पावसाचे पाणी वाहते काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्यावरून, शहापूर खडेबाजारमधील प्रकार
प्रतिनिधी / बेळगाव
शहापूर खडेबाजार रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत कोटय़वधीचा निधी खर्ची घालण्यात आला आहे. मात्र रस्त्याची उंची वाढविण्यात आल्याने शनिवारी झालेल्या पावसाचे पाणी परिसरातील दुकानांमध्ये शिरले. परिणामी व्यावसायिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी बनविण्यासाठी खर्ची घालण्यात आलेला निधी पाण्यात गेल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहराच्या विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी रस्त्याशेजारील गटारींचे बांधकाम करण्यात येत होते. मात्र स्मार्टसिटीच्या संकल्पनेतून गटारी गायब झाल्या आहेत. त्या ठिकाणी पाईप घालण्यात आले आहे. पण स्मार्टसिटीच्या नव्या संकल्पनेचा फटका शहापूर-खडेबाजार परिसरातील व्यावसायिकांना बसला आहे. शनिवारी विविध भागात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शहरात पाणीच पाणी झाले. विविध रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणानंतर गटारी बांधण्याऐवजी पाईप घालण्यात आल्याने पाण्याचा निचरा झाला नाही. त्यामुळे अवघ्या 20 मिनिटांच्या पावसाच्या पाण्यामुळे विविध भागातील रस्त्यावर एकफुटापेक्षा जास्त पाणी साचले होते. परिणामी विकासकामे राबविण्यासाठी खर्ची घालण्यात आलेला निधी पाण्यात गेला असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
शहापूर, खडेबाजार रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्यात आले आहे. बॅ. नाथ पै चौक ते शिवाजी उद्यानपर्यंतच्या खडेबाजार रस्त्याशेजारी दोन्ही बाजूंनी गटारी बांधण्याऐवजी पाईप घालण्यात आले आहेत. पण या पाईपमधून पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याचे यापूर्वीही झालेल्या वळीव पावसात निदर्शनास आले होते. पण याबाबत स्मार्टसीटीच्या अधिकाऱयांनी व महापालिका प्रशासनाने कोणतीच उपाययोजना राबविली नाही. त्यामुळे शनिवारी दुपारी झालेल्या पावसात खडेबाजार शहापूर रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहत होते. शहापूर, बसवाणगल्लीकडे जाणाऱया रस्त्यावर दीड फूट पाणी साचले होते.
रस्त्याचे काँक्रिटीकरण करताना उंची वाढविण्यात आल्याने रस्त्यावरील पावसाचे पाणी येथील दुकानांमध्ये शिरले. त्यामुळे व्यवसायिकांना मोठा फटका बसला आहे. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे अनेक दुकाने बंद आहेत. दुकानामध्ये पाणी शिरल्याचे व्यावसायिकांना समजू शकले नाही. दुकानाच्या वरील मजल्यावर रहात असलेल्या व्यावसायिकांना दुकानात पावसाचे पाणी शिरल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी लागलीच पाणी काढण्यासाठी प्रयत्न केले. पण अन्य नागरिकांना पावसाच्या पाण्याचा फटका बसला आहे.
खडेबाजार शहापुर परिसरात असलेल्या एका मेडिकल स्टोअरमध्ये देखील पाणी शिरले होते. दुकानामधील साहित्य व औषधांचे बॉक्स हटविण्याबरोबरच पाणी काढण्यासाठी धावपळ करावी लागली. तसेच कचेरी रोडवर देखील पाणी साचले होते. त्यामुळे स्मार्टसिटी कामाचा फटका शहरवासियांना बसला आहे. एकीकडे लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद ठेवावा लागल्यामुळे नुकसान सोसावे लागत आहे. अशातच स्मार्ट सिटीच्या चुकीच्या कामामुळे पावसाचे पाणी दुकानात शिरून नुकसानीत भर पडली आहे.









