कामाचा इतका धबडगा असतो, त्यात स्वतःसाठी कुठे वेळ काढणार? शक्यच होत नाही, असे बोलणे आपण कित्येक स्त्रियांच्या तोंडून ऐकले आहे. पण अनेकदा काही स्त्रियांची काही बाबतीत आपण कौतुक, थट्टाही करत असतो.
शेजारच्या विमलाबाई थंडी असो, पाऊस असो किंवा उन असो, पहाटे उठून मंदिरात जरूर जातात. कोविडकाळातही त्या बाहेरुन दर्शन घेऊन परतत. त्यात अजिबात खंड पडत नाही. ग्रुपमधली रमा ऑफीस आणि घरात वाट्टेल तेवढे काम असले तरी रात्री आपली आवडती सिरीयल पाहण्यासाठी वेळ काढतेच काढते.
- घरात सकाळपासून रात्रीपर्यंत सगळ्यांची काळजी घेण्यात, घरातील कामाचा डोंगर उपसण्यात धन्यता मानणारी थोरली जाऊ पार्लरला जायचे म्हटले की सगळी कामे बाजूला सारते. अशी अनेक उदाहरणे आपल्या अवतीभवती घडत असतात. ती पाहून आपल्याला आश्चर्यही वाटते. ‘काय हा या बायकांचा वेडेपणा’ असेही वाटते.
- एरवी शहाण्यासुरत्या असणार्या या बायका एखाद्या गोष्टीविषयी इतक्या कशा वेडय़ासारख्या वागतात, याचे आपल्याला आश्चर्य वाटत राहते. पण आपल्याला विचित्र वाटणारी ही सवयच त्यांची ओळख बनलेली असते. ती सवय त्यांना मानसिकदृष्टय़ा तंदुरूस्त ठेवण्यात उपयोगी पडत असते. या स्त्रिया नकळतपणे एखादी सवय अंगी बाणवतात आणि त्यात त्यांना आनंद मिळतो.
- वास्तविक आपल्यासाठी वेळ काढणे आवश्यक असते, पण आपल्या हे लक्षातच येत नाही. त्यामुळे मग मनावर एक नकोसा वाटणारा, अनोळखी तणाव कायम वाटत राहतो.
- हा तणाव आपले शरीर आणि मन दोन्हींवर परिणाम करत असतो. त्यामुळे घरातील संबंध बिघडतात, घरातील वातावरण बिघडते. घरातील इतरांचा विचार न करता स्वतःसाठी थोडासा वेळ काढणे हा काही स्वार्थीपणा नाही, की तुम्हाला त्यामुळे कुणी चैनीखोर म्हणणार नाही.
- प्रत्येकीची स्वतःसाठीचा वेळ व्यतीत करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते. कुणाला फिरायला जायला आवडेल, तर कुणाला पुस्तक वाचायला आवडेल, कुणी टीव्ही पाहील, तर कुणी नुसता चहा किंवा कॉफी पित बसून राहील. सर्वात महत्वाचे आहे ते स्वतःसाठी राखून ठेवलेल्या वेळेत तुम्ही तणावमुक्त होऊन काही काळ निवांत राहणे. मग त्यासाठी तुम्ही काही न करता नुसत्या बसून राहिलात तरी चालेल. ङरात्रीच्या वेळी घराच्या आवारात चक्कर मारणे, पुस्तके वाचणे, योगासने करणे, घरातील ज्येष्ठांशी गप्पा मारणे, अगदी पार्लरमध्येही जाऊन येणे, समाजसेवा करणे अशा अनेक गोष्टींतून तुम्हाला तुमच्या मनाचा निवांतपणा, शांतपणा मिळवता येऊ शकतो. तुमचा हा निवांतपणा किंवा कम्फर्ट झोन शोधा आणि बिनधास्तपणे व्हा निवांत!









