प्रतिनिधी/ कराड
स्वच्छ सर्वेक्षण 2020 च्या अनुषगांने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील महापालिकांचे आयुक्त व नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री अनिल परब, मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास सचिव मनिषा म्हैसकर उपस्थित होते. यावेळी गत सालच्या स्पर्धेत 1 लाख लोकसंख्येच्या आतील शहरांमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवणाऱया कराड नगरपालिकेच्या यावर्षीच्या तयारीची माहिती मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतली. मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी, यावर्षीच्या स्पर्धेतही कराड देशात प्रथम आणण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांना दिली. तसेच कराडला भेट देण्याचे निमंत्रणही दिले.
नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी सादरीकरणाद्वारे स्वच्छ महाराष्ट्र अभियानात आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा सादर केला. यावेळी बृहन्मुंबई, नाशिक, नवी मुंबई, औरंगाबाद या महापालिकाच्या आयुक्तांनी तसेच लोणावळा व कराड नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱयांनी स्वच्छ सर्वेक्षणात होत असलेल्या प्रगतीची माहिती दिली. मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्र्यांना माहिती देताना कराडमध्ये कचऱयाचे 100 टक्के संकलन, वर्गीकरण व प्रक्रिया, मलनि:स्सारण प्रक्रिया, लोकसहभाग याबाबत माहिती दिली. 2020 सालच्या स्पर्धेसाठी अनेक नगरपालिकांनी चांगली तयारी केली आहे. कराड नगरपालिकाही जय्यत तयारीने सज्ज असून यावर्षी प्रथम येण्यासाठी प्रयत्न करू, असा शब्द त्यांनी कराडकरांच्या वतीने दिला. तसेच कराडमध्ये नगरपालिकेने लोकसहभागातून राबवलेल्या विविध उपक्रमांची पाहणी करण्यासाठी भेट देण्याची विनंतीही केली. नगरविकास सचिव मनिषा म्हैसकर यांनी कराड व लोणावळा शहरांची स्वच्छ सर्वेक्षणमधील कामगिरी चांगली असल्याचे सांगत यावर्षीही या दोन्ही शहरांकडून यशाची अपेक्षा असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये महाराष्ट्रातील शहरे अव्वल येण्यासाठी छोटय़ा शहरांबरोबरच मोठय़ा शहरांनीही एक टीम म्हणून काम करावे. कचरामुक्त शहरांसाठी घनकचरा व्यवस्थापनचा राज्याचा विस्तृत प्रकल्प आराखडा तयार करावा, अशा सूचना दिल्या. शहरे स्वच्छ व सुंदर करण्यासाठी प्रत्येक शहरामध्ये नागरिकांना आनंद देणारी सुंदर उद्याने निर्माण करावीत, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, राज्यातील शहरे स्वच्छतेत अग्रेसर राहण्यासाठी सर्वच जण चांगले काम करत आहेत. मात्र, सर्वेक्षणात राज्यातील जास्तीत जास्त शहरांना पहिल्या दहामध्ये मानांकन मिळण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक अधिकाऱयाने सामान्य नागरिक म्हणून आपल्या शहरांकडे पाहणे आवश्यक आहे. राज्यातील कचरामुक्तीसाठी राज्यस्तरीय एकत्रित आराखडा तयार करावा. यामध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्प, या प्रकल्पाच्या ठिकाणी हरित पट्टा, कचरा विलगीकरण आदींचा समावेश असावा. अमृत वन योजनेअंतर्गत शहरातील मोकळ्या जागांवर वन निर्माण करणाऱया बार्शी, नवी मुंबई, नाशिक, सांगली, उदगीर, अचलपूर आदी शहरांचे कौतुक केले.









