क्लब रोडवरील डेनेजची नव्याने बांधकामासाठी खोदाई केल्याने अडचण
प्रतिनिधी / बेळगाव
स्मार्ट सिटीच्या कामांचा फटका व्यावसायिकांना बसल्याचे दिसून येत आहे. स्मार्ट सिटीच्या अर्धवट राबविण्यात आलेल्या विकासकामांना ब्रेक लागल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. तसेच या अर्धवट कामांमुळे व्यावसायिक डबघाईला आले आहेत. ही परिस्थिती गेल्या दोन महिन्यांपासून जैसे थे असून व्यावसायिकांची डोकेदुखी वाढली आहे.
येथील क्लब रोडवरील रस्त्याचे एका बाजूचे व्हाईट टॉपिंगचे काम करून दोन महिने उलटले तरी अद्यापही या मार्गावरील वाहतूक बंद आहे. तसेच येथील गटारी व डेनेजचे नव्याने बांधकाम करण्याकरिता खोदाई करण्यात आली आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून हे काम रखडलेले पाहायला मिळत आहे. दोन दिवसांत येथील गटारीचे बांधकाम करून देऊ, असे आश्वासन कंत्राटदाराने व्यावसायिकांना दिले होते. मात्र पंधरा दिवस उलटून गेले तरी कंत्राटदाराने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे व्यावसायिकांमध्ये संतापाची लाट उसळली
आहे.
दोन महिन्यांपूर्वी बंद करण्यात आलेल्या रस्त्यामुळे आधीच व्यावसायिक अडचणीत आले होते. त्यात आता पंधरा दिवसांपूर्वी दुकानांसमोर खोदाई करण्यात आल्यामुळे ग्राहकांनीदेखील खरेदीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे येथील व्यावसायिकांतून स्मार्ट सिटीच्या कामात होत असलेल्या दिरंगाईमुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तसेच पावसाळय़ापूर्वी येथील काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.









