वार्ताहर/ जाकादेवी
वर्षभर कष्ट करून प्रथम श्रेणीत दहावीच्या परीक्षेत यश मिळवले…. खरे तर स्वत:सह कुटुंबाने घेतलेल्या कष्टाचे चिज अनुभवण्याचा, आनंद व्यक्त करण्याचा क्षण ….पण…. हा आनंद घेण्यासाठी ती स्वत:च या जगात नाही अन् तिच्या नसण्यामुळे निकालाच्या आनंदाला कुटुंबियांच्या दृष्टीनेही काही अर्थ राहिलेला नाही.! बुधवारी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात संगमेश्वर तालुक्यातील मांजरे कलकदे कोंड येथील अनुष्का देसाईने 65 टक्के गुण मिळवले पण त्याआधी पाचच दिवस तीने या जगाचा निरोप घेतला होता.
सोमेश्वर विद्यालय विल्ये-मांजरे या शाळेत शिकणाऱया अनुष्का उदय देसाई या होतकरू विद्यार्थिनीला रात्री झोपेत असताना सर्पदंश झाला होता. उपचारासाठा rनेत असतानाच शनिवारी 25 जुलै रोजी तिचा मृत्यू झाला. बुधवारी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात तिला 64.60 टक्व गुण मिळाले.
अतिशय मनमिळावू घरात सर्वांची लाडकी तर शाळेत ती सर्वांची आवडती होती. अनुष्काची आई गेली अनेक वर्षे आजारी असल्याने आपल्या आईची सेवा ती मनापसून करत असे. आपल्या आईची आई होऊन ती करत असलेल्या सेवेचे साऱयांनाच कौतुक होते. 25 जुलै रोजी रात्री विषारी प्राण्याने तिच्या हाताला दंश केला. झोपेत झालेला दंश प्रारंभी तिला समजलाही नाही. त्रास होऊ लागल्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात नेत असतानाच तिची प्राणज्योत मालवली. गुणवान, अभ्यासू आणि कष्टाळू अनुष्काच्या अकाली जाण्याने तिचे आई-वडील कोलमडून पडले . शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब देसाई, शाळेचे मुख्याध्यापक भानुदास देशमुख, जेष्ठ शिक्षक कमलाकर हेदवकर यांबरोबरच शाळेचा सर्व स्टाफ, कुटुंबीय व परिसर अनुष्काच्या जाण्याने शोकाकूल झाला. दहावीच्या निकालाने अनुष्काच्या आठवणीने हे दु:ख आणखी गडद झाले आहे.








