अनगोळ मुख्य रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करा : सर्वसामान्य जनतेची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनगोळ मुख्य रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. या कामाची गती पाहता हे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्यामुळे अनगोळ परिसरातील नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दोन्ही बाजूला रस्त्याचे काम याचबरोबर पार्किंग यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. अर्धवट परिस्थितीत अनेक कामे रखडली आहेत. स्मार्ट सिटीची कामे म्हणजे स्मार्ट कोंडी झाल्याची चर्चा सुरू आहे. मुख्य रस्त्यावर अनेक हॉस्पिटल, विविध व्यावसायिक, फेरीवाले याचबरोबर बैठे व्यापारी आपला व्यवसाय करत आहेत. मात्र या वाहतूक कोंडीमुळे या सर्वच व्यावसायिकांना मोठा फटका बसू लागला आहे.
या रस्त्यावर अनेक बँका व सोसायटय़ा आहेत. त्यामुळे बँकांना जाणाऱया वृद्ध व्यक्तींना व महिलांना त्याचा मोठा त्रास होत आहे. या रस्त्यावर हॉटेल्स देखील आहेत. त्या ठिकाणी चहा पिण्यासाठी येणाऱया व्यक्तींनाही फटका बसत असून यामुळे व्यावसायिकांना मोठा फटका बसताना दिसत आहे. कोरोनामुळे एक तर व्यवसाय नाही. त्यातच या कामांमुळे अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे व्यावसायिकही या स्मार्ट सिटीच्या कामाला अक्षरशः कंटाळले आहेत.

रस्त्याचे काम कासवगतीने
सध्याचे युग इतके वेगवान झाले आहे की प्रत्येकाला वेळ मिळणे कठीण असते. अशा या धावत्या युगातच या रस्त्याच्या कामाची गती मात्र कासवासारखी झाली आहे. याबाबत अनेकवेळा बातम्या प्रसिद्ध झाल्या. एकवेळ खोदाई करायची त्यानंतर काँक्रिट घालायचे. ते काँक्रिट अर्धवट ठेवायचे, 15 दिवस काम बंद करायचे. अचानक पुन्हा खोदाई करायची असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे हे काम कधी पूर्ण होणार, असा प्रश्न साऱयांनाच पडला आहे.
डेनेज पाणी व विद्युत वाहिनी घालण्यास सुरुवात

रस्त्याचे काम अर्धवट असतानाच अनगोळ नाका ते मृत्युंजयनगर, भाग्यनगर कॉर्नरपर्यंत एका बाजुने डेनेजची पाईप घालण्यात आली आहे. पण हरिमंदिरच्या बाजुने डेनेजची पाईपलाईन घालण्यात आली नाही. याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे पुन्हा आता ही पाईपलाईन घालण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
मुख्य रस्त्याच्या एका बाजूला काही महिन्यांपासून कामाला सुरुवात होते तर दुसऱया बाजुला ड्रेनेजचे पाईप घातले जात आहेत. याचबरोबर पाण्याच्या पाईप यांची समस्याही उद्भवत आहे. वीजवाहिनी, पाण्याची पाईपलाईन रस्ता करण्यापूर्वीच घालणे गरजेचे होते. मात्र रस्ता करून पुन्हा तो खोदाई केला जात आहे. अशा प्रकारांमुळे अडथळे निर्माण होत आहेत. तेंव्हा याचा गांभीर्याने विचार करून नियोजनबद्धरित्या रस्त्याचे काम करावे, अशी मागणी अनगोळवासियांतून व्यक्त करण्यात येत आहे.
रस्त्यावरच पार्किंग
कामे सुरू असल्यामुळे रस्त्यावरच पार्किंग केली जात आहे. चारचाकी वाहने रस्त्यावर उभी करण्यात येत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे वादाचे प्रसंगही घडत आहेत. दिवसेंदिवस गंभीर परिस्थिती निर्माण होत असून तातडीने तोडगा काढून हे काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
स्मार्ट सिटीच्या अधिकाऱयांचे दुर्लक्ष
स्मार्ट सिटी अंतर्गत अनेक ठिकाणी कामे सुरू आहेत. मात्र स्मार्ट सिटीच्या अधिकाऱयांचे या कामांकडे दुर्लक्ष होत आहे. बऱयाच ठिकाणी संथगतीने ही कामे सुरू आहेत. गटारीचे काँक्रिटीकरण असो किंवा रस्त्याचे काँक्रिटीकरण असूदेत त्याचा वेग अत्यंत कमी आहे. बऱयाच ठिकाणी खोदाई करताना पाईप फुटत आहेत. मात्र त्याची दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. तेंव्हा स्मार्ट सिटीच्या अधिकाऱयांनी आता गांभीर्याने लक्ष द्यावे आणि ही सर्व कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी अनगोळ परिसरातील नागरिकांकडून होत आहे.









