खासगी गुंतवणुकीच्या माध्यमातून राबविण्यात येणारे प्रकल्प रखडले
प्रतिनिधी/ बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकासकामे राबविण्यासाठी महापालिकेने 3800 कोटींचा प्रस्ताव तयार केला होता. यापैकी 2800 कोटींची विकासकामे बांधा, वापरा आणि हस्तांतर या तत्त्वावर खासगी गुंतवणुकीद्वारे राबविण्यात येणार होती. यापैकी गुंतवणूकदारांनी पाठ फिरविल्याने मागविण्यात आलेल्या निविदेला थंडा प्रतिसाद लाभला आहे. त्यामुळे आता सातव्यांदा निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
स्मार्ट सिटी योजना राबविण्याकरिता महापालिका प्रशासनाने 3800 कोटींचा प्रस्ताव तयार केला होता. यापैकी प्रत्येकी एक हजार कोटीचे निधी केंद्र व राज्य शासनाने मंजूर केले आहेत. उर्वरित विकासकामे बांधा, वापरा आणि हस्तांतर करा या तत्त्वावर राबविण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, यापैकी काही विकासकामे राबविण्यास कंपन्या इच्छुक नसल्याने सदर प्रस्ताव वगळण्यात आले आहेत. केंद व राज्य शासनाकडून देण्यात येणाऱया एक हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे या निधीमधून विकासकामे राबविण्यात येत आहेत. पण खासगी गुंतवणुकीच्या माध्यमातून एकही काम सुरू करण्यात आले नाही.
धर्मनाथ भवन येथे तसेच पहिले रेल्वेगेट आणि विविध ठिकाणी खासगी गुंतवणुकीच्या माध्यमातून स्मार्ट सिटी कंपनीकडून बहुमजली व्यापारी संकुल उभारण्याचा प्रस्ताव राबविण्यात येणार आहे. सरकारी कार्यालयात सौरऊर्जा प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी कंपनीने धर्मनाथ भवन येथे खासगी गुंतवणुकीच्या माध्यमातून बहुमजली व्यापारी संकुलाची उभारणी करण्याकरिता 145 कोटींचा प्रस्ताव तयार करून निविदा मागविली होती. सरकारी कार्यालयांच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यासाठी तीन कोटींचा प्रस्ताव तयार करून निविदा मागविली होती. पण या दोन्ही प्रकल्पांच्या निविदा प्रक्रियेला गुंतवणूकदारांकडून प्रतिसाद लाभला नाही. आतापर्यंत सहावेळा निविदा मागविण्यात आली, पण गुंतवणूकदारांनी याकडे पाठ फिरविली आहे. शहरातील व्यवसाय आणि अन्य पार्श्वभूमीच्या आधारावर गुंतवणूकदार गुंतवणूक करतात. इतकी मोठी रक्कम गुंतविल्यास फायदा होईल का? असा मुद्दा उपस्थित होत असल्याने गुंतवणूकदारांनी पाठ फिरविली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
स्मार्ट सिटीचा प्रकल्प अर्धवट राहण्याची चिन्हे
यामुळे प्रकल्पाची माहिती देण्यासह गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीच्यावतीने गुंतवणूकदारांची बैठक आयोजित केली होती. त्यामुळे आता धर्मनाथ भवन येथील प्रकल्पासह सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यासाठी सातव्यांदा निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यावेळी तरी सदर प्रकल्प राबविण्यासाठी गुंतवणूकदार मिळणार का? याकडे लक्ष लागले आहे. गुंतवणूकदारांचा प्रतिसाद लाभत नसल्याने स्मार्ट सिटी योजनेचे प्रकल्प मार्गी लागणे धुसर बनले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीचा प्रकल्प अर्धवट राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.









