प्रतिनिधी/ बेळगाव
शहरात सर्वत्र स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत. त्याचे साहित्य सर्वत्र पसरले आहे. पेव्हर्स ब्लॉक, खडी, वाळू, वायरचे बंडल असे सर्व साहित्य शहरात पसरले आहे. मात्र, सखेद आश्चर्याची बाब म्हणजे बहुसंख्य नागरिक हे साहित्य परस्पर आपल्या घरी नेत असून त्यातून घरातील डागडुजी करत आहेत. दुर्दैव म्हणजे अधिकाऱयांना याचा पत्ताच नाही.
धर्मवीर संभाजी चौकात पेव्हर्स ब्लॉक घालण्यासाठी आणून ठेवले आहेत. मात्र, बहुसंख्य नागरिक आणि काही वाहनचालक बिनदिक्कत हे पेव्हर्स गाडीवर ठेवून अथवा पोत्यात घालून घरी नेत आहेत. याचप्रकारे खडी, वाळू आदी साहित्यही घेऊन जात आहेत. परस्परांच्या संगनमताने हा व्यवहार सुरू असल्याने ‘तेरी भी चुप, मेरी भी चुप’ या सूत्राने हे साहित्य नेण्यात येत आहे. स्मार्ट सिटीच्या एकूण कामाबद्दलच अनेक तर्कवितर्क करण्यात येत आहेत. एकाच वेळी सर्व काम हाती घेतल्याने त्यावर लक्ष ठेवणे कठीण झाले आहे. याचाच फायदा घेऊन सहजपणे उपलब्ध असलेले पेव्हर्स, सिमेंट, वाळू, खडी हे साहित्य बिनदिक्कत नेण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने अधिकाधिक घेऊन साहित्याची चोरी रोखण्यासाठी पुढाकार घेतील का? असा प्रश्न नागरिक करत आहेत.









