मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे स्वतःकडे आणि परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन विवेकपूर्ण आणि वास्तववादी नसेल तर वरकरणी अगदी छोटय़ा वाटणाऱया गोष्टीतूनही अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. माणसाचा स्वभाव आणि स्वभाव म्हणून स्थिरावणारा त्याचा जो दृष्टिकोन तयार होत असतो तो अनेक घटकांमधून आकार घेत असतो. जन्मापासून कुटुंबातील व्यक्तींकडून, विशेषतः आई-वडिलांकडून होणारे संस्कार, नातेवाईक, शेजारी, शिक्षक, सहकारी, पुस्तके यामधून मिळणारे विचार, अनुभव हे एखाद्या व्यक्तीची जणू लाईफस्क्रिप्टच तयार करत असतात. अर्थात, शारीरिक मानसिक विकासाच्या टप्प्यावर त्यातही बदल होत असतात. काही विचार मागे पडतात, काही आपण नव्याने अंगीकारत असतो. काहीवेळा वर्तनातही विसंगती अनुभवायला मिळते. परंतु, हळूहळू काही वैशिष्टय़े स्थिर होत जातात आणि विचारांची एक चौकट झाली की आपण त्याला ‘स्वभाव’ म्हणू लागतो. मग येणारे अनुभव त्या चौकटीतच तपासले जातात. अनेकदा ते विचार तर्कशून्य, अवास्तव असले तरी त्या चौकटीबाहेर पडून ते पडताळण्याची तयारी नसली की, संघर्ष आणि समस्या उत्पन्न होतात. जरी अनुवंश आणि परिस्थिती यामधून स्वभावाची जडघडण होत असली तरी त्यात योग्य बदलाची जाणीव आणि बदलायची तयारी ठेवणे गरजेचे आहे. ज्यांना हे जमते त्यांच्या जीवनाची वाटचाल सुकर होते. ज्यांना हे जमत नाही त्यांना आपण हट्टी म्हणतो आणि हा हट्टीपणा हेकटपणाकडे कधी वाटचाल करतो हे कळतही नाही.
अर्थात स्वतःला आणि इतरांनाही त्रासदायक ठरतील अशा काही गोष्टी प्रत्येकामध्ये असतात. परंतु ते कळण्यासाठी प्रयत्नपूर्वक स्वतःच्या अंतरंगात डोकावून पाहणे, अशा स्वभाव वैशिष्टय़ांचा शोध घेऊन त्यात विवेकाने बदल आवश्यक ठरतो. विवेक या शब्दाचा अर्थ चांगले-वाईट, योग्य-अयोग्य, बरोबर-चूक हे नेमकेपणाने कळणे आणि भावनेच्या आहारी न जाता परिणामांचा विचार करून निर्णय आणि कृती करणे. यामुळे एखाद्या घटनेचा, प्रसंगाचा विविध अंगानी विचार करता येतो आणि एखादी निर्माण झालेली समस्या, तिची योग्य पद्धतीने मांडणी आणि त्या समस्येचे निराकरण करण्यासाठी वा तिच्या समाधानासाठी उपलब्ध असलेल्या विविध पर्यायांची जाण येते.
जसे विचार तशा भावना उत्पन्न होत असतात. चुकीच्या विचारपद्धती मधून चिंता, भीती, अस्वस्थता, मत्सर, वैरभाव हे सारे निर्माण होते. उदाहरणातून हे स्पष्ट करता येईल. मीना आणि नेहा या दोन मैत्रिणी बाजारात खरेदी करत होत्या. बाजारात खूप गर्दी होती. त्यांना त्या गर्दीमध्ये त्यांची कॉमन प्रेंड सीमा दिसली. (पूर्वी सीमाची आर्थिक स्थिती अगदी बेताची होती. तिला शाळेत असताना वेळोवेळी या दोघींनीही लागेल ते सहाय्य केले होते.) तिने खरेदी केली आणि ती भराभर निघून गेली. खरंतर या दोघी तिथे असतील हे सीमाच्या ध्यानीमनीही नव्हते. गर्दीत तिला ते कळले नाही. मीनाने हे वास्तव लक्षात घेतले आणि ती गोष्ट तिथेच सोडून दिली परंतु नेहाला राग आला. सीमा ज्या क्षणी तिथून गेली त्याक्षणी हिचे विचारचक्र सुरू झाले होते. छॅ, आता मोठी झाली, मिजास आली. समोर येऊन साधे पाहिलेही नाही. हिच्यासाठी एवढं केलं पण ही विसरली सारं. कसली एवढी मिजास कुणास ठाऊक? अशा माणसांसोबत संबंध नसलेलेच बरे. आता मीच बोलणार नाही. वगैरे..
नेहाने वास्तव लक्षात घेतले असते तर झालेला मानसिक त्रास आणि नंतर निर्माण झालेला दुरावा टाळता आला असता. परंतु मी केलेली मदत सीमाने कधीही विसरता कामा नये. ती कायम स्मरणात ठेवून तिने माझी दखल घेतलीच पाहिजे हा दृष्टिकोन नेहाने मनात रुजवला होता. म्हणजेच माणूस सभोवताली घडणाऱया गोष्टींचा अर्थ कसा लावतो यावर बऱयाच गोष्टी अवलंबून असतात. घटना घडताक्षणी निर्माण होणाऱया स्वगताकडे जर लक्ष नसेल, ते वास्तवाला धरून नसेल तर तापदायक भावना निर्माण होतात. कुठलीही घटना घडल्यानंतर जे आपण आपल्या मनाशी बोलतो ते स्वगत इतक्मया क्षणार्धात घडते की अनेकदा त्याची आपल्याला जाणीवही होत नाही. वीज चमकावी आणि गायब व्हावी इतक्मया झटक्मयात ते घडते. परंतु त्याचे परिणाम मात्र आपल्या भावनांतून, वर्तनातून दिसतात. आपल्याला होणारा त्रास टिकवून ठेवण्याचे काम ‘स्वगत’ करत असते. आपल्या समजुतींच्या आधारावर बोललेल्या स्वगताची जर आपण खडसून छाननी केली तर अधिक विवेकपूर्ण विचार करणे शक्मय असते. व्यक्तीच्या मनात खोलवर दडलेल्या गैरसमजुतींची जाणीव करून देऊन डॉ. एलिस यांनी सांगितलेल्या विवेकनि÷ भावोपचार तंत्राद्वारे चर्चा, युक्तीवाद, विचार योग्य आहेत हे सिद्ध करून दाखविण्यास सांगणे अशा पद्धतीने विचारांना फारकत देऊन विवेकपूर्ण विचार आत्मसात करायला शिकविले जाते. दृष्टिकोनात जर बदल करता आला तर व्यक्तीच्या परस्परसंबंधातही सुधारणा होते. मानसोपचार तज्ञ डॉ. अल्बर्ट एलिस यांनी सांगितलेल्या तंत्रातील हे टप्पे सूत्ररूपात असे मांडता येतील.
अ-घटना (जसे अपयश, अन्याय, हानी, प्रेमभंग इ.) ब-विचार पद्धती (व्यक्तीच्या त्या घटनेसंदर्भातील धारणा व त्यासंदर्भातील तिचे स्वगत/स्वतःशी होणारे संभाषण)
क-घटनेचा भावनिक परिणाम (भीती, दु:ख, चीड, नैराश्य इ.) त्याचा वर्तनावर होणारा दुष्परिणाम. ड-स्वगताला आव्हान/ब टप्प्यावरील विचारांची तर्कशुद्ध छाननी (म्हणजे ‘अ’ संबंधी ‘ब’ मध्ये होणाऱया स्वगतातील अविवेकी भावना ओळखून उचित बदल घडवून आणणे) यासाठी चर्चा, वादविवाद याचा अवलंब करावा लागतो. इ-उपचारांचा परिणाम-मानसिक शांती.
पहा, घटना या घडत असतात. अनेकदा त्यावर आपले काहीच नियंत्रण नसते परंतु त्या संदर्भात जे आपण आपल्या मनाशी बोलत असतो अर्थात आपले ‘स्वगत’ ते मात्र विवेकपूर्ण करता येते. तसे झाले तर स्वतःमध्ये उचित बदल घडवून आणत मानसिक शांती लाभते. माणसाच्या मनातील काही अवास्तव समजुती दु:खास कारणीभूत ठरतात.
1) मला सर्वांनी चांगलेच म्हटले पाहिजे. 2) मला नेहमी यशच मिळायला हवे/अपयश येता कामा नये. 3)कोणतीही गैरसोय, दु:ख वाटय़ाला येता कामा नये. माणसाने सुख, यश, प्रशंसा याबाबतचा अट्टहास थोडा बाजूला केला तरी बऱयाच गोष्टी सोप्या होतील.
विवेकपूर्ण विचार आपल्याला विकासाच्या दिशेने नेतात. संघर्ष, ताणतणाव, मानसिक अस्वास्थ्य यापासून व्यक्ती दूर राहू शकते. आपल्या विचारसरणीत बदल घडवून आणायचा असेल तर ‘स्वगता’कडे लक्ष देणे गरजेचे आहे. जर आपण त्रासदायक विचारांनी त्रस्त असलो तर ते विचार आणि त्या अनुषंगाने होणारे स्वगत लिहून काढले आणि नोंदलेल्या विचारांच्या मुळाशी दडलेल्या अवाजवी धारणांचा निष्पक्षपणे शोध घेतला तर विवेकपूर्ण विचार जाणीवपूर्वक आत्मसात करता येतील आणि खऱया अर्थाने विकासाच्या दिशेने वाटचाल होईल!
Ad. सुमेधा देसाई&, मो.94226 11583








