‘कॅप्टन कूल’चा वारसदार…हार्दिक पंड्या !

यंदा ‘आयपीएल’चं जेतेपद मिळविता आलेलं नसलं, तरी हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील ‘गुजरात टायटन्स’ची सलग दुसऱ्या वर्षी अंतिम फेरीत धडक गाजल्याशिवाय राहिलेली नाही.. त्यात हार्दिकच्या फलंदाजी वा गोलंदाजीपेक्षा जास्त चर्चा राहिलीय ती त्याच्या नेतृत्वगुणांची. एकेकाळी दुखापतीमुळं कारकीर्द संपण्याची भीती ते सध्याचा टप्पा यादरम्यानची पंड्याची वाटचाल दाखवून देते ती त्याची जिद्द नि जिगर…
2018 मधील आशिया चषक आठवतोय ?…पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यादरम्यान गोलंदाजी करताना पाठ धरत लोळलेल्या हार्दिक पंड्याला स्ट्रेचरवर घालून मैदानाबाहेर न्यावं लागलं. त्यानंतर त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया करावी लागली…भारताचा अव्वल दर्जाचा, वेगवान गोलंदाजी करू शकणाऱ्या अष्टपैलू खेळाडूचा शोध संपुष्टात आल्यागत दिसत असतानाच घडलेली ही घटना…हार्दिकनं फलंदाज आणि गोलंदाज म्हणून ज्या प्रकारे भार उचलला होता ते पाहता अनेकांच्या मनात पाल चुकचुकली ती एका वेगानं झेप घेणाऱ्या कारकिर्दीला अचानक ‘ब्रेक’ लागतो की काय याची…
अनेक महिने संघाबाहेर राहावे लागल्यानंतर हार्दिक पंड्याची ‘घरवापसी’ झाली ती 2020 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील एकदिवसीय मालिकेत. पण तो ‘टिपिकल’ हार्दिक कुठं दिसत नव्हता अन् त्याच्यातील गोलंदाज तर पार लुप्त झाला होता…या पार्श्वभूमीवर 2021 साली संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या ‘टी-20 विश्वचषक स्पर्धे’त त्याला अपेक्षेनुरुप कामगिरी करता आली नाही, तर 2020 नि 2021 च्या ‘आयपीएल’मध्ये मुंबई इंडियन्सतर्फे खेळताना त्यानं एकही चेंडू टाकला नाही. इंग्लंडविरुद्धच्या भारतात झालेल्या मर्यादित षटकांच्या मालिकेत सुद्धा चित्र पाहायला मिळालं ते असंच. हार्दिकविषयीच्या आशा मावळत चाललेल्या असताना त्यानं ‘टी-20’ विश्वचषकानंतर जवळजवळ सहा महिन्यांचा ‘ब्रेक’ घेतला अन् भर दिला तो आपला ‘फिटनेस’ सुधारण्यावर, पुन्हा अष्टपैलू खेळाडू म्हणून छाप उमटविण्यावर…
याकामी हार्दिक पंड्याला मोलाची मदत केली ती भारताचे माजी यष्टिरक्षक किरण मोरेनी. शिवाय भारतीय संघाचे ‘कंडिशनिंग ट्रेनर’ सोहम देसाई यांनी ‘हेल्थ प्रोग्राम’ आखून दिला…हार्दिकनं सांगितल्यानुसार, त्या कालावधीत आपल्याविषयी बरंच काही बोललं जातंय याची त्याला जाणीव होती. परंतु तो टीकाकारांना उत्तर देण्याच्या भानगडीत पडला नाही. त्याऐवजी त्यानं ंलक्ष केंद्रीत केलं ते कठोर परिश्रम करण्यावर…‘मी सकाळी 5 वा. उठायचो आणि मुबलक सराव करण्यासाठी पुरेशी विश्रांती घ्यायचो. मी जवळजवळ चार महिने रात्री साडेनऊला झोपी गेलो. त्यावेळी खूप त्याग केले. पण ‘आयपीएल’च्या आधीचा हा संघर्ष समाधानकारक निकाल देऊन गेला’, हार्दिक पंड्या सांगतो…
बडोद्याच्या या खेळाडूनं गेल्या वर्षी जोरदार पुनरागमन केलं ते थेट ‘आयपीएल’मध्ये आणि दर्शन घडलं ते ‘हार्दिक 2.0’चं…त्यानं पदार्पण करणाऱ्या ‘गुजरात टायटन्स’चं नुसतं नेतृत्व केलं नाही, तर चक्क पहिल्याच प्रयत्नात जेतेपद मिळवून दिलं. याकामी भरीव हातभार लावताना 484 धावा जमवून नेहमीच्या फटकेबाजीचा ‘जलवा’ दाखविला अन् सातत्यानं 140 किलोमीटर वेगानं गोलंदाजी करून आपल्याविषयीच्या साऱ्या शंकांना मूठमाती दिली…त्यानंतर पूर्वीचा हार्दिक परतलाय याची प्रभावीपणे साक्ष आणून दिली ती आयर्लंड नि इंग्लंडविरुद्धच्या मालिकांनी. आयर्लंडविरुद्धच त्याच्याकडे ‘टी-20’ संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली अन् ती त्यानं समर्थपणे पेलली. आतापर्यंत पंड्यानं नेतृत्व केलेल्या 11 लढतींपैकी सात भारतानं जिंकल्याहेत. खेरीज त्यानं अधिपत्य केलेल्या एका एकदिवसीय सामन्यात संघानं ऑस्ट्रेलियाला 5 गडी राखून पाणी पाजून दाखविलं…हे कमी म्हणून की काय, आता सलग दुसऱ्या वर्षी ‘आयपीएल’च्या अंतिम फेरीपर्यंत ‘गुजरात टायटन्स’ची धडक नि उपविजेतेपद…
हार्दिक पंड्याच्या कसोटीतील वाटचालीला पुन्हा चालना मिळालेली नसली, तरी तो एकदिवसीय व टी-20 क्रेकेटमध्ये पूर्ववत छाप उमटवू लागलाय…त्याच्या वागण्यातही बदल झालाय. एकेकाळी उग्र आणि अतिउत्साही दिसणारा हा खेळाडू आता वरिष्ठ क्रिकेटपटूला साजेशी परिपक्वता तसंच जबाबदारीचं पुरेपूर भान दाखवून द्यायला लागलाय. इतकंच नव्हे, तर तो ज्याला गुरू मानतो त्या ‘कॅप्टन कूल’ म्हणजेच महेंद्रसिंग धोनीचा वारसदार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाऊ लागलंय…पूर्वी लेगस्पिन टाकणाऱ्या अन् बडोद्याचे प्रशिक्षक सनथ कुमार यांच्या सांगण्यावरून वेगवान गोलंदाजीकडे वळलेल्या हार्दिकच्या कारकिर्दीत ‘आयपीएल’ला नेहमीच अनन्यसाधारण महत्त्व राहिलंय…2013-14 व 2016 च्या मोसमातील बडोद्याच्या सय्यद मुश्ताक अली चषक जेतेपदांत दिलेल्या मोलाच्या योगदानानं त्याला प्रकाशात आणलं असलं, तरी खरं गाजविलं ते ‘इंडियन प्रीमियर लीग’नंच…
हार्दिक 2013 साली ‘मुंबई इंडियन्स’च्या गोटात रूजू झाला तो ‘नेट बॉलर’ म्हणून. दोन वर्षांनी त्याला जाळ्यात तुफानी फटकेबाजी करताना पाहिलं ते ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरनं अन् मग 2015 च्या त्या मोसमातून तो संघाचा कायम सदस्य बनला…‘मुंबई इंडियन्स’च्या पाचपैकी चार जेतेपदांचा पंड्या साक्षीदार राहिला…या पार्श्वभूमीवर त्याला भारतीय ‘टी-20’ संघात प्रवेश मिळाला तो 27 जानेवारी, 2016 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध. मग 2016 च्या आशिया चषकात पाकविरुद्ध 18 धावांत घेतलेले 3 बळी, त्याच वर्षीच्या ‘टी-20’ विश्वचषकात शेवटच्या तीन चेंडूंत दोन बळी घेऊन बांगलादेशवर मिळवून दिलेला सनसनाटी विजय अन् 2018 मध्ये इंग्लंडविरुद्ध 28 धावांत 4 बळी अन् 14 चेंडूंत नाबाद 33 धावा ही अष्टपैलू कामगिरी यांनी त्याला संघाचा महत्त्वाचा आधारस्तंभ बनविण्याचं काम इमाने इतबारे केलंय (गेल्या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या ‘टी-20’ लढतीत 4 बळी अन् अर्धशतक असा प्रताप बजावणारा हार्दिक पहिला भारतीय खेळाडू बनला)…
एकदिवसीय संघात हार्दिक पंड्यानं पाऊल ठेवलं ते 2016 साली न्यूझीलंडविरुद्ध. तो पदार्पणातच सामनावीर बनणारा चौथा भारतीय क्रिकेटपटू…2017 च्या
‘चॅम्पियन्स चषका’च्या अंतिम फेरीत 5 बाद 54 अशी स्थिती झाल्यानंतर 43 चेंडूंत त्यानं ठोकलेल्या 76 धावा पाकिस्तानविरुद्धचा पराभव रोखू शकल्या नसल्या, तरी त्याची जिगर दाखवून गेल्या…गेल्या वर्षी ओल्ड
ट्रॅफोर्डवर त्यानं इंग्लंडविरुद्ध 24 धावांत 4 बळी मिळवून आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदविली अन् मग 71 धावाही काढल्या…हार्दिक पहिली कसोटी खेळला तो 2017 साली श्रीलंकेविरुद्ध आणि त्याच मालिकेतील तिसऱ्या सामन्यात त्यानं खरं तर आपलं पहिलं शतक झळकावलं. पण पुढं कसोटीतून त्याची गच्छंती झाली अन सारा गवगवा होत राहिला तो मर्यादित षटकांच्या ‘फॉर्मेट’मध्येच!
हलाखीचे दिवस ते कोट्याधीश क्रिकेटपटू…
- हार्दिक पंड्याचा जीवनप्रवास हा काही कमी नाट्यापूर्ण नाहीये…त्याच्या शब्दांत सांगायचं झाल्यास त्याचं कुटुंब मूळचं बऱ्यापैकी सुखवस्तू. वडील हिमांशू पंड्या हे ‘कार फायनान्स’चा लहान व्यवसाय चालवायचे. परंतु आपल्या दोन्ही मुलांमध्ये दडलेले क्रिकेटचे गुण हेरून त्यांना चालना देण्याच्या हेतूनं त्यांनी व्यवसाय गुंडाळला अन् थेट बडोदा गाठलं. तिथं त्यांनी हार्दिक व कृणाल यांना दाखल केलं ते ‘किरण मोरे क्रिकेट अकादमी’त…पण सारं काही चांगलं चाललेलं असताना अचानक आलेल्या आर्थिक संकटानं कुटुंबाची घडी पार विस्कटून टाकली. उदरनिर्वाहासाठी वडील मिळेल ते काम करू लागले. त्यातच त्यांना तीन वेळा ‘हार्ट अॅटॅक’
येऊन गेल्यानंतर पंड्या बंधूंचं जीवन पूर्वीचं राहिलं नाही…
- हार्दिक पंड्यानं सांगितल्यानुसार, तीन वर्षं त्यांना प्रचंड धडपडावं लागलं. पाच-दहा रुपयांची बचत करणं देखील कठीण होतं…नववीत शिक्षणाला रामराम ठोकलेला हार्दिक नि कृणाल यांनी त्यावेळी गुजराण करण्यासाठी वाट चोखाळली ती स्थानिक पातळीवरील क्रिकेट स्पर्धा खेळण्याची. त्यातून 400-500 रुपये खिशात पडायचे…वडिलांच्या आरोग्याच्या चिंतेबरोबर त्यांना सतावायची ती कर्जाचा हप्ता दोन वर्षं फेडता न आल्यानं घेतलेली कार जप्त केली जाण्याची. तो प्रसंग ओढवू नये म्हणून ते शिताफीनं गाडी दडवून ठेवायचे…
- सय्यद मुश्ताक अली चषक बडोद्यानं जिंकल्यानंतर या बंधूंच्या हाती प्रत्येकी 70 हजार पडले त्यावेळी त्यातून काही काळ तरी चांगल्या प्रकारे जाईल असा विचार करून त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता…पुढं ‘मुंबई इंडियन्स’चे दरवाजे उघडे झाले अन् ‘आयपीएल’नं कित्येकांप्रमाणे त्याचंही भाग्य पालटून टाकलं. तो दाखल झाला त्याच वर्षी संघानं ‘आयपीएल’चा चषक उचलला अन् मग हार्दिकच्या वाट्याला आला चक्क 50 लाख रुपयांचा धनादेश. त्यानं त्यातून लगेच कारचं कर्ज मोकळं केलं, नवीन गाडीही घेतली…एकेकाळी खाण्याचे वांदे असलेल्या हार्दिक पंड्याची संपत्ती आज एका अंदाजानुसार पोहोचलीय ती 91 कोटींच्या घरात. गेल्या वर्षी त्याला ‘गुजरात टायटन्स’नं करारबद्ध केलं तेच मुळी 15 कोटी रुपयांना…
- प्रकार सामने डाव नाबाद धावा सर्वोच्च सरासरी शतकं अर्धशतकं
- कसोटी 11 18 1 532 108 31.29 1 4
- वनडे 74 55 7 1584 92 33 – 9
- टी20 88 68 18 1292 71 25.84 – 3
- आयपीएल 123 115 39 2309 91 30.38 – 10
- प्रकार सामने डाव बळी डावात सर्वोत्कृष्ट सामन्यात सर्वोत्कृष्ट सरासरी 5 बळी
- कसोटी 11 19 17 28 धावांत 5 बळी 50 धावांत 6 बळी 31.06 1
- वनडे 74 69 72 – 24 धावांत 4 बळी 37.65 –
- टी20 88 77 69 – 16 धावांत 4 बळी 26.64 –
- आयपीएल 123 81 53 – 17 धावांत 3 बळी 33.26 –
– राजू प्रभू
कॅप्टन कूलचा ‘कूल हेअरकट’
सोमवारी आयपीएलचा सोळावा हंगाम संपला. अंतिम सामन्यात चेन्नईने गुजरातला नमवत पाचव्यांदा अजिंक्यपद पटकावले. धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईने संपूर्ण आयपीएलमध्ये सुरेख खेळाचे प्रदर्शन साकारताना करोडो चाहत्यांची मने जिंकली. विशेष म्हणजे, देशभरातील मुंबई, लखनौ, बेंगळूर, चेन्नई, नवी दिल्ली, अहमदाबाद सारख्या ठिकाणी चेन्नईचे सामने झाले. याठिकाणी धोनीची एक झलक पाहण्यासाठी लाखो चाहते उपस्थित होते. अंतिम सामन्याच्या दिवशी तर अहमदाबादच्या रस्त्यावर फक्त आणि फक्त पिवळी जर्सी घातलेले चाहते हर ठिकाणी दिसत होते. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करून जवळपास तीन वर्षे होत आली असली, तरी आयपीएलमध्ये अजूनही धोनीचीच चलती आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. ‘कॅप्टन कुल‘ म्हणून ओळखला जाणारा महेंद्रसिंग धोनी आपल्या स्टाइल आणि लुक्सवर जास्त लक्ष देत नसला तरी तो आपल्या आतपर्यंतच्या वेगवेगळ्या हेअरस्टाइलमुळे फेमस आहे. 2004 मध्ये धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं, तेव्हा त्याच्या लांब केसांची खूप चर्चा झाली होती. ती हेअर स्टाईल खूप दिवस चर्चेत होती. धोनी आता 41 वर्षांचा झाला असला तरी त्याचा चाहतावर्ग आजही त्याच्यासाठी वेडा असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. अर्थात, धोनीच्या अशाच केशरचनेचा घेतलेला आढावा…
लाँग हेअर
धोनीने जेव्हा 2005 दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले तेव्हा तो आपल्या लाँग हेअर्ससाठी फेमस होता, त्याच्या त्या डॅशिंग हेअरच्या लुकने तो मैदानावर बॉलर्सची चांगलीच धुलाई करायचा. विशेष म्हणजे त्याचा हा लुक इतका लोकप्रिय होता की खुद्द पाकिस्तानचे त्यावेळचे राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनीही धोनीला केस कापू नको असा सल्ला दिला होता.
सिल्की हेअर
2006 दरम्यान जेव्हा धोनी वनडे क्रिकेटमध्ये आपली एक भक्कम जागा तयार करत होता तेव्हा त्याने आपले केस लांबच ठेवले होते मात्र त्यांना सिल्की लुक दिला होता. याच लुकमध्ये भारताला 2007 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकवून दिला होता.
बाल्ड हेअर
भारताला 2011 मध्ये विश्वचषक जिंकून दिल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी धोनीने चक्क टक्कल केले. त्याने आपले केस धार्मिक कारणामुळे कापले असल्याचे जाहीर करत जगासमोर आपला एक नवा लुक आणला.
मोहॉक लुक
भारताला 2011 चा विश्वचषक जिंकून दिल्यानंतर धोनीने पुन्हा आपले केस पहिल्यासारखे वाढवले नाहीत. मात्र 2013 च्या आयपीएल दरम्यान धोनीचा मोहॉक लुकचे केस बरेच फेमस झाले होते.
ओल्ड लुक
धोनीने 2014 मध्ये जेव्हा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तेव्हा त्याने आपले केस विखुरलेले आणि पिकलेले ठेवले होते. त्याच्या या केसांमुळे तो बराच चर्चेत होता.
शॉर्ट हेअर
जानेवारी 2017 मध्ये कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर धोनी आपल्या साध्या आणि नीटनेटक्या केसात दिसून आला. सध्या तो छोटे आणि नीटनेटके केस ठेवत आपला साधेपणा जपतो.
बायोपिकसाठी बदलला लूक
धोनीच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी‘ 2016 मध्ये बॉक्स ऑफिसवर झळकला होता. यावेळेस सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान धोनीचा हटके लुक चाहत्यांना पाहायला मिळाला. सिनेमाच्या टीमनंही त्याला प्रमोशनमध्ये व्यस्त ठेवलं होतं. या सिनेमासाठीही धोनीने हेअर स्टाइल बदलली. या हेअर स्टाइलमध्ये धोनी खूप हँडसम दिसत होता.
लेटेस्ट लुक
यंदाच्या आयपीएल हंगामात धोनी नुकताच आपल्या रिटायरमेंटच्या अफवेमुळे चर्चेत राहिला. हे सोडले तर संपूर्ण आयपीएलमध्ये त्याचा आगळा वेगळा कूल लूक दिसून आला. बारीक केलेले केस व काळी दाढी यामुळे चाहत्यांना त्याचा लूक फार आवडला. याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चाहत्यांनीही मोठ्या प्रमाणात लाईक केले आहे.
– विनायक भोसले, कोल्हापूर
खेळ जुनाच, ओळख नवी : उंच उडी
आधुनिक युगातील पहिले ऑलिंपिक अथेन्स (ग्रीस) येथे 1896 मध्ये झाले. त्यावेळी त्यात झळकलेल्या नऊ मूळ खेळांपैकी एक प्रकार हा उंच उडी होता. तेव्हापासून उन्हाळी ऑलिम्पिकचे उंच उडी हे नियमित वैशिष्ट्या राहिलेले आहे…उंच उडीमध्ये स्पर्धकाने ठरावीक उंचीवर ठेवलेल्या आडव्या पट्टीला न पडू देता धावत येऊन त्यावरून उडी मारणे आवश्यक असते. त्यामुळे यात यशस्वी होण्यासाठी वेग, शक्ती आणि चपळता या तिन्ही गोष्टी आवश्यक…
- उडी मारताना खेळाडू फक्त एक पाय वापरू शकतो…उंच उडीचे तीन भाग असतात. पहिला म्हणजे ‘रनवे’ किंवा ‘टेक ऑफ एरिया’. त्याची लांबी साधारणपणे किमान 15 मीटर्स, तर ऊंदी 16 मीटर्स असते. दुसरा भाग म्हणजे दोन उभ्या खांबांवर ठेवलेली 4 मीटर लांबीची पट्टी (क्रॉसबार). ती अगदी हलक्याशा स्पर्शाने देखील खाली पडू शकते. तिसरा भाग म्हणजे स्पर्धक ज्यावर कोसळतो ती ‘क्रॅश मॅट’. कोणत्याही प्रकारच्या दुखापती टाळण्यासाठी हा एक सुरक्षा उपाय…
- ‘रनवे’वरून धावून उंच उडी मारण्याची सुऊवात होते. धावताना जोपर्यंत अॅथलीट ‘रनवे’च्या मर्यादेत राहतो तोपर्यंत त्याला योग्य वाटेल त्या पद्धतीने येऊन उडी घेण्याची मान्यता असते. तो सरळ किंवा वाकडा अथवा वेगाने धावून येऊ शकतो वा शेवटच्या क्षणी संथ होऊ शकतो…
- 1968 च्या मेक्सिको सिटी ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेच्या डिक फॉस्बरीने पुऊषांच्या उंच उडीमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर ही उडी मारण्याच्या पद्धतीला नाट्यामय वळण मिळाले. फॉस्बरीचे तंत्र ‘क्रॉसबार’च्या दिशेने आडवे धावून वाकडे होऊन नंतर पाठीच्या बाजूने उडी घेण्याचे होते. हे तंत्र नंतर ‘फॉस्बरी फ्लॅप’ म्हणून ओळखले जाऊ लागले आणि जवळजवळ सर्व आधुनिक स्पर्धक उंच उडी मारताना त्याचाच वापर करतात…
- जर खेळाडू ‘क्रॉसबार’ पडू न देता क्रॅश मॅटवर उतरला, तर उडी कायदेशीर मानली जाते. उडी मारताना शरीराच्या कोणताही भागाचा ‘क्रॉसबार’ला स्पर्श झाला, पण तो पडला नाही, तर ती वैध उडी मानली जाते. तथापि, जर ‘क्रॉसबार’ निखळला किंवा धावपटूने उडी मारताना उभ्या खांबांना स्पर्श केला, तर तो प्रयत्न अयशस्वी मानला जातो…
- उंच उडीची सुऊवात मुख्य पंच ‘क्रॉसबार’ ठेवण्यासाठी विशिष्ट उंची निर्धारित करून होते. अॅथलीटचा कस पाहण्यासाठी हळूहळू त्यात वाढ केली जाते. पुढील टप्प्यात जाण्यासाठी विशिष्ट उंची पार करण्याकरिता प्रत्येकी तीन प्रयत्न करता येतात. एखाद्या स्पर्धकाला सलग तीन अयशस्वी प्रयत्नांनंतर गाळले जाते. शेवटचा राहिलेला अॅथलीट स्पर्धा जिंकतो.
- दोन किंवा अधिक स्पर्धकांमध्ये अव्वल स्थानासाठी ‘टाय’ झाल्यास ज्या उंचीवर टाय झाली तेथे सर्वांत कमी अयशस्वी प्रयत्न कुणाचे राहिले तसेच संपूर्ण स्पर्धेत सर्वांत कमी अयशस्वी प्रयत्न कुणाचे राहिले हे विचारात घेतले जाते. तरीही विजेता न ठरल्यास ‘जंप ऑफ’चा आधार घेतला जातो. त्यात उडी मारणाऱ्यांना पुढील टप्प्यातील उंची पार करण्यासाठी एक संधी मिळते…
- 2009 मध्ये, एक नवीन नियम लागू करण्यात आला. त्यानुसार ‘जंप ऑफ’ ऐच्छिक करण्यात आली आहे. याचा अर्थ असा की, खेळाडू परस्पर सहमतीने अव्वल स्थान वाटू घेऊ शकतात. त्याच्या आधारे 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुऊषांच्या उंच उडीत कतारचा मुताझ एसा बर्शिम आणि इटलीचा जियानमार्को तांबेरी यांनी सुवर्णपदकाचे संयुक्त मानकरी ठरण्याचा पर्याय निवडला…









