नौदलाचे सामर्थ्य अनेक पटीने वाढणार ः पुढील महिन्यात होणार सामील
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत पुढील महिन्यात स्वातंत्र्यदिनी भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील होणार आहे. दुसऱया विमानवाहू युद्धनौकेमुळे भारताच्या सागरी सामर्थ्यात मोठी भर पडणार आहे. याचबरोबर विमानवाहू युद्धनौका निर्माण करण्याची क्षमता बाळगणाऱया निवडक देशांच्या श्रेणीत भारत सामील होईल.
भारतीय नौदलाचे उपप्रमुख व्हाइस ऍडमिरल एस.एन. घोरमाडे यांनी स्वदेशी विमानवाहू युद्धनौका विक्रांत 15 ऑगस्ट रोजी नौदलाच्या ताफ्यात सामील होणार असल्याची माहिती दिली आहे. चालू वर्षात भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. या पार्श्वभूमीवर देशाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका विक्रांत भारतीय नौदलात सामील होईल.
राफेल, एफ-18 हॉर्नेट तैनात होणार
विक्रांत युद्धनौकेवर तैनात करण्यासाठी अलिकडेच फ्रान्सकडून प्राप्त राफेल (मेरीटाइम) आणि अमेरिकेचे एफ-18 हॉर्नेट या लढाऊ विमानांची चाचणी गोव्यातील नौदल तळावर करण्यात आली होती. दोन्ही लढाऊ विमानांच्या चाचणीचा अहवाल प्राप्त झाल्यावर या दोन्हींपैकी कुठले लढाऊ विमान युद्धनौकेवर तैनात करावे, याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत घोरमाडे यांनी म्हटले आहे.
टीईडीबीएफसाठी डीआरडीओचे प्रयत्न
डीआरडीओ देखील स्वदेशी ट्विन इंजिन डेक बेस्ड फायटर म्हणजेच टीईडीबीएफवर काम करत आहे. टीईडीबीएफची निर्मिती होत नाही तोवर राफेल किंवा एफ-18 यापैकी एका प्रकारची लढाऊ विमाने यावर तैनात करण्यात येणार आहेत. याचबरोबर भारतीय नौदलाची दुसरी विमानवाहू युद्धनौका विक्रमादित्यवर तैनात असणारे मिग-21 लढाऊ विमान देखील विक्रांत युद्धनौकेवर तैनात केले जाऊ शकते असे त्यांनी म्हटले आहे.
28 नॉट्स आहे कमाल वेग
कुठल्याही विमानवाहू युद्धनौकेचे बलस्थान हे त्यावर तैनात करण्यात येणारे लढाऊ विमान आणि हेलिकॉप्टर असते. समुद्रात विमानवाहू युद्धनौका एक तरंगता वायुतळ म्हणून काम करत असते. त्यावर तैनात लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर्स शेकडो मैल अंतरापर्यंत सागरी क्षेत्राची सुरक्षा करत असतात. विक्रांत युद्धनौकेचा कमाल वेग 28 नॉट्स असून ती एकाचवेळी 7,500 नॉटिकल मैलाचे अंतर कापू शकते.
262 मीटर लांबी
मागील वर्षी म्हणजेच 2021 मध्ये विक्रांत युद्धनौकेने पहिले सागरी परीक्षण पूर्ण केले होते. विक्रांत युद्धनौका सुमारे 262 मीटर लांबीची आहे, म्हणजे दोन फुटबॉल मैदानांपेक्षा याचा आकार मोठा आहे. विक्रांत युद्धनौकाची रुंदी 62 मीटर तर उंची 50 मीटर आहे. या युद्धनौकेवर सुमारे 30 लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर्स तैनात असतील.









