धडाकेबाज…फॅफ डु प्लेसिस !
यंदाची ‘आयपीएल’ ज्या फलंदाजांनी आपल्या जबरदस्त टोलेबाजीनं गाजविली त्यात समावेश होतो फॅफ डु प्लेसिसचाही…दक्षिण आफ्रिकेच्या या माजी कर्णधारानं गाजविलेला प्रताप तो अधिपत्य करत असलेल्या ‘आरसीबी’ला ‘प्ले-ऑफ’मध्ये पोहोचवू शकलेला नसला, तरी सर्व क्रिकेट रसिकांची मनं निश्चितच जिंकून गेलाय…
फॅफ डु प्लेसिस…दर्जेदार, धीरोदात्त अन् डावाची उत्तम प्रकारे उभारणी करणारा शिल्पकार…जॅक कॅलिसनंतरच्या काळातील दक्षिण आफ्रिकेचा सर्वांत सातत्यपूर्ण फलंदाज अन् तितकाच जबरदस्त क्षेत्ररक्षक…मजबूत ‘फ्रंट फूट’, भक्कम बचाव आणि ‘क्रीज’वरील मुक्कामाचा आनंद लुटत फलंदाजी ही वैशिष्ट्यां…डु प्लेसिसची 2011 मध्ये भारताविऊद्धच्या घरच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय संघात निवड झाली अन् पदार्पणातच अर्धशतक झळकावून त्यानं त्यानंतरच्या विश्वचषकासाठी आपलं स्थान निश्चित केलं. त्यावेळी त्याला आक्रमक, झटपट धावा करणारा फलंदाज म्हणून ओळखलं जात असे…
2012 मध्ये फॅफ दक्षिण आफ्रिकेच्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी संघाचा भाग राहिला असला, तरी त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याऐवजी त्या दौऱ्यात त्याचं पदार्पण झालं ते ‘टी-20’मध्ये…डु प्लेसिसला त्या वर्षाच्या उत्तरार्धात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी खेळण्याची संधी मिळाली आणि त्यानं अॅडलेडमधील दुसऱ्या कसोटीत दुसऱ्या डावात क्रीजवर साडेसात तासांपेक्षा जास्त वेळ मुक्काम ठोकत 110 धावांवर नाबाद राहून दक्षिण आफ्रिकेनं ज्याचा विचारही केला नव्हता ती बरोबर साधून दिली (2000 नंतर कांगारुंच्या भूमीवर कसोटीत कोणत्याही फलंदाजानं केलेली ती सर्वोत्तम कामगिरी मानली जातेय)…
फॅफ डु प्लेसिसनं स्वत:ला एक पूर्ण फलंदाज म्हणून स्थापित करताना आपले ‘गीअर्स’ बदलण्याची आणि नांगर टाकण्याची क्षमता पुन्हा एकदा दाखविली ती डिसेंबर, 2013 मध्ये भारताविऊद्ध. जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या डावात त्यानं काढलेल्या 134 धावांनी दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या कसोटीतील सर्वोच्च लक्ष्याचा (458) पाठलाग करताना अगदी नजीक पोहोचविलं होतं. शेवटी हा सामना अनिर्णीत अवस्थेत सुटला. पुढच्याच सामन्यानंतर कॅलिसनं निवृत्ती घेतली असता डु प्लेसिसला बढती मिळून आपोआप महत्त्वाचा तिसरा क्रमांक त्याच्या वाट्याला आला…
वेस्ट इंडिजविऊद्ध ‘टी-20’ लढतीत 56 चेंडूंत 119 धावा काढून सर्व प्रकारांत शतक झळकविणारा दक्षिण आफ्रिकेचा पहिला फलंदाज बनलेल्या फॅफची कर्णधार या नात्यानं वाटचालही काही कमी धडाकेबाज राहिली नाही…2012 च्या डिसेंबरमध्ये त्याआधी केवळ चार ‘टी-20’ सामने खेळलेले असतानाही न्यूझीलंडविऊद्धच्या मालिकेत ‘टी-20’ संघाचं कर्णधारपद त्याच्याकडे सोपविण्यात आलं अन् पुढील फेब्रुवारीत ही भूमिका कायमस्वरूपी देण्यात आली…डिसेंबर, 2016 मध्ये डु प्लेसिसनं कसोटी कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली आणि 2017 च्या ऑगस्ट महिन्यात डिव्हिलियर्सनं मर्यादित षटकांच्या सामन्यांतील संघाच्या कर्णधारपदाचा त्याग केल्यानंतर खेळाच्या तिन्ही प्रकारांतील पूर्णवेळ कर्णधारपद त्याच्याकडे चालून आलं….
फॅफ हा एकदिवसीय सामन्यांतील विजयाच्या 73.68 टक्केवारीसह त्याच्या काळातील सर्वांत यशस्वी कर्णधारांपैकी एक…खेळाच्या तिन्ही प्रकारांत तसंच 2016 नि 2018 मध्ये लागोपाठ झालेल्या ‘होम’ व ‘अवे’ कसोटी मालिकांत ऑस्ट्रेलियाला पराभूत करणारा तो पहिला आंतरराष्ट्रीय कर्णधार. 2016 साली डु प्लेसिस पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत कांगारूंचा 5-0 असा ‘व्हाईटवॉश’ करणाराही पहिला आंतरराष्ट्रीय कर्णधार बनला…पुढं त्याचं एकदिवसीय सामन्यांत धावा काढणं चालू राहिलं असलं, तरी तो संथ खेळत असल्याची टीका होऊ लागली. 2014 आणि 2016 अशा दोन ‘टी-20’ विश्वचषक स्पर्धांत फॅफनं दक्षिण आफ्रिकेच्या मोहिमेचं नेतृत्व केलं, पण हात हलवत परत यावं लागलं. हे कमी म्हणून की काय, कसोटीतही संघर्ष करण्याची पाळी आली. या पार्श्वभूमीवर 2015-16 च्या हंगामात 12 डावांमध्ये केवळ एक अर्धशतक झळकावता आल्यानंतर जानेवारी, 2016 मधील इंग्लंडविऊद्धच्या अंतिम कसोटीतून त्याला वगळण्यात आलं…
2021 च्या फेब्रुवारी महिन्यात पॅफ डु प्लेसिसनं एकदिवसीय व ‘टी-20’ विश्वचषकावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी कसोटीतून निवृत्तीची घोषणा केली. पण जगभरातील वेगवेगळ्या लीग गाजवत असताना देखील 2021 ची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा अन् गेल्या वर्षीचा ‘टी-20’ विश्वचषक यासह कोणत्याही मालिकेसाठी त्याची निवड झाली नाही…मात्र यंदाचं ‘आयपीएल’ हे चित्र बदलून टाकू शकेल काय ? तो शेन वॉटसनप्रमाणं संघात पुनरागमन करू शकेल काय ?…
विराट कोहलीसमवेत जमलेली जोडी…
- विराट कोहली आणि फॅफ डु प्लेसिस यांच्या रूपानं लाभलेली धडाकेबाज सलामीची जोडी हे ‘रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर’चे यंदा सर्वांत मोठे शक्तिस्थान राहिले. शेवटच्या ‘गुजरात टायटन्स’विऊद्धच्या सामन्यात त्यांनी ‘आयपीएल’च्या एका हंगामात एकूण धावांची भागीदारी करण्याच्या विक्रमाशी (939 धावा) बरोबरी केली. 2016 च्या मोसमात कोहली व डिव्हिलियर्स यांनी सदर विक्रम नोंदविला होता…एका हंगामात 900 पेक्षा जास्त धावा जमविण्याचा पराक्रम या दोनच जोड्यांना जमलाय…
- आरसीबीच्या या सलामीवीरांनी 14 डावांमध्ये आठ वेळा 50 हून अधिक धावांची भागीदारी केली (त्यातील तीन शतकी भागीदाऱ्या), हा देखील विक्रमच…कोहली-डु प्लेसिस जोडीची सरासरी 67.7 अशी राहिली असून त्यांची 172 धावांची सर्वोच्च भागीदारी नोंदली गेली ती सनरायजर्स हैदराबादविऊद्ध. शिवाय या दोघांनी मिळून एका स्पर्धेत एक हजाराहून जास्त धावांचा रतीब ओतण्याचा प्रतापही गाजविलाय…
‘आयपीएल’मधील वाटचाल…
- फॅफ डु प्लेसिसनं ‘आयपीएल’मध्ये पाऊल ठेवलं ते 2012 साली ‘चेन्नई सुपर किंग्स’च्या मार्फत. त्यावेळी त्याला 60 लाख ऊपयांना करारबद्ध करण्यात आलं होतं. लवकरच संघातील गरजेच्या वेळी मदतीला धावून येणाऱ्या विश्वासार्ह खेळाडूंपैकी एक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाऊ लागलं…
- ‘चेन्नई सुपर किंग्स’वर 2016 व 2017 मध्ये बंदी घातली गेल्यानंतर डु प्लेसिस ‘रायझिंग पुणे सुपरजायंट’कडून खेळला (किंमत सुमारे 4 कोटी रु.)…2018 साली ‘सीएसके’त परतल्यानंतर 2021 पर्यंत तो त्यांच्यामार्फत मैदानात उतरला (करार 1.6 कोटी रुपयांचा)…
- 2018 च्या हंगामातील पहिल्या ‘क्वालिफायर’मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या संघाला अडचणीतून बाहेर काढून अंतिम फेरीपर्यंत पोहोचविण्यात डु प्लेसिसनं मोलाचा वाटा उचलला…यापूर्वी 2021 चा हंगाम पॅफसाठी सर्वोत्तम ठरला होता. त्यात त्यानं केल्या होत्या सहा अर्धशतकांसह 644 धावा. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे कोलकाता नाईट रायडर्सविऊद्ध फक्त 59 चेंडूत 86 धावा ठोकून त्यानं ‘सीएसके’ला चौथ्यांदा चषक जिंकून दिला…
- 2022 च्या ‘मेगा’ लिलावात या दक्षिण आफ्रिकी खेळाडूला ‘रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर’नं 7 कोटींना नुसतं करारबद्ध केलं नाही, तर कोहलीच्या जागी त्याच्याकडे नेतृत्व सोपविण्यात आलं…फॅफनं ‘आयपीएल’मध्ये आतापर्यंत 374 चौकार नि 145 षटकार फटकावलेत…
फॅफ अन् वाद…
- डु प्लेसिस त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत दोनदा ‘बॉल टॅम्परिंग’ प्रकरणी दोषी आढळला…2013 मध्ये पाकिस्तानविऊद्धच्या ओव्हल कसोटीदरम्यान अन् 2016 साली ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या होबार्ट कसोटी सामन्यात…
- फॅफ जगभरातील ‘टी-20 लीग’मधून खेळत असला, तरी मागील काही काळापासून त्याचं दक्षिण आफ्रिकेच्या संघातून मात्र दर्शन घडत नाहीये. याचं मुख्य कारण म्हणजे त्याचे ‘क्रिकेट दक्षिण आफ्रिका’सोबतचे मतभेद. डु प्लेसिस नेहमीच उपलब्ध असावा अशी मंडळाची इच्छा, तर त्याला ‘आयपीएल’सह वेगवेगळ्या ‘टी-20 लीग’चे वेध. त्यामुळं शेवटी करार गमावून बसावं लागलं…तथापि जवळ पोहोचलेल्या विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय व ‘टी-20’ संघाचे नवे प्रशिक्षक रॉब वॉल्टर हे त्याला पुन्हा संघात घेण्यास उत्सुक असल्याचं सांगितलं जातंय…
यंदाचा विलक्षण धडाका…
- 38 वर्षीय फॅफ डु प्लेसिस यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये जबरदस्त फॉर्मात राहिलाय…700 धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज ठरण्याबरोबर सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजासाठीच्या ‘ऑरेंज कॅप’च्या शर्यतीत सदोदित आघाडीवर राहिला तो तोच. मात्र ‘गुजरात टायटन्स’चा शुभमन गिल त्याच्यापेक्षा केवळ 8 धावांनी मागं असल्यानं हा मान पॅफला मिळणार नाही हे स्पष्टपणे दिसतंय…
- डु प्लेसिसनं 14 डावात 730 धावा काढल्या अन् तब्बल आठ अर्धशतकांची नोंद केली…याशिवाय यंदा सर्वाधिक 36 षटकार खेचलेत ते फॅफनंच. तर चौकारांच्या यादीत तो (60) आहे सहाव्या स्थानी…
- प्रकार सामने डाव नाबाद धावा सर्वोच्च सरासरी शतकं अर्धशतकं
- कसोटी 69 118 14 4163 199 40.03 10 21
- वनडे 143 136 18 5507 185 46.67 12 35
- टी20 50 50 7 1528 119 35.53 1 10
- आयपीएल 130 123 11 4133 96 36.9 – 33
– राजू प्रभू
कहाणी दमलेल्या बॅडमिंटनपटूंची
दिग्गज बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, पीव्ही सिंधू किदाम्बी श्रीकांत, पारुपल्ली कश्यप यंदा तरी जिंकणार का, असा प्रश्न अलीकडे बॅडमिंटन चाहते विचारत आहेत. अलीकडील काळातील सिंधू-सायनाची कामगिरी पाहता, हा प्रश्न विचारला जाणे स्वाभाविक आहे. आता सिंधू-सायना खेळत असलेल्या बहुतेक स्पर्धांचा दर्जा कमालीचा उच्च असतो. त्यात सातत्याने कोणालाच यश मिळत नाही, तरीही या दोघींकडून प्रत्येक स्पर्धेत भारताला जेतेपद हवे असते. अलीकडील काळात जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या भरगच्च वेळापत्रकामुळे खेळाडू दमत आहेत आणि त्याचा परिणाम खेळाडूंच्या कामगिरीवर होत असल्याचा सूर व्यक्त केला जात आहे. अतिबॅडमिंटनमुळे खेळाडू थकले आहेत, बॅडमिंटन कोर्टवर त्यांची दमछाक होत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. गतवर्षी सिंधूने दमदार कामगिरी करताना आपल्या खात्यात दोन-तीन जेतेपद पटकावली. वर्षाअखेरीस मात्र तिला दुखापतीचा सामना करावा लागला. यानंतर 2023 मध्ये फेब्रुवारीत आशियाई सांघिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये तिने कांस्यपदक तर स्पेन मास्टर्समध्ये जेतेपद पटकावले. यानंतर पुन्हा तिला अपयशाचा सामना करावा लागला. प्रतिष्ठेच्या सुदीरमन चषक स्पर्धेतही ती अपयशी ठरली. अर्थात याचा फटका तिला जागतिक क्रमवारीतही बसला आहे. जागतिक मानांकनातही तिची अकराव्या स्थानी घसरण झाली आहे. या पाच महिन्यांच्या कालावधीत तिने नामांकित स्पर्धेत सहभाग नोंदवला. या दरम्यान कमी विश्रांती, सरावासाठी पुरेसा वेळ न मिळणे, प्रवासाची दगदग. या साऱ्या बाबी म्हणजे एक चक्रव्यूहच. ते भेदणे केवळ सिंधूलाच नव्हे तर जगातील प्रमुख बॅडमिंटनपटूंना कठीण ठरत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे, स्पेनची अव्वल खेळाडू कॅरोलिना मारिन. एकेकाळी कित्येक आठवडे अव्वलस्थानावर असलेल्या मारिनला दुखापती व सततच्या खेळाचा फटका बसला असून ताज्या यादीत ती सहाव्या स्थानावर आहे.
सायनाचे अपयश चिंताजनक
दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर सायना नेहवालचे अपयश ही चिंताजनक बाब मानली जात आहे. जानेवारी 2019 मध्ये सायनाने इंडोनेशियन ओपनचे विजेतेपद पटकावले. यानंतर, तिला आतापर्यंत एकही जेतेपद पटकावता आलेले नाही. याशिवाय, जागतिक मानांकनातही तिची 36 व्या स्थानापर्यंत घसरण झाली आहे. अर्थात, सायना जिगरबाज खेळाडू आहे. तिने भारतीय बॅडमिंटनला नवी दिशा दिली आहे. मात्र अतिखेळण्याचा त्रास तिलाही होत आहे. अलीकडील काळातील तिच्या कामगिरीवऊन हे दिसत आहे. मागील इतिहास पाहता सायनाने प्रत्येक कठीण प्रसंगातून मार्ग काढत पदक जिंकण्याची कामगिरी केली आहे. यामुळे आगामी काळात भारतीय चाहत्यांना तिच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
आकर्षी, मालविका, गायत्री या युवा बॅडमिंटनपटूवर मदार
सायना नेहवाल, सिंधूने मागील काही वर्षात जागतिक बॅडमिंटन क्षेत्रात भारताचा मोठा दबदबा निर्माण केला आहे. अलीकडील काळात सायना, सिंधूचा आदर्श घेत आकर्षी कश्यप, मालविका बनसोड, गायत्री गोपीचंद, त्रिशा जॉली यांनी बॅडमिंटन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. या युवा बॅडमिंटनपटूंनी आपल्या कामगिरीने लक्ष वेधून घेतले आहे. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना त्यांना अनुभवाची कमतरता जाणवते. अर्थात, सरावाने हे सारे शक्य होते. आगामी काळात सायना, सिंधूनंतर या युवा बॅडमिंटनपटूवर भारताची प्रामुख्याने मदार असणार आहे.
पुऊष खेळाडूंकडेही लक्ष हवे
सायना नेहवाल, सिंधू भारतीय बॅडमिंटनसाठी महत्वाच्या आहेत, पण या दोघी म्हणजे भारतीय बॅडमिंटन नव्हे. अलीकडील काळात किदाम्बी श्रीकांत, बी साई प्रणित, पाऊपल्ली कश्यप, समीर वर्मा, लक्ष्य सेन, प्रणॉय यांनीही दमदार कामगिरी साकारली आहे. पण, या युवा खेळाडूंत सातत्य नसल्याचे दिसून येत आहे. श्रीकांत, साई प्रणित, प्रणॉय यांनी मागील दोन वर्षाच्या कालावधीत यश नक्कीच मिळवले आहे, पण चिनी, कोरियन, जापनीज खेळाडूंसमोर भारताचे खेळाडू अपयशी ठरतात, ही बाब नक्कीच वेदनादायी आहे. या साऱ्या अपयशातून प्रेरणा घेत पुऊष बॅडमिंटनपटूंनी चांगली कामगिरी करण्यावर भर द्यायला हवा. पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज-चिराग शेट्टी जोडीने मागील दोन वर्षात चांगलीच झेप घेताना आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवला आहे. यंदाच्या वर्षातही या जोडीने कमाल करताना दोन जेतेपद पटकावली आहेत. पुरुष दुहेरीत या जोडीचे असेच सातत्य आगामी काळात कायम राहिल्यास ऑलिम्पिकमध्ये यश मिळवणे सोपे जाणार आहे. याशिवाय, महिला दुहेरीत ज्वाला गुट्टा-अश्विनी पोनप्पा यांच्यानंतर युवा त्रिशा जॉली व गायत्री गोपीचंद यांच्यावर मदार असणार आहे.
– विनायक भोसले, कोल्हापूर
भरगच्च वेळापत्रकाचा फटका अव्वल खेळाडूंना बसू शकतो. मात्र ही समस्या जगातील सर्वच खेळाडूंची आहे. अर्थात, आगामी ऑलिम्पिक स्पर्धा पाहता सायना व सिंधू यांनी याविषयी तक्रार न करता त्याच्याशी जुळवून घेणे अपेक्षित आहे.
– पुलेला गोपीचंद, राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक
लांब उडी
प्राचीन ऑलिम्पियाडमधील मुख्य प्रकारांपैकी एक असलेली लांब उडी आधुनिक ऑलिंपिकमध्ये देखील महत्त्वाचा प्रकार बनून राहिली आहे. लांब उडीतील स्पर्धकाचे उद्दिष्ट सोपे असते आणि ते म्हणजे उडी मारून जास्तीत जास्त अंतर कापणे. असे असले, तरी बारकाईने पाहिल्यास हे लक्षात येईल की, लांब उडी ही तांत्रिकदृष्ट्या कठीण ‘ट्रॅक अँड फील्ड इव्हेंट्स’पैकी एक आहे…
- लांब उडी मारणारे अॅथलीट धावून सुरुवात करतात आणि एका निर्धारित टप्प्यावर स्वत:ला झोकून देतात. त्याला ‘टेक-ऑफ बोर्ड’ देखील म्हणतात. मग वाळूच्या पट्ट्यात उतरण्यापूर्वी ते हवेत जास्तीत जास्त अंतर कापण्याचा प्रयत्न करतात. या संपूर्ण प्रक्रियेचे तीन भाग असतात-अॅथलीट धावून येतो तो ‘रनवे’, ‘टेक ऑफ बोर्ड’ आणि उतरण्यासाठी ‘सँडपिट’…
- अधिकृत स्पर्धांमध्ये ‘रनवे’ची लांबी 40 मीटर असते. तो मध्य-अंतराच्या किंवा लांब-अंतराच्या धावण्याच्या शर्यतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘ट्रॅक’सारखाच असतो. ‘रनवे’च्या शेवटी 20 सेंटीमीटर ऊंद ‘टेक ऑफ बोर्ड’ असतो. ‘रनवे’ आणि ‘टेक ऑफ बोर्ड’ समतल असणे आवश्यक असते…
- ‘टेक-ऑफ बोर्ड’च्या शेवटी एक ‘फॉल लाईन’ असते. तेथून उडी मारताना उडी कायदेशीर मानली जाण्यासाठी अॅथलीटच्या बुटाची टांच ही ‘फॉल लाईन’च्या मागे असणे आवश्यक असते. जर ती रेषा ओलांडली, तर ती चुकीची उडी मानली जाते आणि जमेस धरली जात नाही…उडी मारताना ‘सेल’, ‘हँग’ आणि ‘हिच कीक’ अशा विविध शैली वापरल्या जातात…
- उडी मारल्यानंतर ‘टेक-ऑफ बोर्ड’च्या दुसऱ्या बाजूला असलेल्या वाळूच्या पट्ट्यात अॅथलीट उतरतो. ‘टेक-ऑफ बोर्ड’च्या काठापासून वाळूमध्ये उतरताना अॅथलीटच्या शरीराच्या कोणत्याही भागाच्या स्पर्शाने निर्माण झालेल्या खुणेपर्यंतचे अंतर मोजले जाते.
- ‘रनवे’वर उतरल्यानंतर संपूर्ण उडी एका मिनिटात पूर्ण करणे आवश्यक असते. एखाद्या स्पर्धेत अॅथलीटला ठरावीक प्रयत्नांची मुभा मिळते आणि जो सर्वांत लांब अंतर कापतो तो सर्वोत्कृष्ट गणला जातो. ऑलिम्पिक किंवा जागतिक स्पर्धेसारख्या मोठ्या स्पर्धांच्या अंतिम फेरीत खेळाडूंना साधारणपणे सहा उड्या मारता येतात. अंतिम फेरीतील स्पर्धकांची निवड करण्यासाठी तीन उड्यांची चाचणी फेरी घेतली जाते. नंतर अंतिम फेरीत पदक जिंकण्यासाठी स्पर्धकांना आणखी तीन उड्या माराव्या लागतात…
- लांब उडीतील पुरुषांच्या गटातील विश्वविक्रम आहे तो अमेरिकेच्या माईक पॉवेलच्या (1991 साली 8.95 मीटर्स), तर महिलांच्या गटात रशियाच्या गॅलिना चिस्त्याकोवाच्या (1998 साली 7.52 मीटर्स) नावावर…ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या गटातील विक्रम अमेरिकेच्या बॉब बिमन (1968 साली 8.90 मीटर्स), तर महिलांच्या गटातील विक्रम अमेरिकेच्याच जॅकी जॉयनर केरसीच्या (1988 साली 7.45 मीटर्स) नावावर विसावलेला आहे…