किरण ठाकुर यांचे आवाहन : गव्हर्निंग कौन्सिलच्या नूतन चेअरमनपदी निवड : व्यवस्थापन मंडळ ‘बॉस’ नसून संस्थेचे सेवक
प्रतिनिधी / बेळगाव
‘स्वच्छ व पारदर्शी व्यवहार’ हे ब्रिद समोर ठेवून एसकेई सोसायटीच्या विकासासाठी आपण निरपेक्षपणे काम करणार आहे. या सोसायटीचा व तिच्या कक्षेतील सर्व शैक्षणिक संस्थांचा कायापालट करण्यासाठी सर्वांचे सहकार्य हवे, अशी अपेक्षा एसकेई सोसायटीच्या गव्हर्निंग कौन्सिलचे नूतन चेअरमन किरण ठाकुर यांनी व्यक्त केली.
मंगळवारी दुपारी कौन्सिलच्या सर्वसाधारण सभेत नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. या सभेत चेअरमन म्हणून किरण ठाकुर यांची निवड झाली. गुरुवारी सकाळी सोसायटीच्या आरपीडी-जीएसएस कॉलेजच्या परिसरातील डॉ. गोविंद वामन हेरेकर यांच्या समाधीला अभिवादन करून त्यांनी पुष्पांजली अर्पण केली. सोसायटीच्या स्थापनेत सिंहाचा वाटा असणारे डॉ. जी. व्ही. हेरेकर, बाबुराव ठाकुर, राणी पार्वती देवी, गोविंदराम सक्सेरिया, अण्णासाहेब लठ्ठे, व्ही. व्ही. हेरवाडकर यांच्या लायब्ररीमधील प्रतिमांना किरण ठाकुर व रोमा ठाकुर यांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. यानंतर झालेल्या कार्यक्रमात किरण ठाकुर यांनी ही अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी व्यासपीठावर अजय आजगावकर, शरद वालावलकर, ऍड. राज देशपांडे, विनायक आजगावकर, रोमा ठाकुर, एस. वाय. प्रभू आदी उपस्थित होते.
यानंतर बोलताना किरण ठाकुर म्हणाले, हे कॉलेज सावंतवाडीहून आणण्यासाठी तात्या व आ. ना. आजगावकर, भाई हेरेकर, चतुरदास शहा, बी. जी. देशपांडे, अण्णासाहेब लठ्ठे, गंगाधरराव देशपांडे यांनी अविरत प्रयत्न केले. गोविंदराव हेरेकर यांनी त्यावेळी 50 हजार रुपयांची व गोविंदराम सक्सेरिया यांनी 1 लाख रुपयांची देणगी दिली. माझ्या वडिलांनी शेकडो शाळा काढल्या. त्यामध्ये 55 कानडी शाळा व एक उर्दु शाळा काढली. 1937 ला मराठी टीचर्स ट्रेनिंग कॉलेज काढले. शिक्षणाबद्दलची या सर्वांचीच तळमळ लक्षात घेऊन या सर्वांचे ऋण आपण मानले पाहिजेत.
आपले वडील बाबुराव ठाकुर दहा वर्षे गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन होते. त्यांच्या कार्याचा वारसा आपण पुढे चालविणार आहोत. ‘भ्रष्टाचारमुक्त स्वच्छ कारभार आणि निरपेक्ष सेवा’ यावर आपल्या सर्वांचा भर असला पाहिजे. पूर्वीच्या लोकांनी उत्तम काम केले आहे. तीच परंपरा पुढे चालवायची आहे. आता काळानुरुप शिक्षण क्षेत्रात बदल होत आहेत. तसे ते संस्थेतही बदल झाले पाहिजेत. समांतर विद्यापीठ, रात्रीच्या शाळा ही काळाची गरज आहे. या सर्व बदलांसाठी आणि विकासासाठी संस्थेतील प्रत्येकाचे सहकार्य अपेक्षित आहे, असेही किरण ठाकुर म्हणाले.
आरपीडी पीयू कॉलेजचे प्राचार्य काशिनाथ मेळेद यांनी या संस्थेत कधीही भाषाभेद झालेला नाही. पात्रतेला येथे महत्त्व आहे, असे सांगून किरण ठाकुर यांचे अभिनंदन केले. येथील व्यक्ती निवृत्त झाल्या तरी संस्थेच्या हाकेला धावून येतील, असे आश्वासन दिले.
सिटीझन्स कौन्सिलतर्फे सतीश तेंडोलकर यांनी किरण ठाकुर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. संस्थेला दूरदृष्टी असणाऱया व्यक्तीची नितांत गरज होती. ती आता पूर्ण झाली आहे. किरण ठाकुर यांना अनेक संस्था चालविण्याचा अनुभव आहे. लोकांसाठी काम करण्याची तळमळ आहे. त्यामुळे संस्थेचा विकास निश्चितच होणार आहे. आपण सर्वजण त्यांचे हात बळकट करूया, असे ते म्हणाले. यावेळी बाळासाहेब काकतकर यांनी पुष्पगुच्छ देऊन किरण ठाकुर यांचे अभिनंदन केले. आरपीडीच्या प्राचार्या डॉ. शोभा नाईक यांनी सूत्रसंचालन केले.









