प्रतिनिधी/ बेळगाव
परप्रांतीय कामगारांना स्वगृही पाठविण्यासाठी कामगार खात्याकडून नोंदणी करून घेण्यात आली आहे. तसेच रेल्वेचे तिकीट काढून त्यांना पोहचविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण 660 कामगारांची जाण्याची व्यवस्था झाली असून झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेश आदी राज्यातील परप्रांतीय कामगार जाण्यासाठी सज्ज झाले आहेत.
लॉकडाऊनमुळे शेकडो परप्रांतीय कामगार बेळगावात अडकले आहेत. 1781 कामगारांनी आपल्या राज्यात जाण्यासाठी नोंदणी केली आहे. यापैकी 660 कामगारांनी कामगार खात्याकडे नेंदणी करून रेल्वेच्या तिकीटासाठी पैसे भरले आहेत. अशा कामगारांना हुबळी मार्गे जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. झारखंडला जाणाऱया 156 कामगारांपैकी 100 जण दि. 19 रोजी रवाना होणार आहेत. त्याकरिता हुबळीपर्यंत बसने सोडण्यात येणार आहे. त्यानंतर रेल्वेने जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. बिहार जाण्यासाठी 250 कामगारांनी तिकीटे घेतली आहेत. दि. 20 रोजी रेल्वे जाणार आहे. तर उत्तर प्रदेशला जाणाऱया 254 कामगारांनी कामगार खात्याकडे नोंदणी केली आहे. त्यांना जाण्यासाठी दि. 21 रोजीच्या रेल्वेचे आरक्षण करण्यात आले आहे. तसेच पश्चिम बंगाल आणि मध्यप्रदेशला जाण्यासाठी 80 कामगारांनी नोंदणी केली आहे. पण रेल्वे प्रशासनाने ही रेल्वे सेवा सुरु केली नाही. तर ही सेवा सुरु केल्यानंतर त्यांना पाठविण्याची व्यवस्थान करण्यात येणार असल्याची माहिती कामगार खात्याचे उपायुक्त वेंकटेश सिंदीहट्टी यांनी दिली.









