इंग्लिश फलंदाजीचं भक्कम ‘रूट’!

मागील दशकभराहून जास्त काळापासून इंग्लिश फलंदाजीचा भक्कम कणा बनून राहिलाय तो ज्यो रूट…सध्या चालू असलेल्या ‘अॅशेस’ मालिकेतील पहिल्या कसोटीनं त्यानं ते पुन्हा एकदा दाखवून दिलंय. रूट त्याच्या जोरावर संघाचा पराभव रोखू शकलेला नसला, तरी तो पुन्हा एकदा ‘आयसीसी’च्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचलाय…
साल 2012…भारताविरुद्धच्या नागपूर कसोटीत ‘त्यानं’ जबरदस्त फिरकी माऱ्याविरुद्ध पाच तास किल्ला लढवून 73 धावांची संयमी खेळी केल्यानं इंग्लंडला कसोटी बरोबरीत सोडविता आली अन् त्यासरशी त्यांनी मालिकाही खिशात घालण्याचा विख्यात पराक्रम केला… साल 2023…अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियासाठी ‘तो’ प्रमुख अडथळा ठरेल ही अटकळ खरी ठरली. ‘त्यानं’ एजबॅस्टनमधील पहिल्याच कसोटीच्या पहिल्या डावात 152 चेंडूंत 118 धावा फटकावल्या. मात्र यावेळची शैली वेगळी होती. प्रशिक्षक मेकॉलमच्या आक्रमक ‘बाझबॉल’ धोरणाशी सुसंगत अशा पद्धतीनं ‘त्यानं’ चक्क ‘रिव्हर्स स्कूप’वर षटकार खेचले…
ज्यो रूट…मागील 11 वर्षांत इंग्लंडच्या फलंदाजीसाठी भक्कम आधारस्तंभ बनून राहिलेलं नाव…कारकिर्दीच्या सुऊवातीपासूनच स्पष्टपणे दिसत आलेली त्याची गुणवत्ता ताज्या ‘अॅशेस’च्या सुरुवातीलाच पुन्हा एकदा झळाळून उठली…गेल्या वर्षीच्या प्रारंभी रूटनं लॉर्ड्सवरील न्यूझीलंडविऊद्धच्या सामन्यात इंग्लंडला बिकट परिस्थितीतून बाहेर काढून विजय मिळवून दिला तेव्हा त्या शतकी खेळीनंतर तो कसोटीत 10 हजार धावांचा टप्पा पार करणारा त्यांचा दुसरा फलंदाज ठरला. दर्जेदार माऱ्याविरुद्ध रूटची ती धीरोदत्त खेळी सुमारे साडेपाच तास चालली…
ज्यो रूट हा खरं तर ‘पॉवर हिटर’ नव्हे, तर पारंपरिक पद्धतीचा नजाकतीनं खेळणारा फलंदाज. ‘शेफिल्ड कॉलेजिएट क्लब’साठी खेळून त्यानं आपली सर्वप्रथम छाप पाडली. 30 डिसेंबर, 1990 रोजी जन्मलेल्या यॉर्कशायरच्या या खेळाडूकडे 23 वर्षांचा होईपर्यंत इंग्लंडचा भावी कर्णधार म्हणून पाहिलं जाण्यास सुरुवात झाली होती. 2012 साली भारताविऊद्ध पदार्पण केल्यानंतर (त्याच्या कारकिर्दीत भारताला खास महत्त्व, तो 50 वी अन् 100 वी कसोटी देखील खेळला तो याच संघाविरुद्ध) पुढील वर्षी न्यूझीलंडविऊद्ध हेडिंग्लेच्या आपल्या घरच्या मैदानावर त्यानं पहिल्या कसोटी शतकाची नोंद केली. त्याच्या पाठोपाठ लॉर्ड्सवर ‘अॅशेस’मधील पहिलं शतक. रूटची वेगानं प्रगती चालू राहिली… पण इतर अनेक सहकाऱ्यांप्रमाणं त्याच्याही फॉर्मला गळती लागली ती ऑस्ट्रेलियात. 2013-14 च्या ‘अॅशेस’ मालिकेत इंग्लंडचा पार ‘व्हाईटवॉश’ झाला…मग सिडनीतील पाचव्या कसोटीतून वगळण्यात आलेल्या रूटची गाडी पुन्हा रुळांवर आली ती मायदेशात लॉर्ड्सवर श्रीलंकेविऊद्ध द्विशतक अन् भारताविऊद्ध दोन शतकं झळकावून…2016 च्या सुऊवातीला दक्षिण आफ्रिकेच्या विजयी दौऱ्यावर जोहान्सबर्ग इथं नोंदविलेलं शतक आणि राजकोटमधील शतकादरम्यान (या दौऱ्यात भारतानं इंग्लंडला 4-0 अशी धूळ चारली) ज्यो रूटनं सहा वेळा अर्धशतक पार केलं, परंतु त्याचं रुपांतर त्याला शतकात करता आलं नाही. मग मोठ्या खेळीमध्ये रुपांतर करण्याच्या बाबतीत त्याला येणारं अपयश हा चर्चेचा विषय बनण्यास फारसा वेळ लागला नाही. परंतु त्याला त्यानं लगेच विराम दिला. रूटनं कारकिर्दीतील सर्वोच्च 254 धावांची खेळी केली ती त्याच वर्षी पाकिस्तानविरुद्ध ओल्ड ट्रॅफर्डवर…
2017 मध्ये कर्णधार म्हणून अॅलिस्टर कूकची जागा घेतल्यानंतर ज्यो रूटनं 64 कसोटी सामन्यांत नेतृत्व केलं (इंग्लंडतर्फे सर्वाधिक) आणि त्याआधीच्या कोणत्याही कर्णधारापेक्षा त्यानं अधिक विजय (27) मिळविले अन् पराभवही स्वीकारले (26). मैदानात रणनीती आखताना तो कधीही त्या भूमिकेची मजा लुटताना दिसला नाही. शिवाय कमकुवत संघाची जबाबदारी स्वीकारण्याचा आलेला प्रसंग हे देखील त्याचं एक मोठं दुर्दैव…भारताविरुद्धच्या दोन मालिका नि न्यूझीलंडविरुद्धची एक मालिका गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियातील अॅशेसमध्ये 4-0 नं उडालेला धुव्वा आणि त्यानंतर कॅरिबियनमध्येही 0-1 असा पत्करावा लागलेला पराभव यांनी आगीत तेल ओतण्याचं काम इमाने इतबारे केलं. या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी एप्रिलमध्ये रूटनं स्वत:ला नेतृत्वातून मोकळं करून घेतलं. त्यापूर्वीच्या 17 सामन्यांत त्याला केवळ एकदा विजयाची चव चाखता आली होती. यावरून इंग्लंडच्या खराब वाटचालीची कल्पना यावी…
असं असलं, तरी त्याची स्वत:ची कामगिरी मात्र या काळात घसरली नाही. 2021 साली ज्यो रूटनं 61 च्या सरासरीनं 1708 धावा केल्या. कसोटी इतिहासात एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत त्याचा मोहम्मद युसूफ (1788) नि व्हिव रिचर्ड्स (1710) यांच्यानंतर तिसरा क्रमांक लागतो…कर्णधारपदाची सूत्रं सांभाळताना 64 कसोटींमध्ये त्यानं 46.44 च्या सरासरीनं 5295 धावा (इंग्लंडसाठी सर्वाधिक) केल्या. यात 14 शतकं आणि 26 अर्धशतकांचा समावेश. सर्वाधिक धावा काढलेल्या कसोटी कर्णधारांच्या यादीत त्याच्या वाट्याला पाचवं स्थान येतं…
सहसा कसोटीतील सरासरी 50 च्या वर असल्यास ते महान फलंदाजाचं लक्षण मानलं जातं. रूटची सध्याची कसोटीतील तसंच एकदिवसीय सामन्यांतील फलंदाजीची सरासरीही 50 पेक्षा जास्त. शिवाय कसोटीत त्यानं 30 शतकं झळकावलेली असून इंग्लिश फलंदाजांमध्ये त्याच्या पुढं आहे तो केवळ कूक (33 शतकं)…ताज्या अॅशेस मालिकेतील खेळीवरून स्पष्टपणे दिसून येतं की, ज्यो रूटच्या बॅटमधून अजून पुष्कळ धावा बरसणं बाकी राहिलंय. शिवाय कर्णधारपदाच्या जोखडातून मुक्त होणं त्याला अधिकच मोकळं बनवून गेलंय (त्या जबाबदारीमुळं आपल्याला हॉलिवुडपटातील ‘झोम्बी’ बनल्यागत वाटू लागलं होतं असं त्यानं सांगून टाकलंय)…ताजं शतक म्हणजे त्याच्या यंदाच्या सहा डावांतील 50 हून अधिक पाचवी धावसंख्या. नेतृत्वाला सोडचिठ्ठी दिल्यापासून रूटची सरासरी 75 पेक्षा जास्त, तर ‘स्ट्राइक रेट’ 65 हून अधिक राहिलाय !
‘फॅब फोर’मध्येही अव्वल…
- इंग्लंडचा ज्यो रूट, भारताचा विराट कोहली, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ आणि न्यूझीलंडचा केन विल्यमसन यांना ‘फॅब फोर’ म्हटलं जातं…कसोटीतील शतकांचा विचार करता 2021 च्या सुरुवातीस विराट 27 शतकांसह अव्वल आणि रूट 17 शतकांसह तळाशी होता. मात्र दोन वर्षांत या इंग्लिश खेळाडूनं बाकी सर्व ‘सुपरस्टार्स’ना मोठ्या फरकानं मागं टाकलंय…
- 2021 ते 2023 दरम्यान रूटनं 13 शतकांची नोंद केली, तर स्मिथ आणि विल्यमसन यांना प्रत्येकी पाच अन् विराटला झळकावता आलं फक्त एकच शतक…
- ’फॅब फोर’ गटात आता 30 कसोटी शतकांसह रूटनं दुसऱ्या स्थानावर झेप घेतलीय, तर स्मिथ 31 शतकांसह अग्रणी विराजमान झालाय. विल्यमसन 29 शतकांसह तिसऱ्या क्रमांकावर असून विराटवर (28 शतकं) तळाशी राहण्याची पाळी आलीय…
- 2021 पासून आजपर्यंत रूटनं 3345 धावा केल्या असून 63 डावांमध्ये झळकावलीत 13 शतकं नि 9 अर्धशतकं. त्यापैकी सर्वोच्च धावसंख्या ही 228. महत्त्वाचं म्हणजे या कालावधीत इतर कोणत्याही फलंदाजाला कसोटीत दोन हजार धावाही जमविता आलेल्या नाहीत…
ज्यो रूटचे प्रताप…
- 2021 साली ज्यो रूट भारताच्या दौऱ्यावर असताना चेन्नईतील आपल्या 100 व्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावणारा तो इतिहासातील पहिला खेळाडू बनला. त्यासरशी त्यानं 100 व्या कसोटीत सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येचा पाकिस्तानच्या इंझमाम-उल-हकचा 15 वर्षं टिकलेला विक्रम मोडीत काढला…
- त्यापूर्वी श्रीलंकेविऊद्धच्या मालिकेत रूटनं पहिल्या कसोटीत द्विशतक (228 धावा) नि दुसऱ्या सामन्यात शतक (186 धावा) झळकावलं होतं. अशा प्रकारे तो दिग्गज डॉन ब्रॅडमननंतरचा सलग तीन कसोटींमध्ये 150 पेक्षा जास्त धावा काढणारा दुसरा कर्णधार बनला…
- रूटनं यंदाच्या प्रारंभी ब्रायन लाराचा (131 सामन्यांत) विक्रम मोडीत काढत कसोटीत 11 हजार धावांचा टप्पा सर्वांत वेगानं गाठणारा फलंदाज बनण्याचा मान मिळविला. त्यानं ही कामगिरी केली 130 व्या लढतीत…इंग्लंडमध्ये धावांच्या बाबतीत देखील त्याच्या पुढं आहे तो केवळ अॅलिस्टर कूक…
फलंदाजीतील झेप…
प्रकार सामने डाव नाबाद धावा सर्वोच्च सरासरी शतकं द्विशतकं अर्धशतकं
कसोटी 131 240 20 11168 254 50.76 30 5 58
वनडे 158 147 23 6207 133 50.06 16 – 36
टी20 32 30 5 893 90 35.72 – – 5
रूटची गोलंदाजी…
प्रकार सामने डाव बळी डावात सर्वोत्कृष्ट सामन्यात सर्वोत्कृष्ट 5 बळी
कसोटी 131 131 55 8 धावांत 5 बळी 33 धावोंत 5 बळी 1
वनडे 158 69 26 – 52 धावांत 3 बळी –
टी20 32 9 6 – 9 धावांत 2 बळी –
तब्बल 7 स्पर्धांनी गाजले कोल्हापूर फुटबॉलचे ‘टशन’
कतारमधील फुटबॉल वर्ल्डकपचा फिव्हर घेऊनच डिसेंबर 2022 पासून छत्रपती शाहू स्टेडियममध्ये सुऊ झालेला कोल्हापुरी फुटबॉल हंगाम लागोपाठ 7 स्पर्धांनी कमालीचा गाजला. गेल्या 10 वर्षांत प्रथमच 7 स्पर्धा झाल्या. याचबरोबर संपूर्ण स्पर्धेच्या जेतेपद व उपविजेतेपदासह उत्कृष्ट गोलकिपर, डिफेन्स, हाफ व फॉरवर्डचा बहुमान मिळणाऱ्या खेळाडूंसाठी 28 लाखांहून अधिक ऊपयांची बक्षिसे लावली होती. ही बक्षिसे जिंकण्यासाठी संघांनी केलेला जिद्दी खेळ व सामन्यांना झालेल्या गर्दीतून कोल्हापूरी फुटबॉलचे ‘टशन’ अधोरेखित केले. याच टशनमध्ये पाटाकडील तालीम मंडळाला पहिल्या तीन स्पर्धांमध्ये कमकुवत खेळामुळे पत्करावी लागलेली हाराकिरी तर सर्वांनी पाहिली. पाटाकडील फुटबॉल हंगामात फेल जाणार अशी चर्चा रंगली. मात्र ही चर्चा खोटी ठरवत पाटाकडीलने दर्जेदार खेळ कऊन 3 स्पर्धांच्या अंतिम फेरीत मुसंडी मारतानाच चंद्रकांत चषकही जिंकला. शिवाजी तऊण मंडळानेही सलग चार स्पर्धांच्या अंतिम फेरीत धडक देऊन प्रतिष्ठेचा शाहू गोल्डकप व अटल चषक जिंकण्याचा पराक्रम केला.
या सगळ्या धामधुमीत दिलबहार तालीम मंडळ व खंडोबा तालीम मंडळाला नजरेआड करता येणार नाही. दिलबहारने शाहू छत्रपती केएसए वरिष्ठ गट साखळी (लीग) फुटबॉल स्पर्धेसह सतेज चषक पटकावत तर खंडोबाने महापालिका चषक व राजेश चषक जिंकून हंगामावर वर्चस्व मिळवले होते. मात्र पुढील स्पर्धांमध्ये दिलबहारचा संघ खेळाडूंच्या इंज्युरीमुळे व खंडोबाला विजयाचा वाऊ टिकवता न आल्याने स्पर्धा जेतेपदाच्या रेसमध्ये हे दोन्ही पिछाडीवर पडले. असो. यंदाचा फुटबॉल हंगाम हा तसा संघ बांधणीवऊनच कमालीचा गाजायला लागला होता. नोव्हेंबर 2022 पासून शाहू स्टेडियममध्ये फुटबॉल हंगामाचा किकऑफ होईल हे गृहीत धऊन सप्टेंबर महिन्यातच संघ व्यवस्थापनाने परदेशी, राष्ट्रीय व स्थानिक खेळाडूंची मोट बांधून संघबांधणीला सुऊवात केली होती. त्यासाठी तब्बल एक ते दीड कोटी ऊपये खर्ची घातले. फिफा फुटबॉल वर्ल्डकपचा फिव्हर ताजा असताना केएसएने शाहू छत्रपती केएसए लिग फुटबॉल स्पर्धेच्या ऊपाने फुटबॉल हंगामाचा किकऑफ केला.
दीड महिना गाजत राहिलेल्या या केएसए लीगची 14 गुणांची कमाई करत दिलबहार तालीम मंडळाने चॅम्पियनशीप मिळवली तर एका गुणाने (13 गुण) मागे राहिलेल्या शिवाजी तऊण मंडळाला उपविजेतेपद मिळाले. लीग चॅम्पियशीपचा दरारा कायम ठेवत दिलबहारने सतेज चषकाच्या जेतेपदासाठी झालेल्या अंतिम सामन्यात बालगोपाल तालीम मंडळाला टायब्रेकरमध्ये 3-1 गोलफरकाने हरवून जेतेपद मिळवले. यानंतर मात्र दिलबहार पिछाडीवर पडला आणि खंडोबा मंडळाची आगेकुच झाली. अतिशय संयमी खेळ करत खंडोबाने महापालिका चषकासाठी झालेल्या अंतिम सामन्यात दुसऱ्यांदा फायनलमध्ये आलेल्या बालगोपालचा टायब्रेकरमध्ये 4-3 गोलफरकाने पराभव केला. तब्बल 10 वर्षांच्या खंडानंतर खंडोबाच्या पदरी स्पर्धेचे हे पहिले जेतेपद पडले. राजेश चषक फुटबॉल स्पर्धेतही खंडोबाने विजयाचा वारू कायम ठेवत झुंजार क्लबला अंतिम सामन्यात पराभूत केले. मात्र या सामन्यात झुंजार क्लबचा बचावपटू सुयश साळोखेने केलेला खेळ सर्वांच्या लक्षात राहिला.
राजेश चषकांपर्यंत पाटाकडीलचे अस्तित्वच अजिबात दिसले नाही. मात्र चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत मात्र पाटाकडीलला टर्निंग पॉईंट मिळाला. स्पर्धेच्या उपांत्यपूर्व, उपांत्य व अंतिम सामन्यात तर ईर्ष्येला पेटून उठल्यासारखा पाटाकडीलने खेळ केला. खंडोबा तालीम मंडळाविऊद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात पाटाकडील 1 गोलने पिछाडीवर होते. सामन्याच्या अखेरच्या 10 सेकंदापर्यंत पिछाडीवर राहिलेला पाटाकडीलचा संघ पराभूत होणार अशी चिन्हे दिसत होती. मात्र याचवेळी पाटाकडीलला पेनल्टी मिळाली आणि सामन्याचे चित्र तर पालटलेच, शिवाय पाटाकडीलला हंगामात उभारी देणारा टर्निंग पाईंटही मिळाला. पाटाकडीलने मिळालेल्या पेनल्टीमधून गोल करत खंडोबा मंडळाने केलेल्या गोलशी बरोबरी साधली. याच बरोबरीत सामना संपल्याने सामन्याचा निकाल लावण्यासाठी टायब्रेकर अवलंबला होता. यात मात्र पाटाकडीलने बाजी मारत खंडोबा मंडळाला 5-3 गोलफरकाने हरवून उपांत्य फेरीत धडक दिली. उपांत्य फेरीत बालगोपालला तर अंतिम फेरीत शिवाजी तऊण मंडळाचा 3-1 गोलफरकाने पराभव करत पाटाकडीलने चंद्रकांत चषक पटकावला.
विष्णुपंत इंगवले सर चषक फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना मात्र वादग्रस्त ठरला. चषकाच्या विजेतेपदासाठी शिवाजी मंडळ व पाटाकडील हे संघ हे अंतिम सामन्याच्या ऊपाने पुन्हा आमने-सामने आले होते. मात्र हा सामना पूर्णवेळेत 1-1 गोलबरोबरीत सुटल्याने चषकाच्या जेतेपदासाठी टायब्रेकर होणार होता. याचवेळी टायब्रेकर मैदानातील दक्षिण की उत्तर गोलखांबाला घ्यायचा यावऊन शिवाजी मंडळ व पाटाकडील यांच्यात वाद झाला. तो बराचवेळ न मिटल्याने स्पर्धा आयोजकांनी शिवाजी मंडळ व पाटाकडीलला संयुक्त विजेतेपद देऊन टाकले. या हंगामात सर्वात लक्षवेधी स्पर्धा ठरली ती म्हणजे चार राष्ट्रीय संघाचा सहभाग राहिलेली शाहू छत्रपती गोल्ड कप अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा. केएसए अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या राष्ट्रीय संघाविऊद्धच्या सामन्यात कोल्हापूरी संघ टिकणारच नाही, अशी टिकाही झाली. पण कोल्हापुरी संघांनी राष्ट्रीय संघांविऊद्धच्या सामन्यात तोडीस तोड असा खेळ कऊन आपल्यात देशातील कोणत्याही संघाला हरवण्याची ताकद आहे हे दाखवून दिले. इतकेच नव्हे शिवाजी मंडळाने कोलकाताच्या मोहमेडन स्पोर्टिंग क्लबला, संयुक्त जुना बुधवार पेठ संघाने बेंगळूरच्या ऊटस् क्लबला तर बालगोपाल तालीम मंडळाने गोव्याच्या धेम्पो स्पोर्टस्ला पराभूत करत टिकाकारांना धक्काच दिला. शिवाय स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही शिवाजी मंडळाने बलाढ्या केरळा स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड संघावर ट्रायब्रेकरमध्ये 5-4 गोलफरकाने विजय मिळवत शाहू गोल्ड कप जिंकला. अटल चषक फुटबूल स्पर्धा ही हंगामातील अखेरची स्पर्धा ठरली. या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी शिवाजी तऊण मंडळ चौथ्यांदा तर पाटाकडील तालीम मंडळ तिसऱ्यांदा अंतिम फेरीत आले होते. चुरशी खेळलेल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात चंद्रकांत चषकातील पराभवाचे उट्टे काढत शिवाजी मंडळाने पाटाकडीलला 3-0 गोलने पराभूत कऊन अटल चषकावर कब्जा केला. यानंतर पुढील आठ दिवसात कोणतीही स्पर्धा न झाल्याने केएसएने वरिष्ठ गटाच्या फुटबॉल हंगामाची सांगता केली. या सांगतेवेळी एकूणच फुटबॉल हंगामातील जयपराजयावर संघ समर्थकांनी सोशल मिडियावर खुन्नशीने टाकलेल्या पोस्ट आणि स्पर्धांमध्ये सतत झालेली वादावादी पुढील हंगामापर्यंत लक्षात राहिल, अशीच होती.
कोल्हापुरी फुटबॉल हंगामाच्या टशनमध्ये वरिष्ठ संघातून 24 परदेशी व 22 राष्ट्रीय खेळाडूंचा विविध संघातून जलवा पहायला मिळाला. आजवर इतक्या मोठ्या संख्येने कोल्हापुरी संघातून परदेशी व राष्ट्रीय खेळाडू खेळले नाहीत. शिवाय या परदेशी, राष्ट्रीय खेळाडूंसह स्थानिक खेळाडूंना संघातून खेळल्याबद्दल संघ व्यवस्थापनाला एक ते कोटी ऊपये मोजावे लागले आहेत.
यंदाच्या फुटबॉल हंगामातील दोन स्पर्धासाठी अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनचे सेक्रेटरी जनरल शाजी प्रभाकरन हे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. कोल्हापूरकरांचे फुटबॉलवरील प्रेम पाहून ते भारावून तर गेलेच शिवाय त्याच भारावलेपणात त्यांनी केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे यांच्या माध्यमातून छत्रपती शाहू स्टेडियमला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्यासाठी पुढाकार घेईल, असा कोल्हापूरकरांना शब्दही दिला आहे.
– संग्राम काटकर
खेळ जुनाच ओळख नवी ! जलतरण – ‘फ्रीस्टाईल’
जलतरण हा खूप जुना क्रीडाप्रकार असून अथेन्स (ग्रीस) येथे 1896 मध्ये झालेल्या ऑलिम्पिकपासून प्रत्येक आधुनिक ऑलिम्पिकमध्ये त्याचा समावेश राहिलेला आहे. महिलांच्या जलतरण स्पर्धा स्टॉकहोममध्ये 1912 साली झालेल्या ऑलिम्पिकपासून सुरू झाल्या, तर मिश्र ‘मेडले रिले’ने 2020 साली टोकियो (जपान) येथे झालेल्या खेळांतून पदार्पण केले…
- ऑलिम्पिकमध्ये जलतरण हा एक वैयक्तिक आणि सांघिक क्रीडाप्रकार असून त्यात स्पर्धक ‘फ्रीस्टाईल’, ‘बॅकस्ट्रोक’, ‘ब्रेस्टस्ट्रोक’ आणि ‘बटरफ्लाय’ अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या स्पर्धांमध्ये सहभागी होतात…
- व्यावसायिक जलतरणपटू सामान्यत: 50 मीटर लांबीच्या किंवा 25 मीटर लांबीच्या ‘शॉर्ट कोर्स’ जलतरण तलावात स्पर्धा करतात. ऑलिम्पिकमध्ये मात्र केवळ 50 मीटर लांबीचे तलाव वापरले जातात…
- ऑलिम्पिकमधील सर्वांत लहान वैयक्तिक स्पर्धा 50 मीटर ‘फ्रीस्टाईल’ची असते, तर ‘बॅकस्ट्रोक’, ‘ब्रेस्टस्ट्रोक’ आणि ‘बटरफ्लाय’ची सर्वांत लहान शर्यत 100 मीटर्सची असते…
- व्याख्येनुसार, ‘फ्रीस्टाईल’ प्रकारात जलतरणपटूंना त्यांनी निवडलेल्या पोहण्याच्या कोणत्याही शैलीचा वापर करण्यास परवानगी असते. तथापि, ‘फ्रंट क्रॉल’ हे तंत्र या स्पर्धांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात वापरले जाते की, ‘फ्रीस्टाईल’ म्हणजे ही शैली असे समीकरण होऊन बसले आहे. कारण हे तंत्र सर्वांत जास्त वेग प्रदान करते…
- ‘फ्रंट क्रॉल’चे वैशिष्ट्या म्हणजे स्पर्धक हात आळीपाळीने गोलाकार पद्धतीने पुढच्या दिशेने फिरवून पाणी कापतो अन् दोन्ही पाय आळीपाळीने ‘वर-खाली’ करतो म्हणजे ‘फ्लटर किक’ किंवा ‘सिझर किक’ वापरतो. जलतरणपटू स्वत:ला पाण्यातून पुढे खेचण्यासाठी त्याच्या हातांच्या हालचालीचा वापर करतो, तर पायांची हालचाल अतिरिक्त गती प्रदान करते…
- यादरम्यान श्वासोच्छ्वासाची पद्धत स्पर्धेच्या अंतरानुसार आणि जलतरणपटूंच्या पसंतीनुसार बदलते. उदाहरणार्थ, 50 मीटर फ्रीस्टाईलमध्ये काही स्पर्धक शर्यतीदरम्यान फारसे श्वास घेतच नाहीत…
- ‘फ्रंट क्रॉल’चे मूळ 19 व्या शतकापर्यंत जाते. इंग्लिश जलतरणपटू जॉन आर्थर ट्रुजेनने दक्षिण अमेरिकी लोकांची शैली पाहून तयार केलेल्या संकरित अवताराला ‘ट्रुजेन स्ट्रोक’ म्हटले गेले…त्यानंतर 19 व्या शतकाच्या शेवटी ऑस्ट्रेलियन जलतरणपटू रिचमंड कॅव्हिलने यात सुधारणा करून ‘फ्रंट क्रॉल’ विकसित केला…
- ऑलिम्पिकमध्ये इतर कोणत्याही ‘स्ट्रोक’पेक्षा जास्त शर्यती या ‘फ्रीस्टाईल’ प्रकाराच्या होतात. सध्या 50 मीटर्स, 100 मीटर्स, 200 मीटर्स, 400 मीटर्स, 800 मीटर्स आणि 1500 मीटर्स अंतराच्या शर्यती त्यात होतात. त्याचप्रमाणे पुरुष आणि महिला गटांत दोन ‘फ्रीस्टाईल रिले’ शर्यती देखील होतात. या शर्यती 4×100 मीटर्स आणि 4×200 मीटर्सच्या असतात…
- सध्या 100 मीटर्स फ्रीस्टाईलमध्ये विश्वविक्रम रोमानियाच्या 17 वर्षीय डेव्हिड पोपोविसीच्या (46.86 सेकंद) नावावर असून तो त्याने रोम येथे झालेल्या युरोपियन स्पर्धेत नोंदविला…
– राजू प्रभू









