पणगुत्तीजवळ मार्कंडेय नदीपात्रात घटना : उदरनिर्वाहासाठी शेतीबरोबरच करत होता मासेमारीही
प्रतिनिधी / बेळगाव

मासे पकडण्यासाठी मार्कंडेय नदीपात्रात टाकलेल्या जाळय़ात अडकून मच्छीमाराचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सकाळी पणगुत्ती (ता. बेळगाव) जवळ ही घटना घडली असून काकती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
लगमाप्पा भीमाप्पा कोच्चरगी (वय 52, रा. पणगुत्ती) असे दुर्दैवी मच्छीमाराचे नाव आहे. लगमाप्पा हा व्यवसायाने शेतकरी होता. शेतीबरोबरच नजीकच्या मार्कंडेय नदीपत्रात मच्छिमारी करीत होता. मासे विकून आपला उदरनिर्वाह करणाऱया लगमाप्पाच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे.
घटनेची माहिती समजताच काकतीचे पोलीस उपनिरीक्षक आर. टी. लक्कनगौडर व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नदीपात्रातून स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी तो सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात हलविण्यात आला.
लगमाप्पाच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या शेताजवळच लगमाप्पा मासेमारी करत होता. रोज सायंकाळी जाळे टाकून येत होता. दुसऱया दिवशी सकाळी ते ओढण्यासाठी तो जात होता. जाळय़ात मिळालेल्या माशांची विक्री जवळच्या गावात करत होता.
नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी तो टाकलेले जाळे ओढून मासे आणण्यासाठी गेला. तराफ्यातून तो नदीपात्रात उतरला. जाळे काढताना त्याचे पाय जाळय़ात अडकून तो पाण्यात बुडाला. रोज या कामासाठी दोघे जण जात होते. शुक्रवारी लगमाप्पा एकटाच गेला होता. सकाळचे 10 वाजले तरी आपले वडील अद्याप शेताला का आले नाहीत, म्हणून त्यांचा मुलगा बसाप्पा हा नदीपात्रावर त्यांचा शोध घेण्यासाठी गेला. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. काकतीचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर पुढील तपास करीत आहेत.









