पाच वर्षे उलटली तरी निम्मेच काम पूर्ण : तात्पुरत्या बसस्थानकात प्रवाशांची गैरसोय : चार वेळा मुदत वाढवूनही डिसेंबरअखेर पूर्ण होणे अशक्य
प्रतिनिधी /बेळगाव
मध्यवर्ती बसस्थानकात उभारण्यात येत असलेल्या स्मार्ट बसस्थानकाचे काम संथगतीने सुरू आहे. कामाला सुरुवात होऊन पाच वर्षांहून अधिक काळ उलटला तरीही अद्याप निम्मे काम शिल्लक आहे. संथगतीने सुरू असलेल्या बसस्थानकाचे काम कधी पूर्ण होणार, असा संतप्त सवाल प्रवाशांतून उपस्थित होत आहे. नवीन बसस्थानकाचे काम तातडीने पूर्ण करून प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करावे, अशी मागणी प्रवासीवर्गातून होत आहे.
मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात स्मार्ट सिटीअंतर्गत तब्बल 30 कोटी रुपयांच्या निधीतून सुसज्ज बसस्थानक उभारण्यात येत आहे. मात्र, पाच वर्षांपूर्वी हाती घेतलेले हे काम अद्यापही अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे या कामासाठी अजून किती वर्षे लागणार आहेत, असा प्रश्नही सर्वसामान्यांना पडत आहे. बसस्थानकाचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी अंतर्गत भागातील फरशी, पेव्हर्स, खिडक्मया, ग्रील, इलेक्ट्रीक फिटींग, आसन व्यवस्था, बस फलक, कार्यालयीन फर्निचर यासह इतर कामे रखडली आहेत. त्यामुळे अर्धवट स्थितीत असलेल्या बसस्थानकाचे काम कधी पूर्ण होणार, या प्रतीक्षेत बसचालक, वाहक व प्रवासी आहेत.
प्रवाशांतून तीव्र नाराजी
कोरोनामुळे मध्यंतरी परप्रातांतील कामगार मूळ गावी परतल्याने काम थांबले होते. मात्र, आता परप्रांतीय कामगार परतले आहेत. मात्र अद्यापही बसस्थानकाचे काम कासवगतीने सुरू आहे. विविध मार्गांवर बससेवा पूर्ववत सुरू झाली आहे. याला प्रवाशांचा प्रतिसादही वाढला आहे. पण स्मार्ट बसस्थानकाचे काम पूर्णत्वाकडे जात नसल्याने प्रवाशांतून नाराजी क्यक्त होत आहे.
अधिकाऱयांची आश्वासने हवेतच
स्मार्ट बसस्थानकाच्या नियोजित बसस्थानकाचा कोनशिला कार्यक्रम 2016 मध्ये झाला. प्रत्यक्ष कामाला 2017 मध्ये सुरुवात झाली. दरम्यान, काम वर्षभरात पूर्ण होईल अशी आश्वासने देण्यात आली होती. मात्र कामाला सुरुवात होऊन पाच वर्षे उलटली तरी अद्याप निम्मे काम बाकी आहे. त्यामुळे अधिकाऱयांची आश्वासने हवेतच विरली आहेत. तीन एकर आठ गुंठे परिसरात उभारण्यात येत असलेल्या बसस्थानकाचे काम हर्ष कन्स्ट्रक्शन कंपनीकडे देण्यात आले आहे. हे काम चार वर्षात पूर्ण व्हायला हवे होते. मात्र, कोरोना आणि इतर कारणांनी लांबणीवर पडले आहे.
यासाठी चार वेळा मुदत वाढवून देण्यात आली आहे. मुदतीप्रमाणे येत्या डिसेंबरपर्यंत काम पूर्ण व्हायला हवे होते. मात्र, अद्याप निम्मे काम शिल्लक असल्याने या मुदतीत काम पूर्ण होणे शक्य नाही. त्यामुळे पुढील वषी तरी काम पूर्ण होईल का? असा संतप्त सवाल प्रवाशांतून उपस्थित होत आहे.
कंत्राटदारावर दबाव आणणार…
सुरू असलेल्या स्मार्ट बसस्थानकाचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे काम लांबणीवर पडत आहे. डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याची डेडलाईन देण्यात आली होती. मात्र त्या कालावधीत काम पूर्ण होणे अशक्मय आहे. मात्र काम तातडीने पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारावर दबाव आणला जाणार आहे.
पी. वाय. नाईक (विभागीय नियंत्रण अधिकारी)