सप अध्यक्ष अखिलेश यांचे विधान – मायावती अन् काँग्रेस कमकुवत सहकारी
वृत्तसंस्था/ लखनौ
मिशन 2022 साठी उत्तरप्रदेशात राजकीय हालचालींना जोर आला आहे. भाजप, सप समवेत सर्व राजकीय पक्षांनी डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे. याचदरम्यान समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पुढील वर्षी होणारी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा केली आहे. मायावती आणि काँग्रेस चांगले सहकारी नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बसप आणि काँग्रेस यांच्याशी पुन्हा आघाडी करण्यास अखिलेश यादव यांनी नकार दिला आहे. मोठय़ा राजकीय पक्षांबाबतचा माझा अनुभव चांगला राहिलेला नाही. आम्ही त्यांच्याऐवजी छोटय़ा पक्षांसोबत आघाडी करू. उत्तरप्रदेशची जनता परिवर्तन इच्छिते. याचमुळे पुढील निवडणुकांमध्ये भाजपला पराभव पत्करावा लागणार असल्याचे अखिलेश यांनी सांगितले आहे.
बसपचे नेते संपर्कात
राज्यातील 403 जागांपैकी 350 जागा जिंकण्याचे सपचे उद्दिष्ट आहे. सप सरकार राज्यात लवकरच सत्तेवर येणार आहे. बसपचे काही नेते माझ्या संपर्कात असल्याचे अखिलेश म्हणाले. 2019 ची लोकसभा निवडणूक सपने बसपसोबत आघाडी करून लढविली होती.
काँग्रेस कमकुवत पक्ष
उत्तरप्रदेशात भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेस अत्यंत कमकुवत पक्ष आहे. 2017 च्या निवडणुकीत आमचा काँग्रेससोबत चांगला अनुभव राहिलेला नाही. काँग्रेसला 100 हून अधिक जागा दिल्या होत्या, पण काँग्रेसला फारसे यश मिळू शकले नव्हते. उत्तरप्रदेशच्या जनतेला काँग्रेसला नाकारले हेते असे अखिलेश यांनी म्हटले आहे.









