बालासोर
भारताच्या वैज्ञानिकांकडून सातत्याने देशाचे सामर्थ्य आणि तंत्रज्ञान बळकट करण्यावर भर दिला जात आहे. याचनुसार सुपरसोनिक मिसाइल असिस्टेड रिलीज ऑफ टॉरपीडोची (स्मार्ट) यशस्वी चाचणी सोमवारी करण्यात आली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजेच डीआरडीओने ओडिशाच्या किनारी भागात याचे परीक्षण केले आहे.
या स्मार्टच्या माध्यमातून युद्धनौकेत स्टँड ऑफ क्षमता वाढविण्यास मदत होणार आहे. स्मार्ट क्षेपणास्त्र मुख्यत्वे टॉरपीडो यंत्रणेचे हलके स्वरुप असून ते युद्धनौकांवर तैनात करण्यात येणार आहे. हे क्षेपणास्त्र विकसित करण्यासाठी हैदराबाद, विशाखापट्टणम समवेत अन्य शहरांमधील डीआरडीओच्या प्रयोगशाळांमध्ये काम करण्यात आले होते.
डीआरडीओच्या या यशस्वी परीक्षणावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी अभिनंदन केले आहे. डीआरडीओने सोमवारी यशस्वीपणे स्मार्टचे परीक्षण केले आहे. पाणबुडीविरोधी युद्धतंत्रात क्षमतावृद्धीच्या दृष्टीकोनातून हा एक महत्त्वाचा क्षण असल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत.









