प्रतिनिधी/ बेळगाव
स्मार्ट सिटीची स्वप्ने पाहणाऱया शहरवासियांना नाल्यावरून ये-जा करण्यासाठी साकवाचा आधार घेण्याची वेळ आली आहे. ओरिएंटल स्कूलच्या मागील बाजूस असलेल्या नाल्यावर पूल बांधण्याची मागणी करण्यात आली होती. पण याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले असल्याने ये-जा करण्यासाठी साकव घालण्यात आला. सदर साकव निकृष्ट दर्जाचा असून यावरून शाळेची मुले ये-जा करीत असल्यामुळे धोका निर्माण झाला आहे.
पावसाळय़ाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नाले स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. काँग्रेस रोडकडून ईस्कॉन मंदिरच्या मागील बाजूने गोवावेसकडे एक नाला वाहतो. नाल्यावर ये-जा करण्यासाठी काही नागरिकांनी पाईप घालून तात्पुरता रस्ता केला होता. ईस्कॉन मंदिरामागील बाजूस राहणाऱया नागरिकांना तसेच टिळकवाडी भागातील नागरिकांना व विद्यार्थ्याना ओरिएंटल शाळेमध्ये ये-जा करण्यासाठी गोवावेसमार्गे जावून मराठा मंदिरकडून यावे लागत होते. यामुळे नाल्यावर पाईप घालून तयार केलेल्या तात्पुरत्या रस्त्याचा उपयोग ओरिएंटल शाळेत जाणारे विद्यार्थी तसेच येथील रहिवासी करीत होते. मात्र सदर पाईपमध्ये कचरा अडकून रहात आहे. तसेच नाल्याची स्वच्छता व्यवस्थित झाली नसल्याने नाल्याचे पाणी परिसरातील रहिवासी वसाहतीमध्ये घुसले होते. याची दखल घेऊन तातडीने नाल्यांची स्वच्छता करण्याची कार्यवाही महापालिकेच्यावतीने राबविण्यात आली आहे. तसेच नाल्यावर घातलेल्या पाईपमुळे नाल्यातील पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे नाला स्वच्छता करताना घालण्यात आलेल्या पाईप काढण्यात आल्या. यामुळे ओरिएंटल शाळेकडून ईस्कॉन मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या रहिवासी कॉलनीचा संपर्क तुटला आहे. ये-जा करण्यासाठी विद्युतखांब, फळय़ा घालून साकव करण्यात आला आहे. शाळेमध्ये ये-जा करणाऱया विद्यार्थ्यांना व पालकांना मराठा मंदिरकडून गोवावेसमार्गे ये-जा करावी लागत आहे. हे अंतर खूपच असल्याने सदर साकवाचा आधार घेत आहेत. पण हे साकव नित्कृष्टदर्जाचे असल्याने ये-जा करणाऱया विद्यार्थ्यांना व नागरिकांना धोकादायक बनले आहे. लहान शाळकरी मुलेदेखील यावरून जात असल्याने नाल्यात पडण्याचा धोका आहे.