्याही बाबतीत असंच काहीसं झालं आणि भरघोस पगार देणारी वैद्यकीय क्षेत्रातील नोकरी सोडून त्यांनी संगीतक्षेत्राला स्वत:ला वाहून घेतलं. तुमचा स्वधर्म तुम्हाला आतून सतत खुणावत राहतो, तो असा.
माणसाचा स्वभावधर्म निरीक्षण, अनुभव, आंतरिक ओढ व मानसशास्त्रीय चाचण्या (सायकॉलॉजिकल टेस्ट) यांच्या माध्यमातून ठळकपणे आकलन होतो किंवा समजून घेता येतो.
-डॉ. रमा मराठे









