भारतीय रेल्वेची नवीन योजना : कमी खर्चात उत्तम प्रवासाची सुविधा मिळणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन रोज एक नवीन पाऊल उचलत आहे. यावेळी रेल्वेला सामान्य नागरिकांना एसी कोचमध्ये कमी भाडय़ाने प्रवास करण्याची सुविधा द्यायची आहे. यासाठी रेल्वेने स्लीपर व गैर-राखीव श्रेणी (अनारक्षित) कोच एसी कोचमध्ये रुपांतरित करण्याची योजना तयार केली आहे. रेल्वे याच्या माध्यमातून देशभरात एसी गाडय़ा आणण्याची योजना आखत आहे, ज्यामुळे प्रवाशांना कमी खर्चात उत्तम प्रवासाची सुविधा मिळेल. अपग्रेड केलेल्या स्लीपर कोचला इकोनॉमिकल एसी 3-टियर म्हटले जाईल, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱयांनी दिली.
एसी 3-टियरमध्ये 72 ऐवजी असतील 83 बर्थ
टेन कोच फॅक्टरी कपूरथलाला स्लीपर कोच एसी कोचमध्ये रुपांतरित करण्याचे काम देण्यात आले आहे. या नवीन इकोनॉमिकल एसी 3-टियरमध्ये 72 बर्थ ऐवजी 83 बर्थ असतील. सुरुवातीला या कोचला एसी-3 टियर टूरिस्ट क्लास देखील म्हटले जाणार आहे. या गाडय़ांचे भाडेदेखील स्वस्त होईल, जेणेकरून प्रवासी यात प्रवास करू शकतील. पहिल्या टप्प्यात असे 230 डब्बे तयार केले जातील.
3 कोटी रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक कोच बनवण्यासाठी अंदाजित किंमत 2.8 ते 3 कोटी रुपये खर्च येईल. हा खर्च एसी 3-टियर बनवण्याच्या खर्चापेक्षा 10 टक्के जास्त आहे. मात्र जास्त बर्थ आणि मागणीमुळे रेल्वेला इकॉनॉमिक एसी 3-टियरकडून चांगली कमाई अपेक्षित आहे. याशिवाय अनारक्षित सामान्य वर्ग क्लासचे डब्बेही 100 आसनी एसी कोचमध्ये रुपांतर केले जातील. यासाठी डिझाइन अंतिम करण्यात येत आहे.
यापूर्वीही अशी योजना
2004-09 दरम्यान संपुआ-1 सरकारच्या काळात इकोनॉमिकल एसी 3-टियर क्लास डब्यांना तयार करण्याची योजना केली होती. त्याच वेळी गरीब रथ एक्स्प्रेस गाडय़ा सुरू करण्यात आल्या होत्या, ज्यांना एसी इकॉनॉमी क्लास म्हटले गेले. मात्र प्रवाशांनी त्यात प्रवास करताना अडचणीबद्दल सांगितले. तसेच रेल्वेमध्ये गर्दीची परिस्थिती सुरू झाल्यानंतर अशा पद्धतीच्या कोचचे उत्पादन बंद केले गेले होते.









