प्रतिनिधी/ बेळगाव
शहरातील अस्वच्छतेबाबत महापालिकेकडे तसेच जनहित ऑनलाईन प्रणालीद्वारे तक्रारी करूनही याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे स्वच्छता निरीक्षकांची बैठक घेऊन सदर तक्रारी तातडीने निकालात काढा, असा आदेश आरोग्य अधिकारी व पर्यावरण साहाय्यक कार्यकारी अभियंत्यांनी बजावला. याबाबत दुर्लक्ष केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही स्वच्छता निरीक्षकांना देण्यात आला आहे.
शहरात सर्वत्र कचऱयाचे साम्राज्य निर्माण झाले असून जिकडे तिकडे अस्वच्छता पसरली आहे. ठिकठिकाणी कचऱयाचे ढिगारे साचल्याने दुर्गंधी पसरून रहिवाशांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. घरोघरी जाऊन कचऱयाची उचल करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. पण प्रत्यक्षात कचरागाडी नियमितपणे येत नसल्याच्या तक्रारी होत आहेत. शहराच्या प्रत्येक कोपऱयावर कचऱयाचे ढिगारे साचत आहेत. त्यामुळे स्मार्ट शहराला कचऱयाचा वेढा पडला आहे. याबाबत महापालिकेकडे तक्रारी करूनही याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे नागरिकांनी जनहित ऑनलाईन प्रणालीद्वारे तक्रारी नोंदविल्या आहेत. पण याचीही दखल घेण्यात येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नगर विकास खात्याकडूनच याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाला विचारणा करण्यात आली आहे. ‘जनहित’ प्रणालीवर आलेल्या ऑनलाईन तक्रारी तातडीने सोडविण्यात याव्यात, अशी सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्य अधिकाऱयांनी महापालिकेच्या सर्व स्वच्छता निरीक्षकांची मंगळवारी बैठक घेऊन स्वच्छतेबाबत सूचना केल्या.
स्वच्छता निरीक्षकांना सक्त ताकीद
जनहित प्रणालीवर करण्यात आलेल्या तक्रारींचे निवारण तातडीने करून त्याबाबतचा अहवाल ऑनलाईन नोंद करा. सार्वजनिक बांधकाम विभागाबाबत तक्रारी असल्यास त्याबाबत रिपोर्ट देण्याची सूचना आरोग्य अधिकाऱयांनी केली. स्वच्छतेबाबत करण्यात आलेल्या तक्रारींचे निवारण त्याच दिवशी झाले पाहिजे, अशी सक्त ताकीद स्वच्छता निरीक्षकांना देण्यात आली.
यावेळी पर्यावरण साहाय्यक कार्यकारी अभियंते महांतेश नरसण्णावर, पर्यावरण साहाय्यक अभियंते प्रवीण किलारी, अभियंत्या महादेवी आदींसह स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.









