नागरिकांनी जागृतपणे स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत सहभागी होणे गरजेचे
प्रतिनिधी /बेळगाव
स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत देशातील प्रत्येक शहराच्या स्वच्छतेचा आढावा घेतला जातो. याकरिता विविध नियमावली तयार करण्यात आली आहे. प्रत्येक शहरातील नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. स्वच्छतेबाबत केवळ महापालिकेकडून विविध उपाययोजना राबविल्या जातात. मात्र जनतेकडून यासाठी कोणतेच सहकार्य मिळत नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. नागरिकांनी जागृत होऊन स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत सहभागी होणे गरजेचे बनले आहे.
स्वच्छ सर्वेक्षण मोहीम राबवून प्रत्येक शहरात स्वच्छतेसाठी जागृती केली जाते. घरोघरी जाऊन कचरा जमा करणे, रस्त्याशेजारील कचराकुंडय़ा हटवून परिसर स्वच्छ ठेवणे, कचऱयाची विल्हेवाट व्यवस्थितपणे लावणे, हॉटेल आणि व्यावसायिक आस्थापनातील कचऱयाची उचल करून त्यावर प्रक्रिया करणे, अशा विविध बाबींचा समावेश यामध्ये आहे. याव्यतिरिक्त शहरातील नागरिकांना स्वच्छतागृह, मुतारी आणि घरोघरी स्वच्छतागृहांची उभारणी अशा प्रत्येक गोष्टीचा विचार केला जातो.
पण शहरात काही मोजक्मयाच ठिकाणी स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात आली आहे. शहरातील लोकसंख्येच्या आधारे आणि बाजारपेठेत ठिकठिकाणी स्वच्छतागृहांची उभारणी करणे बंधनकारक आहे. तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. स्वच्छ सर्वेक्षण योजनेंतर्गत शहरातील सुविधांचा विचार केला जातो. त्याचप्रमाणे उपलब्ध करण्यात आलेल्या सुविधा, स्वच्छतेची साधने आणि नागरिकांचा सहभाग याचाही विचार करून पॉईंट दिले जातात. त्यानंतरच देशात कोणते शहर स्वच्छ आहे, याची घोषणा केली जाते.
पण स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत बेळगाव शहरातील नागरिकांचा सहभाग अत्यल्प आहे. काही मोजकेच नागरिक या मोहिमेत सहभागी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. वास्तविक पाहता नागरिकांनी स्वच्छ सर्वेक्षण योजनेमध्ये आपली प्रतिक्रिया नोंदविणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहभागी होणे गरजेचे आहे. कचऱयाचे ढिगारे साचले की केवळ तक्रार केली जाते. पण शहरात स्वच्छता ठेवण्यासाठी आपले योगदान गरजेचे आहे, याचा विचार केला जात नाही. घरोघरी जाऊन कचऱयाची उचल करूनदेखील नागरिक रस्त्यावर किंवा गटारीमध्ये कचरा टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळेच परिसर अस्वच्छ आणि गटार व नाले कचऱयाने तुडुंब भरल्याचे आढळून आले आहे. ‘स्वच्छतेसाठी एक पाऊल पुढे….’असे घोषवाक्मय करण्यात आले आहे. मात्र एक पाऊल पुढे टाकण्याऐवजी प्रत्येक जण एक पाऊल मागे घेत असल्याचे दिसून आले आहे. आपल्या परिसराच्या आणि शहराच्या स्वच्छतेसाठी नागरिकांनी सहभाग घेणे गरजेचे असल्याचे मत महापालिका अधिकारी व्यक्त करीत आहेत.









