नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे. राजधानी स्फोटांनी हादरवण्याचा इशारा तेहरीक-ए-तालिबानच्या इंडिया सेलने दिल्यानंतर दिल्लीत बुधवारी हाय अलर्ट जारी करण्यात आला. या धमकीनंतर दिल्ली पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा सरोजिनी मार्केटसह अनेक बाजारपेठांमध्ये शोधमोहीम राबवली. मात्र, कोणत्याही ठिकाणी संशयास्पद वस्तू न मिळाल्याने सध्यातरी दिलासा मिळाला आहे. तथापि, हल्ल्याच्या शक्यतेमुळे सुरक्षा यंत्रणेला अतिदक्ष ठेवण्यात आले आहे. दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि दिल्ली पोलिसांचे संयुक्त पथक शोध मोहिमेत गुंतले आहे.
तेहरीक-ए-तालिबानच्या नावाने काही लोकांना धमकीचे ई-मेल पाठवण्यात आले आहेत. या ई-मेलमध्ये दिल्लीत स्फोट घडवण्याचा इशारा नमूद करण्यात आला आहे. दिल्लीबरोबरच उत्तर प्रदेश पोलिसांकडे या ई-मेल्सची तक्रार प्राप्त झाल्यानंतर राज्य पोलिसांनी तत्काळ दिल्ली पोलिसांना याची माहिती दिली. हल्ल्याची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त वाढवला. त्याचवेळी सरोजिनीनगर मार्केटमध्ये अनेक तास शोधमोहीम राबविण्यात आली. दिल्लीतील इतर काही बाजारपेठांमध्येही अशीच शोधमोहीम सुरू होती. तसेच सुरक्षा व्यवस्थाही कडक करण्यात आली होती, असे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या एका अधिकाऱयाने सांगितले.
सुरक्षेच्या कारणास्तव बुधवारीही सरोजिनीनगर भागातील बाजार बंद ठेवण्यात आला होता. धोका लक्षात घेता दिल्ली पोलिसांना मार्केट बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याचे सरोजिनीनगर मिनी मार्केट व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक रंधवा यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशातही सतर्कता
धमकीचा मेल करणारी व्यक्ती तेहरीक-ए-तालिबान इंडिया संघटनेशी संबंधित असल्याचे दिल्ली पोलीस दलातील अधिकाऱयाने सांगितले. तसेच दिल्लीला धमकी मिळाली असली तरी उत्तर प्रदेशमध्येही सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आली होती. दिल्लीत सुरक्षा वाढवण्याबरोबरच पोलीस मेल पाठवणाऱयाचा शोध घेण्यात व्यग्र होते. हा मेल पाठवणाऱयाच्या ओळखीसोबतच मेलमध्ये केलेल्या दाव्याची सत्यताही पडताळून पाहिली जात असल्याचे पोलीस अधिकाऱयांचे म्हणणे आहे.
यापूर्वीही छुप्या कारवाया उघड
यापूर्वी 14 जानेवारी रोजी सुरक्षा दलांनी दिल्लीतील गाझिपूर आणि 18 फेब्रुवारी रोजी जुनी सीमापुरी येथून मोठय़ा प्रमाणात आयईडी स्फोटके जप्त केली होती. पाकिस्तानमध्ये तयार केलेली ही स्फोटके जमीन किंवा समुद्रमार्गे भारतात पाठवली जात होती. ही स्फोटके सुरक्षा दलांनी वेळीच निकामी केल्याने आणि संशयितांच्या मुसक्या आवळल्यामुळे मोठा घातपाताचा कट उधळला गेला होता.
तेहरीक-ए-तालिबान ही पाकिस्तानची संघटना
तेहरीक-ए-तालिबान ही पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना आहे. 2007 च्या दरम्यान या संघटनेची स्थापना झाली असून याचे जाळे भारतातही असल्याचा संशय आहे. पाकिस्तानमधील अफगाणिस्तान सीमेजवळील आदिवासी भागात त्याचा मोठा प्रभाव आहे. पाकिस्तानमध्ये शरियावर आधारित कट्टर इस्लामी सरकार स्थापन करणे हा या संघटनेचा उद्देश आहे. 2014 मध्ये याच गटाने पाकिस्तानातील पेशावर येथील आर्मी स्कूलवर हल्ला करून 132 मुलांसह 149 जणांना ठार केले होते.









