प्रतिनिधी/ सातारा
सातारा पालिकेचे अधिकारी व आरोग्य विभागाकडून स्वच्छ सर्व्हेक्षण 2020 मध्ये साताऱयाचा नंबर यावा यासाठी धडपड सुरु आहे. रविवारी अंतिम पथक येत असल्याने पालिकेने हे काम मिशन मोडवर येवून करण्यास प्रारंभ केला आहे. रस्ते स्वच्छ चकाचक दिसण्याकरता आरोग्यचे बिगारी हे झाडू घेवून दिवसरात्र काम करत असल्याचे दिसत आहे. आरोग्यचे अधिकारीही व्यस्त आहेत. असे असतानाच वैद्यकीय कचरा मात्र काही कुपमंडूक प्रवृत्तीचे लोक कचराकुंडीत नेमके टाकत आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई पालिकेकडून होणार काय?, असा सवाल उपस्थित होवू लागला आहे.
सातारा शहर स्वच्छ भारत मिशनच्या स्वच्छ सर्व्हेक्षणात पहिल्या दहामध्ये येण्याकरता मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्यासह सर्वच कर्मचारी व अधिकारी झपाटून कामाला लागले आहेत. मुख्य पाहणीकरता पथक रविवारी येणार असल्याचे खात्रीशीर माहिती आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या बिगारी आणि अधिकाऱयांनी पायाला भिंगरी लावली आहे. जेथे जेथे कचरा साठलेला दिसतो आहे. तो उचलून टाकण्याची पळापळ सुरु आहे. सध्या सगळीकडेच सफाई करताना दिसत असल्याचे चित्र पहायला मिळते आहे. बांधकाम विभागाच्या नावावर असलेला टीपर अतिक्रमण हटावच्या दिमतीला असायचा सध्या तो कचरा उचलण्यासाठी वापरत असल्याचे दिसून येत आहे. वास्तविक अशी सगळी धडपड सुरु असताना सातारा शहरातील वैद्यकीय कचऱयावर उपाययोजना होताना दिसत नाही. शहरातील न्यू इग्लिंश स्कूलच्या परिसरातही नुकताच वैद्यकीय कचरा आढळून आला आहे. तसेच तीन दिवसांपूर्वीही जुने सातारा हॉस्पिटलच्या पाठीमागील कचरा कुंडीत वैद्यकीय कचरा आढळून आला आहे. त्या कचऱयाचे फोटो तरुण भारतचे वाचक व सामाजिक कार्यकर्ते नितीन पवार यांनी तरुण भारतला दिले. त्याबाबत मुख्याधिकारी शंकर गोरे आणि उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांनाही विचारणा केली.धुमाळ यांनी माहिती घेवून सांगतो अशी कॉमेंट दिली परंतु प्रत्यक्षात त्यावर उत्तर किंवा कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. त्यांच्या पाठीमागे सर्व्हेक्षणाचा व्याप असण्याची शक्यता आहे. काही नागरिकांकडून वैद्यकीय कचरा जाणीवपूवर्क रस्त्यावर टाकण्याचा प्रकार घडत आहे. त्यामुळे खो बसत आहे.
तसा कचरा टाकता येत नाही
जैविक कचरा रस्त्यावर टाकता येत नाही. तो कचरा टाकून साताऱयाची प्रतिमा धुळीला मिळवली जात आहे. अशा लोकांच्यावर पालिकेने कारवाई करणे अपेक्षित आहे. कारवाई झाल्याशिवाय असले प्रकार थांबणार नाहीत.
नितीन पवार सामाजिक कार्यकर्ते









