स्वच्छता कंत्राटदारांची आयुक्तांना विनंती
प्रतिनिधी / बेळगाव
महापालिका हंगामी स्वच्छता कामगारांचे वेतन मागील तीन महिन्यापासून थकले आहे. ऑनलाईन स्वच्छता कामगारांचे वेतन वेळेत अदा करण्यात येत आहे. त्याप्रमाणेच हंगामी स्वच्छता कामगारांचे वेतन वेळेवर देण्यात यावे, अशी मागणी यापूर्वी महापालिकेकडे करण्यात आली होती. पण अद्यापही वेतन देण्यात आले नसल्याने स्वच्छता कंत्राटदाराने शुक्रवारी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन वेतन अदा करण्याची विनंती केली.
शहराची स्वच्छता करण्यासाठी हंगामी तत्त्वावर कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र 1100 स्वच्छता कामगारांपैकी 548 कामगारांना ऑनलाईन वेतन देण्यात येते. या कामगारांचे वेतन वेळेवर करण्यात येत आहे. मात्र हंगामी तत्त्वावर स्वच्छता काम करणाऱया कामगारांचे वेतन मागील 3 महिन्यांपासून थकले आहे. कोरोना कालावधीत स्वच्छतेचे काम वेळेत करूनही वेतन वेळेत मिळत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी आरोग्य विभागातील अधिकाऱयांची भेट घेऊन थकित वेतन देण्याची मागणी करण्यात आली होती. वेतन न दिल्यास काम थांबविण्याचा इशारा देखील देण्यात आला होता. मात्र अद्यापही वेतन देण्यात आले नाही. त्यामुळे स्वच्छता कंत्राटदारांनी शुक्रवारी नवनिर्वाचित पर्यावरण सहाय्यक कार्यकारी अभियंते हणमंत कलादगी यांची भेट घेऊन स्वागत केले. तसेच स्वच्छता कामगारांचे वेतन देण्याची विनंती केली. त्याचप्रमाणे महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांची भेट घेऊन तीन महिन्यापासून वेतन थकले असल्याची माहिती दिली. स्वच्छता कामगारांना वेतन देताना अडचणी येत असल्याचे स्वच्छता कंत्राटदारांनी महापालिका आयुक्तांना सांगितले. तसेच तातडीने वेतन देण्यात यावे अशी विनंती केली.
दोन दिवसात व्यवस्था
येत्या दोन दिवसात थकीत वेतन देण्याची व्यवस्था करण्यात येईल असे आश्वासन महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी स्वच्छता कंत्राटदारांना दिले. यावेळी शहरातील स्वच्छता कंत्राटदार उपस्थित होते.









