आजचं शिर्षक वाचून तुम्हाला वाटलं असेल की मी आज गाडीबद्दल माहिती देणार आहे. तुमचा विचार काही चुकीचा नाहीये. मी आज तुम्हाला गाडीबद्दल माहिती देणारच आहे पण चार चाके, चार दारे, चार खिडक्मया असणारी गाडी नव्हे तर तुमच्या आयुष्याच्या गाडीबद्दल आज मी बोलणार आहे. आपण ज्या शरीरात आहोत ते कधीतरी नष्ट होणार आहे, आपला आत्मा अमर आहे, एका ठराविक काळानंतर आपला एक वेगळा प्रवास सुरू होणार आहे. या सर्व गोष्टी आपल्या लक्षात येईपर्यंत आपण आपल्या आयुष्याचा खूप महत्वाचा टप्पा पार केलेला असतो. या काळात आपण खूप लोकांना कामानिमित्त, कार्यक्रमानिमित्त भेटत असतो. काही लोकांना भेटून आपल्याला बरं वाटतं पण काही माणसं का भेटली असा आपण विचार करतो. आपला आत्मा आयुष्याचा प्रवास ज्या गाडीतून करतो म्हणजेच ज्या शरीरातून करतो ते शरीर निरोगी ठेवण्याचे आपण अनेक उपाय करतो पण आपलं जे मन आहे ज्यावर आजूबाजूच्या सर्व गोष्टींचा प्रभाव पडत असतो. त्या मनाला ताब्यात कसं ठेवता येईल हे आपण आजच्या लेखात पाहुया.
Pranic Healing मध्ये मास्टर चोआ यांनी तुम्ही तुमच्या गाडीचे चालक होऊन आयुष्य सुखकर करण्याचे सोपे मार्ग सांगितले आहेत. वाचकहो, आज आपल्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत, ज्या अडचणी आहेत, काही कारणाने जर आपली प्रगती थांबली आहे तर त्याला कारण तुम्ही स्वतः आहात. तुम्ही तुमच्या आयुष्यातील एखादी घटना आठवा ज्याने तुम्हाला फार त्रास झाला आहे. त्या घटनेनंतर तुम्हाला काय वाटलं याचा क्षणभर विचार करा.
उदा. तुम्हाला कुणीतरी तुमची काहीही चूक नसताना काहीतरी बोललं याचा तुम्हाला खूप त्रास झाला तुम्ही त्या व्यक्तीबद्दल खूप राग व्यक्त केला. त्या व्यक्तीने तसं वागायला नको होतं हे तुम्ही सतत म्हणत राहिलात.
प्रत्येकाच्या घटनेचं स्वरूप वेगळं असेल पण कोणत्याही द्वंद्वानंतर आपण समोरच्याने कसं वागायला हवं होतं हे म्हणून मनस्ताप करून घेतो शिवाय त्या व्यक्तीबद्दल द्वेष आपल्या मनात ठेवतो. कोणतीही गोष्ट घडली तर समोरच्याला दोष देतो. एखाद्याला सुधारणा सांगण्यापेक्षा, त्याच्याविषयी राग व्यक्त करण्यापेक्षा आपण स्वतःला कसं बदलू शकतो याचा विचार करूया. कधीतरी आपल्या परिस्थितीची जबाबदारी आपण स्वतः घेऊया. याने आपल्याला त्राससुद्धा कमी होईल शिवाय आपला जीवात्मा त्याची पुढची वाटचाल कोणतेही अडथळे न येता करेल.
विज्ञानाने हे सिद्ध केलेलं आहे की कधी कधी काही लोकांना दीर्घकाळ असणारा आजार हा त्यांनी त्यांच्या भूतकाळातील काही घटना मनात धरून ठेवल्यामुळे तसेच राहिले आहेत. वैद्यकीय उपचार घेऊनसुद्धा जटिल आजार बरे होत नाहीत. जेव्हा असे पेशंट शेवटचा पर्याय म्हणून pranic healing कडे वळतात तेव्हा आम्ही त्यांना पहिल्यांदा ज्या ज्या लोकांनी त्यांना त्यांच्या आयुष्यात खूप दुःख दिलंय त्या लोकांना माफ करायला सांगतो. शिवाय ज्या लोकांना त्यांनी दुःख दिलंय त्यांची माफी मागायला सांगतो. माफ करणे आणि माफी मागणे हा प्रयोग ज्याने त्याने आपल्या मनात करायचा आहे. हा प्रयोग केल्यानंतर जेव्हा आम्ही त्या पेशंटवर उपचार चालू केले तेव्हा त्यांचा जटिल आजारसुद्धा बरा झाला.
हा प्रयोग तुम्हीसुद्धा करून पाहू शकता. हा प्रयोग केल्यावर तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्की बदल झालेला जाणवेल. जेव्हा आपण एखाद्याला माफ करतो तेव्हाच आपणही कुणाच्यातरी माफीस पात्र असतो. एखाद्याबद्दल मनात द्वेष ठेऊन आपण आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं होईल असं नाही म्हणू शकत. Pranic Healing च्या आधीच्या लेखात सांगितल्याप्रमाणे तुम्ही पेराल ते उगवेल आणि तेही शंभर पटीने, हे लक्षात ठेवा. Pranic Healing च्या Soul Realisation वर्गात मास्टर चोआ म्हणतात, आपण देह सोडत असताना परमेश्वर आपल्याला शेवटची एक संधी देतो ज्यात आपण ज्यांचा ज्यांचा राग मनात ठेवला आहे त्यांना माफ करायचं. एका झटक्मयात माफ करणं किती कठीण आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. त्याक्षणी ते आपल्याला जमत नाही आणि आपण जन्म आणि मृत्यूच्या फेऱयातच अडकून राहतो. याउलट जर आयुष्यात आपण ज्या त्या ठिकाणी काही गोष्टी सोडून दिल्या, ज्यांनी आपल्याला दुखावलं आहे त्यांना माफ केलं, ज्यांना आपण दुखावले त्यांची माफी मागितली तर शेवटच्या क्षणी आपण निश्चितच एका वेगळय़ा प्रवासाला जाऊ.
Pranic Healing हे शास्त्र फक्त आजार बरं करण्यासाठी नसून आयुष्य सुखकर करण्याचे मार्ग निवडण्यासाठीसुद्धा महत्त्वपूर्ण आहे. Pranic Healing च्या मदतीने तुम्ही स्वतःचे शरीर निरोगी ठेवाल शिवाय शरीराबरोबरच तुमचं मन देखील निरोगी ठेवाल याची मला खात्री आहे. स्वतःच्या चुकांचं खापर समोरच्यावर फोडू नका. सतत दुसऱयांनी काय केलं पाहिजे हे सांगू नका, सगळय़ा परिस्थितीत तुम्ही काय केलं पाहिजे हे बघा. या लेखाच्या निमित्ताने आता तुम्ही तुमच्या गाडीच स्टेरिंग स्वतःच्या हातात घ्या आणि तुम्ही तुमच्या गाडीचे चालक व्हा.
आज्ञा कोयंडे








