बेळगाव / प्रतिनिधी
शहरातील बसथांबे कोणासाठी ? प्रवाशांसाठी ? मद्यपिंसाठी? जनावरांसाठी? की, रोड रोमिओंसाठी? असा प्रश्न सध्या बेळगावकर करत आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेल्या बस थांब्यांची सध्याची दुरावस्था पाहता या कुरूप रूपापेक्षा पूर्वीचे साधे बसथांबे परवडले असे म्हणण्याजोगी परिस्थिती आहे. त्यामुळे स्मार्ट पणा नको, सुविधा नकोत पण स्वच्छता द्या असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
सर्व बस थांर्ब्यांची थोडय़ाफार फरकाने अशिच परीस्थिती आहे. परंतु संभाजी चौकातील बसथांबे म्हणजे अस्वच्छतेचे आगार झाले आहे. या बसस्थानकांचा उपयोग प्रवाशांसाठी न होता अनेक प्रकारच्या दुरूपयोगसाठीच होत आहे. येथे जर फेरफटका मारला तर स्वच्छता किंवा आरोग्याची काळजी घेणारा कोणताही सामान्य माणूस येथे थांबू शकत नाही.
अलिकडेच बसथांब्यांचे स्वरूप पालटले गेले. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नवीन बस थांबे उभारले गेले. परंतु या ठिकाणी घातलेल्या दगडी आसनावर प्रवासीच चिखलाचे पाय घेऊन बसतात. कारण खाली पाय ठेवून बसण्याजोगी परिस्थितीच नाही. सर्वत्र शेनाचे गोळे, कुत्री आणि अन्य जनावरांच्या वि÷ा यांनी थांबे भरून गेले आहेत.
सध्या प्रवासी संख्या कमी असल्याने या ठिकाणी मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. त्याचबरोबर हे बस थांबे मद्यपिंचे अड्डे झाले आहेत. या थांब्यांमध्ये सर्वत्र दारूच्या बाटल्या आणि पाकिटे पडलेली दिसत आहेत. शिवाय येथे उभारण्यात आलेल्या कचरा कुंडांमधील कचरा भरून तो सर्व थांर्ब्यांमध्ये पसरला आहे. डांस, मुंग्या आणि भटकी कुत्री यांचे साम्राज्य येथे निर्माण झाले आहे.
बसथांबे असून, आसन व्यवस्था असूनही त्याचा उपयोग प्रवाशांना मुळीच होत नाही. रस्त्याची दुरावस्था असून, सर्वत्र वायर आणि पाईप बाहेर आल्या आहेत. त्यातच पावसामुळे चिखल होऊन कचरा आणि चिखल यांची दुर्गंधी प्रवाशांना थांबू देत नाही. रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य, गलिच्छ पाण्याची डबकी आणि आतमध्ये अस्वच्छता त्यामुळे एकूणच हे थांबे प्रवाशांसाठी शून्य उपयोगाचे ठरत आहेत.
पुन्हा महानगरपालिका, कॅन्टोन्मेंट आणि स्मार्ट सिटी प्रकल्प यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याने प्रत्येकजण दुसऱयाकडे बोट दाखवून या थांब्यांच्या स्वच्छतेबाबत जबाबदारी झटकत आहेत. बस वेळेवर येत नाहीत. त्यामुळे नागरिकांना तासनतास प्रतिक्षा करावी लागते. मात्र त्यांना बसथांबे असूनही येथे बसता येत नाही.
जेथे बसथांबे आहेत तेथे ही दुरावस्था आहे. तर काही ठिकाणी बसथांबेच नाहीत. आरपीडी, अनगोळ या सर्व ठिकाणी बसथांबे नसल्याने प्रवाशांना ऊन पावसाचा मारा झेलत बसची प्रतिक्षा करावी लागते. एकूणच सध्या प्रवाशांच्या नशिबी केवळ संबंधीत खात्यांच्या दुरावस्थेमुळे गैरसोयिंचा सामना करण्याची वेळ आली आहे.









