प्रतिनिधी / बेळगाव
टिळकवाडी भागातील विविध रस्त्यांचा विकास स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात येत आहे. रस्ते करताना सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी तसेच अन्य वाहिन्या घालण्यासाठी रस्त्यांमध्ये लहान पाईप घालण्यात येत आहेत. मात्र सदर पाईप फुटक्मया असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या कामासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात येत असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
स्मार्ट सिटी योजनेतील कामांबाबत वारंवार तक्रारी करण्यात येत आहेत. सदर कामे वेळेवर होत नाहीत. निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. तरीदेखील स्मार्ट सिटी योजनेच्या कामाचा दर्जा सुधारला नाही. त्यामुळे नागरिकांतून तक्रारी वाढल्या आहेत. टिळकवाडी भागातील विविध रस्त्यांचा विकास करण्याचे काम सुरू आहे. रस्त्याच्या मधोमध पाईप घालण्यात येत असून सदर पाईप फुटलेल्या आहेत. चांगल्या दर्जाचे साहित्य वापरण्याऐवजी फुटलेल्या पाईपचा वापर करून कामे रेटून नेण्याचा प्रकार सुरू आहे. दर्जा तपासून काम करण्यात येत असल्याचा कांगावा स्मार्ट सिटी कंपनीचे अधिकारी करीत असतात. पण टिळकवाडी भागातील या साहित्याचा दर्जा तपासला नाही का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. कामे करताना स्मार्ट सिटी कंपनीचे अधिकारी उपस्थित राहणे आवश्यक आहे. अधिकाऱयांच्या देखतच साहित्याचा वापर करणे गरजेचे आहे. मात्र, कामे सुरू असलेल्या ठिकाणी स्मार्ट सिटी कंपनीचे अधिकारी कधी फिरकतच नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळेच निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात येत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
शहरात कोटय़वधीची विकासकामे राबविण्यात येत आहेत. त्याकरिता अशा प्रकारचे निकृष्ट साहित्य वापरण्यात आले आहे का? अशी विचारणा नागरिक करीत आहेत. सदर कामाची पाहणी करून कंत्राटदाराची चौकशी करण्यात यावी व आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.