भारतीय रिझर्व्ह बँकेकडून दोन सुविधा सादर : ग्रामीण भागाचा विचार करत नवी सेवा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशामधील कोटय़वधी सर्वसामान्य नागरिकांना भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (आरबीआय) मोठी भेट मिळाली आहे. स्मार्टफोन नसतानाही सामान्यांना आता पेमेंट करता येणे शक्य होणार आहे.
यामध्ये मोठय़ा प्रमाणात ज्या नागरिकांना स्मार्टफोन खरेदी करण्याचा खर्च करता येत नाही व फक्त कॉलिंग व मॅसेज पाठविण्याची सुविधा असणारा फोन वापर करत आहेत त्यांना हा मोठा दिलासा असणार आहे. ही बाब लक्षात घेत आरबीआयने मंगळवारी दोन सुविधा सादर केल्या असून यात पहिली फिचर फोन्ससाठी युपीआय सुविधा आणि दुसरी 27*7 ही हेल्पलाईन सुविधा सुरु केली आहे.
फिचर फोन्सचा वापर करणाऱया युपीआय सुविधांना युपीआय 123 पे (UPI123Pay) असे नाव दिले आहे. ज्याच्या मदतीने फिचर फोनचा वापर करणाऱया ग्राहकांना विना स्मार्टफोन व विना इंटरनेटशिवाय डिजिटल पेमेंट करता येणार आहे. विशेष करुन देशातील ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱया लोकांना या सुविधेचा अधिकचा फायदा होणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
40 कोटीपेक्षा अधिक युजर्स
भारतामध्ये जवळपास 40 कोटीपेक्षा अधिक फिचर्स फोन वापरणारे ग्राहक आहेत. हे युजर्स डिजिटल पेमेंट सुविधांपासून वंचित राहिले असल्याचे आरबीआयने यावेळी सांगितले आहे. यामुळे आरबीआयने डिजिटल पेमेंटसाठी एक सर्व्हर साइट कॉमन लायब्ररी बनवली आहे. यामध्ये फिचर फोन असणाऱया ग्राहकांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे फिचर फोन ग्राहकांना डिजिटल पेमेंट इंटरनेटशिवाय करता येणार आहे. तसेच ही सेवा विविध भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. याच युपीआय सुविधेला आरबीआयने 123 पे असे नाव दिले आहे. पेमेंट करताना ग्राहकांना ‘कॉल करा, निवड करा आणि पेमेंट करा’ हा नियम वापरता येईल.
ही सेवा युएसएसडीवर आधारीत ग्राहकांना : डेप्युटी गर्व्हनर
सध्या युपीआय सेवा युएसएसडीवर आधारीत ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. मात्र सर्व मोबाईलधारकांना ही सेवा देण्यास मान्यता दिली नसल्याचे डेप्युटी गर्व्हनर टी. रविशंकर यांनी स्पष्ट केले आहे.









