मंत्री बसवराज यांनी केल्या अधिकाऱयांना सूचना, मनपा सभागृहात प्रगती आढावा बैठक
बेळगाव : / प्रतिनिधी
स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेली सर्व कामे जलदगतीने वेळेत पूर्ण करा, प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावून सर्वसामान्य नागरिकांचा त्रास कमी करा, अशी सूचना राज्याचे नगर विकासमंत्री बी. ए. बसवराज यांनी आयोजित प्रगती आढावा बैठकीत स्मार्ट सिटी व नगरविकास प्राधिकरणाच्या अधिकाऱयांना केली. सदर बैठक शनिवारी मनपा सभागृहात झाली.
स्मार्ट सिटी अंतर्गत विकासासाठी मोठय़ा प्रमाणात निधी मंजूर झाला असून देखील शहरातील अनेक विकासकामे रखडली असल्याचे सांगत मंत्री बी. ए. बसवराज यांनी अधिकाऱयांना धारेवर धरले. तसेच शहरातील स्मार्ट सिटीचे काम दर्जात्मक होण्यासाठी अधिकाऱयांनी नियमित कामाचा आढावा घ्यावा, मध्यवर्ती बसस्थानकाचे काम पावसाळय़ापूर्वी पूर्ण करून प्रवाशांची गैरसोय टाळा, तसेच शहरातील विकासकामे वेळेत पूर्ण करा, अशा सूचना केल्या. दरम्यान शहरातील ठिकठिकाणी विकास कामाची पाहणी करून प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याचे आदेश दिले.
व्यासपीठावर मनपा आयुक्त जगदीश के. एच., बुडा अध्यक्ष घोळाप्पा होसमणी, स्मार्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक शशिधर कुरेर, आमदार अनिल बेनके उपस्थित होते. शहरात सुरू असलेल्या विकास कामाचा आढावा घेताना मनपा आयुक्त जगदीश के. एच. म्हणाले, शहरात आराखडे राखून विकासकामे राबविण्यात येत आहेत. तसेच काही कामे प्रलंबित तर काही प्रगतीपथावर आहेत.
बेळगाव शहराची स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ग्रीन सिटीकडे वाटचाल सुरू असून शहरातील विविध भागात नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. शहरात प्लास्टिक बंदी असून महानगरपालिकेच्या प्लास्टिक विरोधी पथकाने प्लास्टिक वापरणाऱयांवर कारवाई करून दंड वसूल केला आहे. त्याबरोबर व्हाईट टॉपिंग, ई-अस्ती, वसती योजना, प्रधानमंत्री आवास योजना राबवून विकास साधण्यात येत असल्याचे मनपा आयुक्त जगदेश. के. एच. यांनी सांगितले.
केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानातून स्मार्ट सिटीचा विकास साधण्यात येत असून या अंतर्गत स्मार्ट बसस्थानक, ई-टॉयलेट, ट्रामा सेंटर, जलशुद्धीकरण प्रकल्प, रुग्णवाहिका, सायकल ट्रक, रस्ते, फुटपाथ व स्मार्ट क्लास रूम उभारण्यात येत असल्याचे स्मार्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक शशिधर कुरेर यांनी स्मार्ट सिटीचा आढावा घेताना सांगितले. यावेळी बुडाचे अध्यक्ष गोळाप्पा होसमणी यांनीही विकास कामाचा आढावा घेतला.
नगरविकासमंत्री बसवराज यांनी न्यायालयाच्या समोरील भुयारी मार्गाला भेट दिली असता हा मार्ग चुकीच्या पद्धतीने झाला असून यामुळे येथून ये-जा करणे त्रासाचे बनले आहे. तेव्हा हा मार्ग नव्याने तयार करण्यात यावा, अशी मागणी वकिलांनी केली.