मुख्यमंत्र्यांनी पदावरून बडतर्फ करण्याची प्रवीर फडते यांची मागणी, प्रकल्पाच्या विळख्यात येणाऱया 12 गावांचे अस्तित्व धोक्यात घालण्याचा प्रयत्न
डिचोली/प्रतिनिधी
आमोणा न्हावेली येथे वेदांत कंपनीतर्फे साकारण्यात येणाऱया विस्तारित प्रकल्पांना समर्थन देण्याचे आमोणा सरपंचा सालिया गावस यांचे वक्तव्य पूर्णपणे वैयक्तिक असून त्यांना आमोणा गावची पावर ऑफ एटर्नी कोणीही दिलेली नाही. केवळ आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी सरपंचा सालिय गावस यांनी सदर वक्तव्य केले असून सदर निर्णयाला गावातील लोकांचा कोणत्याही प्रकारच पाठिंबा नाही. स्वतःचे खिसे भरून सरपंच गावस यांनी या प्रकल्पाच्या महाभयंकर प्रदुषणाच्या विळख्यात येणाऱया 12 गावाच्या अस्तित्वार घाला घातलेला आहे. या महाभयानक प्रकल्पांच्या विरोधात इतर पंचायतींनी आपली हरकत असल्याची पत्रे सादर केलेली असून या प्रकल्पांच्या शेजारीच असलेल्या आमोणा पंचायतीच्या सरपंचांनी त्यास समर्थन देऊन कंपनी आपल्यामध्ये झालेल्या सर्व गुप्त व्यवहाराची माहिती लोकांपर्यंत पोहोचविली आहे. त्यांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या पदावरून बडतर्फ करावे, अशी मागणी आमोणा येथील प्रवीर फडते यांनी डिचोली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
यावेळी प्रदीप नाईक, आमोणा कोमुनिदादचे अध्यक्ष यशवंत गावस, स्वागत गावस, नवनाथ गावस, न्हावेली येथील विराज नाईक यांची उपस्थिती होती.
आमोणा गाव ह गाववासीयांचा गाव आहे. सरपंचा सालिया गावस यांनी केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक आहे. आमोणा गाव वेदांतकडे गहाण ठेवण्याची परवानगी त्यांना कोणी दिली. 21 रोजी झालेल्या या प्रकल्पावरील जनसुनावणीत सदर प्रकल्पांच्या भविष्यातील महाभयंकर परिणामांविरोधात अनेकांनी माहिती देत आपला तीव्र विरोध दर्शविला. या प्रकल्पामुळे भविष्यात होणाऱया प्रदुषणामुळे गावांचे आणि गावातील लोकांचे जगणेच मुश्कील होणार असून केवळ रोजगार देण्याच्या हमीवर सदर प्रकल्पाला आपला पाठिंबा दर्शविणे म्हणजे या वक्तव्याच्या बदल्यात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा वास येत आहे, असा संशय यावेळी प्रवीर फडते यांनी व्यक्त केला.
आमोणा ग्रामपंचायतीच्या झालेल्या ग्रामसभेत हा प्रकल्प किती प्रमाणात विनाशकारी आहे, याबाबत माहिती देणारे पत्र सादर केले होते. मात्र सदर विषयाला चर्चेत आणण्यास बगल देण्यात आला. सदर विषय लोकांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने तो चर्चेला घेण्याची विनंती सरपंचांनी धुडकावून लावली. तरीही या विषयावर चर्चा घेण्यात आली. मात्र सरपंचांनी काहीच उत्तर दिले नाही. या प्रकल्पाला केवळ रोजगार मिळविण्याच्या हमीवर समर्थन देताना सरपंचांनी या प्रकल्पाला ईआय अहवाल तपासला आहे का ? समर्थन देण्यापूर्वी सरपंचा सालिया गावस यांनी हा प्रकल्प कशाप्रकारे प्रदुषणकारी नाही आणि त्याचा लोकांच्या आरोग्यावर व जिवनावर, निसर्गावर, प्राणी जनावरांवर परिणाम कसा परिणाम होणार नाही, यासंदर्भात तांत्रिकदृष्टय़ा माहिती द्यावी, अशी मागणी प्रवीर फडते यांनी केली आहे.
आज मुख्यमंत्री असलेल्या डॉ. प्रमोद सावंत यांनी आमदार असताना या सेसा वेदांतच्या प्रकल्पांविषयी विधानसभेत आवाज उठविताना सदर प्रकल्प हा लाल उद्योग असून त्याचा महाभयंकर परिणाम न्हावेली, आमोणा गावातील लोकांवर होणार आहे. तसेच या प्रकल्पामध्ये केवळ बिगरगोमंतकीयांनाच रोजगाराच्या संधी देण्यात येणार असून स्थानिकांवर अन्याय होणार, असे वक्तव्य केले होते. सरपंचा सालिया गवस यांनी मुख्यमंत्र्यांच्या या विधानाच्या विरोधात जात या प्रकल्पाला समर्थन दर्शवून मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचा अपमान केला आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सालिया गावस यांना सरपंच पदावरून बडतर्फ करावे. अशी मागणी फडते यांनी केली आहे. तसेच सरपंचा गावस यांचे पती सदानंद गावस हे वेदांतचे निवृत्त कामगर असून त्यांना आज सेवा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यांना भविष्यातही मुदतवाढ मिळावी यासाठी सरपंचांनी संपूर्ण गावाचे अस्तित्व धोक्मयात टाकले आहे, असा आरोपही यावेळी प्रवीर फडते यांनी केला.
रविवारी झालेल्या जनसुनावणीत जास्तीत जास्त लोकांनी उपस्थिती लावून विरोध दर्शविला. केवळ वेदांतचे कामगार, कंत्राटदार, इतर पध्दतीने अर्थार्जन करणाऱया लोकांनीच समर्थन दिले आहे. लोकांनी केलेला विरोध हा सरपंचांनी दिलेली चांगलीच चपराक असून आता गाव या प्रकल्पांच्या विरोधात संघटीत होत आहे. सरपंचा आणि पंचायत मंडळाला गावाबरोबर राहून गावचे हित जपण्याची शेवटची संधी आहे. त्यासाठी सदर महाभयंकर प्रकल्पांना समर्थन देण्याची चुक करू नये. गावाच्या रक्षणासाठी आम्ही कटिबद्ध असून प्रसंगी कायदा सुव्यवस्थेची परिस्थितीही गावात येणाऱया काळात निर्माण होऊ शकते, असा इशारा फडते यांनी दिला.
मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पांना हरकत असल्याचे पत्र दाखवावे, अन्यथा मतांसाठी न्हावेली गावात येऊ नये
न्हावेली गावात वेदांतचा बिएफ 3 हा प्रकल्प म्हणजे अन्यायच आहे. गावातील लोकांना विश्वासात न घेताच सदर प्ला?ट उभा करण्यात आला होता. लोकांना सदर प्ला?टसंदर्भात ज्यावेळी समजले त्यावेळी हरित लवादाकडे तक्रार करण्यात आली होती. सदर प्ला?ट हा लाल उद्योग असून तो लोकवस्तीत येऊच शकत नाही. असे असतानाही कंपनीने अरेरावी करीत सदर प्ला?ट न्हावेली गावात साकारलाच. या प्रकल्पांसाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्थानिक आमदार या नात्याने हरकत घेणे गरजेचे होते. त्यांनी सदर प्रकल्पाला आपले हरकत असल्याचे पत्र न्हावेली गावात सादर करावे, अन्यथा येणाऱया निवडणुकीत मतांच्या मागणीसाठी न्हावेली गावात येऊच नये, या विषयावर भेटण्यास गेल्यावर ते आमची भे टाळत आहेत, असे विराज नाईक यांनी म्हटले.
वेदांतकडून आमोणा कोमुनिदादची फसवणूक
आमोण कोमुनिदादची सुमारे 30 हजार चोरस मीटर जागा हि 1992 साली 20 वर्षांसाठी सेसा वेदांतला लीज स्वरूपात कृषी उपक्रमांसाठी म्हणून वापरण्यास दिली होती. मात्र आज त्यांनी लाखो चौरस मीटर जागेत व्यवसायिक प्रकल्प थाटले आहेत. सदर लीज 2011 मध्ये संपुष्टात आले, मात्र ते नुतनीकरण करण्यासाठी कंपनीने कोणतीही तयारी दर्शवलेली नाही. याविषयावर सध्या न्यायालयीन खटला चालू आहे. कंपनी कोमुनिदादला देणारे चेक आज कोमुनिदाद स्विकारत नाही. सदर लीज नुतनीकरणासाठी कंपनी तयारीच दाखवत नाही. यासंदर्भात पंचायतींना कितीतरी वेळा पत्रे लिहून कंपनीला कोणत्याही प्रकारचे ना हरकत दाखले देऊ नये अशी विनंती करण्यात आली आहे. मात्र पंचायतही त्याकडे दुर्लक्ष करीत असून पैशांच्या व्यवहारातून त्यांना आवश्यक ना हरकत दाखले देत आहे.आज सदर कोमुनिदादला वेदांत कंपनीकडून सुमारे 10 कोटीची थकबाकी येणे बाकी आहे. त्यांनी या कोमुनिदादचीही फसवणूक केली आहे, असा आरोप कोमुनिदादचे अध्यक्ष यशवंत गावस यांनी केला.









