प्रतिनिधी/ बेळगाव
स्मार्ट सिटी प्रकल्पाचे संचालक, अधिकारी व कंत्राटदार हे बेळगावकरांच्या सहनशीलतेचा अंत बघत आहेत. गेल्या आठ महिन्यात स्मार्ट सिटीच्या कामामुळे बेळगावकरांना एकाही चांगल्या रस्त्याचे दर्शन झाले नाही की त्याचा लाभ घेता आला नाही. उलटपक्षी रस्त्यांच्या कामामुळे बेळगावकरांचे अतोनात हाल मात्र होत आहेत.
याचेच प्रत्यंतर आणून देणारी एक घटना सोमवारी केळकरबाग येथे घडली. धर्मवीर संभाजी चौकापासून केळकर बागेकडे जाणाऱया रस्त्यावर कंत्राटदाराने खडी पसरवून तशीच सोडली आहे. तेथेच एक चेंबर खुले ठेवण्यात आले आहे. या चेंबरचा अंदाज न आल्याने एका कार चालकाची कार तेथे अडकली आणि कारचे नुकसान झाले. लोकांच्या मदतीने ही कार बाजूला काढताना चालकाच्या नाकीनऊ आले.
येथे टाकण्यात आलेल्या खडीमुळे केवळ वाहनचालकांनाच नव्हे तर पादचाऱयांनासुद्धा त्रास सहन करावा लागत आहे. या खडीवरून वाहन चालवणेच नव्हे तर चालणेसुद्धा कठीण होत आहे. संभाजी चौकातून किर्लोस्कर रोडमार्गे अलीकडे गर्दी वाढली आहे. त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी व गर्दी टाळण्यासाठी वाहनचालक व पादचारी केळकर बागेतून ये-जा करतात. परंतु ही खडी आणि चेंबर त्यांच्यासाठी धोकादायक होत आहे.
संबंधित अधिकाऱयांनी याकडे लक्ष द्यावे व कंत्राटदाराला समज देऊन हा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी होत आहे.









