मालमत्ताधारकांतून नाराजी : सर्व्हिस चार्ज आकारणी रद्द करण्याची आग्रही मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
घरपट्टीबरोबर विविध उपकर महापालिकेकडून घेतले जातात. स्वच्छता कर आकारण्यात येतो. मात्र, मागील वर्षापासून स्वच्छता व्यवस्थापन सर्व्हिस चार्जीसच्या नावाखाली प्रति 1 हजार चौरस फुटांसाठी 480 रुपये कर आकारण्याचा सपाटा महापालिकेने चालविला आहे. हा कर आकारण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात आल्यानंतर कर कमी करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, यंदाच्या घरपट्टीसोबत हा कर आकारण्यात येत असल्याने मालमत्ताधारकांना भुर्दंड बसत आहे.
दर तीन वर्षांनी घरपट्टीत 15 टक्क्मयांची वाढ करण्यात येते. त्याचबरोबर उपकरामध्येही वाढ होते. त्यामुळे मालमत्ताधारकांना घरपट्टी भरणे डोईजड बनत आहे. अशातच महापालिकेने आणि नगरविकास खात्याने विविध शुल्कांच्या नावाखाली मालमत्ताधारकांची लूट चालविली असल्याचा आरोप होत आहे. मनपाकडून 360 रुपये स्वच्छता शुल्क वसूल केला जातो. मागील वर्षापासून स्वच्छता व्यवस्थापन सर्व्हिस चार्जच्या नावाखाली पैसे वसूल करण्याचा सपाटा चालविला आहे. प्रति हजार चौरस मीटरच्या इमारतीसाठी 480 रुपये सर्व्हिस चार्ज आकारण्यात येत आहे. त्यामुळे 1000 चौरस मीटरच्या इमारतधारकांना स्वच्छता व्यवस्थापन करापोटी 360 रुपये आणि 480 रुपये असे एकूण 840 रुपये भरावे लागत आहेत.
कचरा व्यवस्थापन कराच्या नावाखाली दुप्पट शुल्क आकारण्याचा प्रकार मागील वर्षापासून सुरू आहे. 1000 चौरस फुटांपेक्षा जास्त आकाराच्या इमारती असल्यास 480 रुपयांनी वाढ होत आहे. त्यामुळे मोठय़ा इमारतधारकांना याचा फटका बसत आहे. स्वच्छता कराच्या नावाखाली दुप्पट भुर्दंड भरावा लागत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मागील वषीपासून सर्व्हिस चार्ज आकारण्यात येत असल्याने याबाबत नागरिकांनी तसेच माजी नगरसेवक संघटनेने आक्षेप घेतला होता. याबाबत महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले होते. मात्र, नगरविकास खात्याच्या आदेशानुसार सर्व्हिस चार्ज आकारणे बंधनकारक असल्याचे आयुक्तांनी सांगून ही शुल्क आकारणी सुरूच ठेवली. त्यामुळे माजी नगरसेवक संघटनेने जिल्हा पालकमंत्री, जिल्हाधिकाऱयांची भेट घेऊन याबाबत तक्रार केली होती. त्यामुळे महापालिका आयुक्तांना सर्व्हिस चार्ज शुल्क आकारणी करण्यात येऊ नये, अशी सूचना करण्यात आली होती. सदर सर्व्हिस चार्ज आकारणीबाबत नगरविकास खात्याशी पत्रव्यवहार करून निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले होते. शुल्क आकारणी तात्पुरती स्थगित ठेवण्याचे आश्वासन देऊन संगणकात बदल करण्यासाठी पत्र पाठविले होते. मात्र, 2021-22 च्या घरपट्टीत कचरा व्यवस्थापन सर्व्हिस चार्जची आकारणी करण्यात आली आहे.
दुप्पट रक्कम भरण्याबाबत आक्षेप
स्वच्छतेसाठी इमारतधारकांना दुप्पट रक्कम भरावी लागत असल्याने याबाबत आक्षेप घेण्यात आला आहे. स्वच्छता व्यवस्थापन करापोटी एकच रक्कम आकारण्यात यावी, तसेच कचरा व्यवस्थापन सर्व्हिस चार्ज आकारणी रद्द करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.









