लेफ्टनंट जनरल बी. एस. राजू यांचे प्रतिपादन
बेंगळूर / वृत्तसंस्था
भारतातील सुरक्षा दलांसाठी आवश्यक असलेल्या सामुग्रीच्या निर्मितीमध्ये खासगी क्षेत्राचा सहभाग वाढत आहे. सुरक्षा दलांसाठी आवश्यक असलेली साधने आता विदेशातून आयात करण्याऐवजी देशातच तयार होऊ लागली आहेत. आधुनिक भारताच्या दृष्टीने हे मोठे यश असून भारतीय लष्कर स्वदेशी आधुनिकीकरणासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल बी. एस. राजू यांनी सोमवारी केले. बेंगळूर येथे आयोजित ‘आर्मी डिझाईन ब्युरो’ कार्यक्रमात ते सहभागी झाले होते.
भारतीय लष्कराने संरक्षण उत्पादनात खासगी क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित केले आहे. आम्हाला खासगी क्षेत्राचा सहभाग वाढवायचा आहे. संरक्षण संशोधन आणि विकास बजेटपैकी 25 टक्के रक्कम स्थानिक उद्योगांसाठी असल्याचे लेफ्टनंट जनरल राजू म्हणाले. गेल्या काही दिवसात केंद्र सरकारने 400 उत्पादने आयात न करण्याचा निर्णय घेतला आहे. या साधनांची निर्मिती आता देशातच स्थानिक पातळीवर केली जात आहे. खासगी उद्योगांना पाठबळ देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून सुरक्षा दलेही आता सज्ज होऊ लागली आहेत. भारतीय लष्कराने येत्या 10 वर्षांत आधुनिकीकरणाकडे वाटचाल करण्याचे ठरवले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संरक्षण क्षेत्रातील भारतीय लष्कराच्या ‘मेक-इन-इंडिया’ उपक्रमांतर्गत ‘एडीबी’ हा भारतातील सर्वात महत्त्वाचा प्रकल्प आहे. ‘आर्मी डिझाईन ब्युरो’ची (एडीबी) स्थापना 2016 मध्ये झाली होती. या प्रकल्पांतर्गत तंत्रज्ञानाचा मागोवा घेणे, फायद्यासाठी आणि विकासासाठी तंत्रज्ञान ओळखणे याबरोबरच उद्योग, शैक्षणिक, संरक्षण आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना प्रोत्साहन देण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडली जात आहे.









