इस्रायलकडून खरेदी : ड्रोन्स पाडविता येणार : नौदलाचे बळ वाढणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
इस्रायलकडून स्मॅश 200 प्लस फायर कंट्रोल यंत्रणा खरेदीच्या व्यवहाराला भारतीय नौदलाने मंजुरी दिली आहे. ही नवी यंत्रणा शत्रूचा ड्रोन हल्ला किंवा त्याच्याशी संबंधित माहिती जमविण्यास अत्यंत महत्त्वाचे अस्त्र ठरणार आहे. ही यंत्रणा कुठल्याही रायफलवर माउंट (बसविता) करता येणार आहे. दिवसा तसेच रात्रीच्या वेळी आकाशात उडणाऱया छोटय़ा ड्रोन्सनाही ही यंत्रणा लक्ष्य करू शकते अशी माहिती नौदलाने दिली आहे.
इस्रायलच्या स्मार्ट शूटर या कंपनीने स्मॅश 2000 ची निर्मिती केली आहे. याचे मुख्य कार्य ड्रोन हल्ले हाणून पाडणे आहे. चीनच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर ही यंत्रणा अत्यंत उपयुक्त ठरू शकते. एका स्मॅश-2000 ची किंमत 10 लाख रुपयांपेक्षाही कमी आहे. या यंत्रणेद्वारे शत्रूच्या ड्रोनला 120 मीटर अंतरावरूनच पाडविता येणार आहे.
छोटे ड्रोन अलिकडच्या काळात भारतासाठी धोक्याचे ठरू लागले आहेत. एकाचवेळी अनेक छोटय़ा ड्रोन्सचा वापर करण्यात आल्यास ते अधिकच धोकादायक ठरू शकतात.
स्मॅश 2000 यंत्रणेद्वारा होणारा लक्ष्यभेद अत्यंत अचूक असतो. स्वतःच्या कक्षेत येणाऱया वस्तूला ही यंत्रणा क्षणार्धात नष्ट करते. तसेच ही यंत्रणा स्थिर तसेच हलणाऱया लक्ष्यांचाही भेद करू शकते. भारतीय सैन्य ही यंत्रणा एके-47/103 रायफल्सवर बसविणार आहे.
नौदलाचे बळ वाढणार
भारतीय नौदल सागरी सीमांवर सातत्याने बळ वाढवत आहे. चीनसोबतच्या तणावादरम्यान यावर विशेष लक्ष दिले जात आहे. हिंदी महासागरात चीनच्या अनेक युद्धनौका दिसून आल्या आहेत. अशा स्थितीत त्यांच्याकडून होणाऱया कुठल्याही धोक्यासंबंधी भारतीय नौदल दक्ष आहे. नौदलाने अलिकडेच अमेरिकेकडून प्रिडेटर ड्रोन प्राप्त केले आहेत. दोन महिन्यांपूर्वीच नौदलाने पाणबुडीविरोधी यंत्रणेने सज्ज आयएनएस कवरत्तीचा स्वतःच्या ताफ्यात समावेश केला आहे.