गतजन्मातील सारे काही अजुनी आपल्याला कसे स्मरते व सांगता येते याची कारण मीमांसा सांगताना नृगराजा पुढे
म्हणतो-
दास्यविषयींच सापेक्ष । फलशेविषयीं जो निरपेक्ष। अनन्यबोधें जो अपरोक्ष । वर्तोनि दक्ष व्यवहारिं ।सम्यक म्हणिजे बरव्यापारी । तव दर्शनीं प्रेमा पुरी । ते तूं म्हणसी कवणेपरी । ऐक मुरारि निरूपितों ।मेघमुखें जळ निवडलें । सकंचुकीं गगनीं चढलें । पवनें जडत्वा वरपडलें। नरका जालें जळ असतां ।अपरोक्षबोधें जलत्वा जाणें । जडत्वें व्यवहारिं वर्तणें । त्या जैं सागरिं समरसपणें। ऐक्मय पावणें फावतसे ।तेंवि वाच्यांश शबलांश । निरसितां जीवेश्वर निःशेष। निर्विकल्प स्वसामरस्य। व्यतिरेक दर्शन त्या नाम। निर्विकल्प ब्रह्मात्मबोध। ओतप्रोत ब्रह्मानंद। गूळगोडीचा नोहे भेद । तेंवि अभेद सगुणत्वीं । दृष्य द्रष्टा आणि दर्शन । ये त्रिपुटीचें गोचर ज्ञान। तेंचि मुख्यत्वें भवभान । अधि÷ान सुखदुःखा । संकल्पविकल्पाचें निज । हेंचि जन्ममरणाचें बीज। हेंचि अधोर्ध्वगतीचें काज । विरक्ता लाज हे दशा। ऐसिये त्रिपुटीचिया वयुनें। सगुणदर्शन वांछिती मनें। सम्यक् दर्शनार्थी त्यांलागीं म्हणणें । न घडे जाणें केशवा । अंधापायीं स्वर्णगोटा । लागतां उपेक्षी करंटा । तेंवि वास्तवज्ञानेंवीण चेष्टा । सगुण निर्गुण अवघ्याचि । राया म्हणसी वस्तुसामर्थ्य। तरी तें ऐकें यथातथ्य। योगभ्रष्टावीण पथ्य । नोहे निश्चित इतरांसी । नामस्मरणें चक्रपाणि । प्रल्हादाच्या संकतश्रेणी। निरसी तें नाम आतां कोणी । दृढ होवोनि न स्मरती। प्रल्हादाचा दृढ निश्चय । तैसा ज्या आंगीं प्रत्यय। तोचि योगभ्रष्ट निश्चय । सर्व कविवर्य जाणती । निश्चयाचे नुघडती डोळे । संकल्पविकल्पें बुद्धि तरळे । सकामसाधनें वरिवरी बरळे । करितां होपळ ते होती । दृढनिश्चयें स्थिरावला । योगभ्रष्ट म्हणिजे त्याला । संकल्पविकल्पें जो तरळला । म्हणिजे त्याला भवग्रस्त । योग करितां झाला भ्रष्ट। ते न म्हणावे वृथा कष्ट । मार्गें जातां चुकला वाट। पुन्हा तो नीट पथ लाहे । असो विस्तारें कारण काय। कुरुभूपाल तो नृगराय । स्मृतीचें कारण कथिता होय । तो अन्वय अवधारिं । ब्रह्मण्या वदान्या मज तव दासा। सम्यक्दर्शनाची पिपासा। यास्तव अद्यापि मम स्मृति नाशा। न पवे परेशा निर्धारें । ऐसा कथूनि निजाधिकार। पुढतीं अघटित लाभ थोर। मानूनि कृष्णेंसीं उत्तर । आश्चर्यकर
बोलतसे ।
नृगराजा सांगतो- हे प्रभो! मी ब्राह्मणांचा सेवक, दानशूर आणि आपला भक्त होतो. आपले दर्शन व्हावे, अशी माझी उत्कट इच्छा होती. आपल्या कृपेनेच माझी पूर्वजन्माची आठवण अजून नाहीशी झाली
नाही.
विभो समर्था भो हृषीकेशी । तो तूं कैसा मम नयनांसी । साक्षात् प्रत्यक्षगोचर होसी । हें आश्चर्य मानसीं मज वाटे । तो तूं म्हणिजे कोण कैसा । जो योगेश्वरिं श्रुतिडोळसां । अमळमानसांमाजी ठसा । भावनेचा पाडियला ।
Ad. देवदत्त परुळेकर








